Nutrient Agrowon
ॲग्रो गाईड

Soil Management : चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन कसे करणार?

देशात चुनखडीयुक्त जमिनींचे प्रमाण जास्त आहे. अशा जमिनींमध्ये मुख्य, दुय्यम व सूक्ष्मअन्नद्रव्यांचे व्यवस्थापन काटेकोरपणे करावे लागते. त्यासाठी जमिनीचे गुणधर्म ओळखून त्यानुसार विविध खतांचा वापर शास्त्रीय दृष्ट्या व संतुलित करायला हवा.

Team Agrowon

मयूरी देशमुख, डॉ .उल्हास पाटील

Saline Soil Management भारतात जवळपास २२८.८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र चुनखडीयुक्त (कॅल्शियम कार्बोनेट युक्त)असून ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ६९.४ टक्के आहे. समशितोष्ण आणि कोरड्या हवामानात (Dry Weather) अशा जमिनी आढळतात.

या जमिनीत चुन्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा (५ टक्क्यांपेक्षा) जास्त झाल्यास अन्नद्रव्यांच्या (Nutrient)उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होऊन त्यांचे संतुलन बिघडते. जमीन चुनखडीयुक्त (Saline Soil) असते तेव्हा नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे गरजेचे असते.

यात जमिनीचा सामु (pH), क्षारता (EC), सेंद्रिय कर्ब (C) आणि चुनखडी (CaCO 3 ) यांचे प्रमाण योग्य हवे तरच पिकाची योग्य वाढ होऊ शकते.

चुनखडीयुक्त जमीन म्हणजे काय?

ज्या जमिनीत मुक्त चुन्याचे (कॅल्शियम कार्बोनेट) प्रमाण जास्त असते त्यास चुनखडीयुक्त जमीन म्हणतात. यात मुक्त चुन्याचे प्रमाण पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशी जमीन चुनखडीयुक्त समजावी.

अशा जमिनी ओळखण्यासाठी जमिनीचा उभा छेद घेऊन त्यावर सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल शिंपडावे. जमिनीवर बुडबुड्यासारख्या फेस दिसला तर ती चुनखडीयुक्त आहे असे समजावे.

अशी जमीन कुठे आढळते?

१) नैसर्गिकरित्या उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात व वाळवंटी भागात.

२) कोकणपट्टी, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथील काही जमिनीचे क्षेत्र वगळता चुनखडीयुक्त जमिनी सर्वदूर आहेत.

३) मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्यांचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.

चुनखडीयुक्त जमीन तयार होण्याची कारणे

१) महाराष्ट्रातील जमिनी काळ्या बेसाल्ट खडकापासून तयार झाल्या आहेत. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, पोटॅश आणि सोडियमयुक्त खनिजांचे प्रमाण अधिक असते. त्यांचे विदारण होऊन मुक्त चुन्याचे प्रमाण वाढते.

अशा जमिनींमध्ये वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत मुक्त चुन्याचे प्रमाण वाढते आणि मशागतीमुळे ( खोल नांगरणी ) खालच्या थरातील चुना वरच्या थरात येतो.

२) जमिनीतील क्षारांचा निचरा होण्यासाठी लागणारा पाऊस अपुरा पडतो. त्यामुळे मुक्त चुन्याचा निचरा जमिनीतून होत नाही. तापमान वाढल्यानंतर खालच्या थरातील चुनाही वरच्या थरात येतो.

३) बऱ्याच वेळा पाण्यामध्ये विद्राव्य चुन्याचे प्रमाण जास्‍त असेल (उदा. कूपनलिकेच्या पाण्यामध्ये जास्त चुना असण्याची शक्यता असते.) आणि ओलितासाठी या पाण्याचा उपयोग केला तर जमिनी चुनखडीयुक्त होतात.

४) लाईमस्टोन व डोलोमाईट सारख्या खडकांपासून चुनखडीयुक्त जमिनी तयार होतात.

चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्म

-जमिनीचा सामू विम्लधर्मीय म्हणजे ८.० पेक्षा जास्त असतो.

-जमिनीमध्ये विद्राव्य क्षाराचे प्रमाण १ डेसी.सा. प्रति मी. पेक्षा कमी असते.

-जमिनीची घनता वाढते. म्हणजेच जमीन घट्ट बनते.

-मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असते.

-नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते.

-सूक्ष्म अन्नद्रव्ये उदा. लोह, जस्त व बोरॉन यांची उपलब्धता कमी होते.

-हवा व पाणी खेळण्याचे प्रमाण व्यस्त राहते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते.

-उगवण क्षमता कमी होते.

जमिनीतील मुक्त चुनखडीची वर्गवारी

मुक्त चुनखडी प्रमाण (टक्के)

१. कमी १ ते ५

२. मध्यम ५ ते १०

३. जास्त १० ते १५

४. हानिकारक १५ पेक्षा जास्त

अन्नद्रव्यांवर परिणाम

-चुनखडीयुक्त जमिनीचा सामू अल्कलीधर्मी असतो. यामध्ये विद्राव्य स्वरूपातील कार्बोनेट आणि बाय कार्बोनेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे सामु सर्वसाधारण ७.५ ते ८.५ असतो. तो ८.५ च्या वर शक्यतो जात नाही.

-सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास सामू ८.५ च्या वर जाण्याची शक्यता असते.

-या जमिनी १०० टक्के अल्कलीधर्मी संयुगाने युक्त असतात आणि कॅल्शियम मातीमध्ये विद्राव्य स्वरूपात आढळतो.

-सामू वाढल्यामुळे काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून ऱ्हास होतो. तर काही अन्नद्रव्ये अन्य संयुगांना

बांधली जाऊन पिकांना उपलब्ध होत नाहीत.

-चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. त्यामुळे पिकाच्या पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी होऊन वाढ खुंटते. काही वेळा बाय कार्बोनेटचे प्रमाण मातीच्या द्रावणात वाढल्याने पिकांना अपाय होऊ शकतो.

-चुन्यामुळे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या नत्र, स्फुरद, मॅग्नेशियम, पालाश, मँगेनीज, जस्त, तांबे आणि लोह यांच्या उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होतो.

-नत्रयुक्त खते जमिनीमध्ये ताबडतोब मिसळली जातील याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नत्राचे स्वरूप बदलून त्याचे अमोनिया वायूत रूपांतर होऊन तो हवेत निघून जातो.

-कार्बोनेटचे प्रमाण चुनखडीयुक्त जमिनीत जास्त असल्याने स्फुरद आणि मॉंलिब्डेनमची उपलब्धता कमी होते.

-लोह, बोरॉन, जस्त आणि मॅगेनीजची कमतरताही अशा जमिनींमध्ये ठळक जाणवते. कारण जास्त चुन्यामुळे सामू वाढतो. त्यामुळे वरील अन्नद्रव्ये अविद्राव्य होतात. नत्राचे वायूमध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेची गती वाढते.

-सर्वसाधारणपणे पिकांच्या मुळां भोवती आम्लधर्मी वातावरण असते. तसेच द्विदल धान्यपिके मुळांद्वारे हायड्रोजन सोडून मुळाभोवती वातावरण आम्लधर्मी ठेवतात.

चुनखडीयुक्त जमिनीत या क्रियेत बदल होऊन पिकांच्या मुळांची वाढ योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे लोहासारख्या अन्नद्रव्याची कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागते. कारण लोह आम्लधर्मी वातावरणात जास्त उपलब्ध असते.

- अल्कलीधर्मी वातावरणात त्याची उपलब्धता कमी होते.

-'फॉस्फरस’ची मर्यादित उपलब्धता असते. तसेच कॅल्शियम कार्बोनेट जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नत्र, स्फुरद, मॅग्नेशियम, पालाश, मॅंगेनीज, जस्त, तांबे आणि लोह यांच्या उपलब्धतेवरही परिणाम होतो.

-चुनखडीयुक्त जमिनीत पुरेसे पाणी आणि पोषक तत्त्वांचा पुरवठा केल्यास अपेक्षित उत्पादकता मिळवता येते.

चुनखडीयुक्त जमिनीत नत्राचे व्यवस्थापन

१) चुनखडीयुक्त जमिनी अल्कलीधर्मी असल्याने नत्राचे रूपांतर होण्याच्या गतीवर प्रतिकूल परिणाम होतो.

२) जमिनीतील नायट्रोसोमोनास, नायट्रोबॅक्टरसारखे जिवाणू नत्राचे अमोनिया स्वरूपात रूपांतर करतात.

३) नायट्रेट स्वरूपातील नत्र पिके शोषून घेतात. म्हणून ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ‘नायट्रिफिकेशन’ ही क्रिया जमिनीचा सामू ७ ते ८ च्या दरम्यान असल्यास जास्त गतीने होते. सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असल्यास अमोनियमयुक्त नत्र खताचा वापर फायदेशीर ठरतो.

मात्र जमिनीत ‘कार्बोनेट’चे प्रमाण अधिक असल्याने अमोनिअम खताचा परिणाम दिसून येत नाही, कारण जमिनीतील कॅल्शियम कार्बोनेटसोबत अमोनियमची प्रक्रिया होऊन अमोनिअम कार्बोनेट तयार होते.

यातील अमोनिअम कार्बोनेटचे रूपांतर अमोनिया वायू, पाणी आणि कर्बवायूत होते आणि नत्राचा ऱ्हास होतो. त्यामुळे अमोनिअम सल्फेट, अमोनिअम फॉस्फेटसारख्या खताचा वापर चुनखडीयुक्त जमिनीत करू नये.

त्याऐवजी अमोनिअम नायट्रेट, अमोनिअम क्लोराइडयुक्त खतांचा वापर करावा. अर्थात फ्लोराईडचे जमिनीतील प्रमाण तपासून हा वापर फायद्याचा ठरतो.

चुनखडीयुक्त जमिनीत लोहाची कमतरता असते. त्यामुळे मुळांच्या वाढीमध्ये लेगहिमोग्लोबिन पदार्थ कमी तयार होतात. या घटकामुळेच हवेतील नत्र मुळांवरील गाठीमध्ये साठविणे शक्य होत असते.

उपाययोजना

-नत्र खतांचा वापर काळजीपूर्वक हवा.

-अमोनिअम सल्फेट किंवा युरिया ठिबकद्वारे अधिक वेळा विभागून द्यावे. त्यामुळे मुळांच्या

कक्षेत पाण्यासोबत पोचलेले नत्र मुळांद्वारे त्वरित वापरले जाते.

-अमोनियाचा ऱ्हास टाळण्यासाठी खते जमिनीच्या पृष्ठभागावर न टाकता ताबडतोब मातीत मिसळली

जावीत.

-जमिनीत योग्य ओलावा असणे अथवा खते दिल्यावर जमिनीस पाणी देणे महत्त्वाचे ठरते. तसेच

अमोनियाद्वारे होणारा नत्राचा ऱ्हास टाळण्यासाठी युरिया हा म्युरेट ऑफ पोटॅश, कॅल्शियम

क्लोराईड किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट खतासोबत मिसळून द्यावा.

-दाणेदार युरिया, गंधकाचे आवरण असलेला युरिया व नीम आवरण असलेल्या युरियाच्या वापराने या खताची उपयोगिता वाढविता येते.

संपर्क- मयुरी देशमुख, ९२८४५२२२८४ (सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, जळगाव.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT