Orchard Management
Orchard Management Agrowon
ॲग्रो गाईड

Orchard Management : पाऊस, ढगाळ स्थितीतील बागेचे नियोजन

डॉ. आर. जी. सोमकुंवर 

Grape orchard : गेल्या दोन दिवसांपूर्वी जवळपास सर्व द्राक्ष विभागामध्ये साधारण ते अतिवृष्टी या प्रमाणात पाऊस झाल्याचे दिसते. बऱ्याचशा बागेत झालेल्या पावसामुळे नुकसान झाले.

सध्याच्या वातावरणाचा विचार करता कमी झालेले तापमान व वाढलेली आर्द्रता यामुळे बागेत पुन्हा काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर संभाव्य उपाययोजना कशा असाव्यात, याची माहिती या लेखातून घेऊ.

१) मणी क्रॅकिंगची समस्या ः

पावसामुळे बागेत मणी क्रॅकिंग कमी अधिक प्रमाणात झाल्याचे दिसते. पावसाची तीव्रता किती होती, यावर मणी क्रॅकिंगचे प्रमाण दिसून येईल. जास्त पाऊस झाल्यामुळे घडात पाणी साचून राहिलेले असेल, व जमिनीतही तितक्याच प्रमाणात पाणी साचून असल्यास ही परिस्थिती निर्माण होते.

जास्त प्रमाणात झालेला पाऊस, मुळांच्या कक्षेत साचलेले पाणी व भारी जमिनी, ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आदी गोष्टींमुळे मण्याचे क्रॅकिंग झाल्याचे दिसून येते. या परिस्थितीपैकी बागेत आर्द्रता जास्त काळ टिकून असेल, ढगाळ वातावरण व जमिनीत पाणी जास्त झालेल्या परिस्थितीत मात्र मणी क्रॅकिंगची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता असेल.

अशा परिस्थितीतील बागेत एकतर अचानक गोडी कमी झाली असेल, त्याच सोबत क्रॅकिंग झालेले मणी सडण्याची प्रक्रियाही सुरू होईल. अशा स्थितीत ‘क्रॅकिंग’ झालेल्या मण्यातून रस बाहेर निघत राहील व त्यावर माशा व चिलटांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढेल.

पुन्हा घड अधिक खराब होतील. त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी घडांवर कीडनाशकांची फवारणी करण्याचे टाळावे. त्याऐवजी फक्त जमिनीवर फवारणी करून घ्यावी.

खराब झालेले मणी काढून गोळा करावेत. ते टोपली अथवा पिशवीमध्ये भरून बागेबाहेर दूरवर खड्ड्यात पुरावेत. किंवा त्यावर कीडनाशकाची फवारणी करून घ्यावी. यानंतर बागेत ट्रायकोडर्माची फवारणी करावी.

त्यासाठी मांजरी वाईनगार्ड दोन मि.लि. प्रति लिटर पाणी किंवा बाजारात उपलब्ध असलेले ट्रायकोडर्मा बुरशीनाशक पाच मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करून घ्यावी.

दुसऱ्या परिस्थितीतील बागेत पाऊस व ढगाळ वातावरण कमी झाले असून, चांगले ऊन पडलेले आहे. अशा ठिकाणी क्रॅकिंग कमी जास्त प्रमाणात झाले असले तरी त्या घडातील मण्याचे सडणे बंद होईल.

मण्याला पडलेल्या चिराही सुकून गेल्याचे दिसेल. अशी स्थिती असल्यास फारसे काही करण्याची गरज नसेल. मात्र ट्रायकोडर्माची फवारणी वरीलप्रमाणे या बागेतही अवश्य करून घ्यावी.

पाऊस पुन्हा होण्याचा अंदाज किंवा शक्यता असलेल्या बागेत मात्र पावसाच्या सहा ते सात तासापूर्वी भरपूर पाणी द्यावे. यामुळे वेलीची मुळे आधीच पाणी शोषून घेईल. ते मण्यापर्यंत पोचवून मण्यात आवश्यक तो दाब निर्माण केला जाईल. अशा स्थितीत अचानक पाऊस आला तरी मणी क्रॅकिंगची समस्या फारशी दिसणार नाही.

कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे सुद्धा करून घेता येईल. त्यामुळे मण्याच्या सालीची लवचिकता टिकून राहील. पाऊस येण्याच्या स्थितीमध्ये मणी तडकण्याची समस्या कमी करता येईल.

२) रोगनियंत्रण

नुकत्याच झालेल्या पावसामुळे सध्या बागेत रोगाची भीती फारशी नाही. मात्र ज्या बागेत फळकाढणी करायला उशीर आहे, अशा ठिकाणी ढगाळ वातावरण टिकून असल्यास आधीच वाढलेल्या आर्द्रतेमध्ये भुरी रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येणार नाही.

या वेळी घड सावलीत असतील. आपण जर बागेत जास्त प्रमाणात पाणी वाढविल्यास व वाढत असलेल्या उन्हामुळे तापमानातही वाढ होऊन बाष्पीभवनामुळे बागेत दमट वातावरण जास्त होईल. परिणामी भुरीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात होईल.

या वेळी स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करण्याची शिफारस नसते. तेव्हा जैविक नियंत्रण हाच एक प्रभावी उपाय असू शकतो. ट्रायकोडर्मा पाच मि.लि. प्रति लिटर किंवा मांजरी वाईनगार्ड दोन मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक ते दोन फवारण्या करून घेता येतील.

या वेळी ट्रायकोगार्डची जमिनीतून ड्रेचिंगद्वारे उपलब्धता करणे फायद्याचे ठरणार नाही. बागेतील तापमानाची परिस्थिती पाहून फवारण्याची संख्याही कमी अधिक करता येईल.

३) नवीन बाग ः

रिकट घेतलेल्या बागेत सध्या झालेल्या पावसामुळे व तसेच उपलब्ध ढगाळ वातावरणामुळे निघालेल्या नवीन फुटीच्या वाढीस पोषक वातावरण दिसून येते. ज्या बागेत जास्त पाऊस झाला, तिथे दोन वेली व ओळीच्या मध्ये पाणी साचलेले असल्यास नवीन मुळेही तयार होतील.

यामुळे वेलीच्या वाढीचा जोम जास्त होईल. या परिस्थितीचा फायदा घेऊन नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर उदा. १८-४६-०, १२-६१-०, किंवा फक्त नत्र असलेले खत उदा. युरिया, अमोनिअम सल्फेट यांचा वापर करून वेलीची वाढ अपेक्षेप्रमाणे करून घेणे सोपे होईल.

यावेळी खोड तयार करण्यासाठी जितक्या जोमात वाढ होईल, तितका फायदा होईल. यासाठी पाणी आणि नत्र या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असेल. ज्या बागेत जास्त पाऊस झाला अशा ठिकाणी फारतर चार ते पाच दिवस पाणी देण्याची गरज नसेल.

त्यानंतर वाढत असलेल्या तापमानामुळे अचानक जमीन सुकल्यासारखी दिसून येईल. तेव्हा जमिनीत ओल टिकून राहील, याकडे लक्ष द्यावे. पाणी कमी असलेल्या बागेत बोदावर मल्चिंग करून घेणे, सायंकाळी किंवा सकाळी पाणी देणे, ठिबक नळ्या जमिनीवर घेणे, इ गोष्टींचा फायदा होईल.

उंचावर किंवा टेकडीवर असलेल्या द्राक्षबागेमध्ये तापमान असलेल्या ठिकाणी वारेही जास्त प्रमाणात वाहतात. अशावेळी ते बागेतील ओलावा बाष्प स्वरूपात घेऊन जातात. ते अडविण्यासाठी बागेच्या वारे येत असलेल्या बाजूने शेडनेट बांधून घेतल्यास पाण्याचे नुकसान टाळता येईल.

खोड तयार करण्यासाठी पाणी वाफसा स्थितीमध्ये पुरेसे होईल. दोन ते तीन टप्प्यामध्ये ‘स्टॉप ॲण्ड गो’ पद्धतीने खोड तयार केल्यास पहिल्याच वर्षी खोडाची जाडी सहजरित्या मिळू शकेल. शेंडा पिंचिंग केल्यानंतर निघालेल्या बगलफुटी तीन ते चार पानावर खुडून घ्याव्यात.

बगलफुटीवरील पाने वाढू द्यावीत. यांच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्नद्रव्ये तयार होऊन, खोड जाड होईल. ओलांडा तयार होत असलेल्या बागेत मात्र काळजीपूर्वक व्यवस्थापन असावे. ओलांड्याकडे वळविण्यात येत असलेल्या फुटीला तारेच्या आधी तीन इंच शेंडा खुडून घ्यावा.

त्यामुळे ओलांड्याला वळण मिळण्यास मदत होते. खुडल्यानंतर जी फूट निघू लागते, ती जोमदार व दमदार असणे आवश्यक असेल. या फुटींचा जोम इतका असावा की दोन पेरातील अंतर साधारण २.५ ते ३ इंच राहील. यासाठी पाणी आणि नत्र इतकेच सुरू ठेवावे.

पालाशचा वापर चुकूनही करू नये. पाणीही कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. असे असल्यास पुढील काळात खरडछाटणीनंतर काड्यांची विरळणी करण्याची फारशी गरज राहणार नाही. एकूणच मजुरीवरील खर्च वाचेल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT