Soil Testing : नव्या फळबाग लागवडीपूर्वी मातीचे परीक्षण गरजेचे

नवी फळबाग लागवड करताना मातीच्या विविध घटकांचा विचार व पिकांची योग्य निवड या बाबी महत्त्वाच्या आहेत. तसेच शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने माती परिक्षण करून त्यांचे गुणधर्म तपासून मगच लागवडीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
Soil Testing
Soil TestingAgrowon

डॉ. संजय भोयर, डॉ. ज्ञानेश्‍वर कंकाळ, डॉ. विशाखा डोंगरे

New Orchard Cultivation : नवी फळबाग लागवड करताना ती अनेक वर्षे उत्पादन देत राहील याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. फळबागेखाली असलेले क्षेत्र, मशागत, लागवडीपासून जोपासना करण्यासाठी सुरुवातीची सुमारे चार ते पाच वर्षे होणारा लाखो रुपयांचा खर्च या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

सर्वच शेतजमिनीत (Agriculture Land) सर्व प्रकारची फळपिके स्थापित होत नसतात. उगवण होणे व वाढ होणे ही नैसर्गिक प्रक्रिया सर्वच प्रकारच्या जमिनीत घडून येते. किंबहुना, सुरुवातीची चार ते पाच वर्षे फळझाडे चांगली वाढलेली

दिसतात. मात्र केवळ लागवड करणे हा आपला हेतू नसून त्यापासून चांगले उत्पादन मिळणे हे महत्त्वाचे असते. अयोग्य जमिनीत कालांतराने फळांना बहर किंवा फुलधारणा न होणे, झाडांची योग्य वाढ न होणे, झाडे अकाली वाळणे, त्यांना फळे न लागणे, त्यापासून अपेक्षित उत्पादन न मिळणे आदी समस्या दिसू लागतात.

बहरासाठी ताण आवश्यक असणारी फळझाडे उदा. लिंबूवर्गीय (संत्रा, मोसंबी, लिंबू इत्यादी), आंबा, डाळिंब (Pomegranate) आदी पिकांमध्ये अशा समस्या प्रामुख्याने दिसून येतात. परंतु त्या दिसून येईपर्यंत चार ते पाच वर्षांचा कालावधी निघून गेलेला असतो.

आपली लाखो रुपयांची गुंतवणूक झालेली असते. त्यानंतरही झाडांना फळे का येत नाहीत किंवा अपेक्षित उत्पादन का येत नाही याची शास्त्रीय शहानिशा न करता उपाययोजना करण्यासाठी काही वेळा अनावश्यक खर्च होऊन जातो.

पण मुळात आपली जमीन त्या फळांसाठी योग्य आहे की नाही हेच तपासलेले नसते. पर्यायाने लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली फळबाग काढून टाकण्याची वेळ येते. म्हणूनच नवी फळबाग लागवड (Orchard Cultivation) करताना कोणतीही घाई करू नये.

ती विशिष्ट फळपिकासाठी योग्य आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी त्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्याचा अभ्यास करावा.

Soil Testing
Horticulture Scheme : फळबाग लागवड योजनेसाठी ८१८ शेतकऱ्यांची निवड

नव्या लागवडीसाठी मातीचे गुणधर्म

ठरावीक फळझाडांची निवड किंवा नवी लागवड करण्यासाठी मातीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म विचारात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करण्याची गरज नाही. यामध्ये खालील गुणधर्मांचा समावेश होतो.

१. मातीची खोली: फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल मातीची जमीन असणे आवश्यक आहे. ही खोली कमीत कमी ९० सेंमी ते जास्तीत जास्त १२० सेंमी असणे आवश्यक आहे. केवळ एक फूट खोलीपर्यंतच माती असलेल्या उथळ जमिनीत एक फुटानंतर खालील थरात कठीण खडक लागल्यास पिकाची मुळे खोल जात नाहीत.

त्यामुळे पिकाला पोषक अन्नद्रव्ये व पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. अति खोल म्हणजे १२० सेंमीपेक्षा जास्त खोलीपर्यंत निव्वळ मातीच असलेल्या जमिनीसुद्धा फळझाडांसाठी योग्य मानल्या जात नाहीत.

अशा जमिनीत खालच्या थरात मुरूम किंवा खडक नसल्यामुळे फळझाडांच्या मुळांची पकड नुसत्या मातीमध्ये घट्ट राहत नाही; आणि मोठी फळझाडे वादळामध्ये उन्मळून पडतात.

२. मातीतील निचरा: मातीतून होणारा पाण्याचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. तो चांगला होत नसल्यास अशा जमिनीत पावसाळ्यात पाण्याची पातळी जास्त कालावधीपर्यंत वर असते, त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा नियमित होत नाही आणि मातीतून रोगांचा प्रादुर्भाव होतो.

३. मातीचा पोत : फळझाडे मध्यम ते भारी पोत असलेल्या चिकण, वालुकामय पोयटा किंवा पोयटा आदी विविध प्रकारच्या मातीत घेतली जातात. मात्र बहुतेक फळपिकांसाठी पोयटा किंवा वालुकामय पोयटा या प्रकारचा पोत असलेली माती सर्वोत्तम मानली जाते.

फळबागेच्या जागेवर किमान तीन ते चार फूट वरच्या थरात एकसमान माती असावी, ज्यावर फळझाडे चांगली उगवतील व जगतील. काजू, नारळ आदी फळपिकांसाठी वालुकामय पोयटा प्रकारच्या मातीचा योग्य वापर करता येतो. काजू, आंबा, फणस आदींसाठी नरम लाल मुरमाड माती असलेली जमीन अनुकूल ठरते.

केळी, पपई, चिकू, आदींसाठी पोयटायुक्त माती योग्य असते. मात्र कमी सुपीकता असलेल्या बागायती जमिनीत हिरवळीची खते, आंतरपिके, सेंद्रिय खते, बाहेरून चांगली माती आणून फळझाडांसाठीचे खड्डे भरणे अशा प्रकारे माती व्यवस्थापन करता येते. त्याद्वारे यशस्वी लागवड करता येते.

४. जमिनीचा उतार : फळबागेसाठी शक्यतो उंच-सखल जमिनीऐवजी सपाट जमीन निवडावी. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सपाटीकरण आणि ठिबक सिंचन यासारख्या उपाययोजना करून व्यवस्थापन करता येते.

मातीचे रासायनिक गुणधर्म

नवी लागवड करण्यापूर्वी मातीतील खालील रासायनिक गुणधर्म प्रयोगशाळेत तपासणे आवश्यक आहे.

१. मुक्त चुनखडीचे प्रमाण : हे प्रमाण फळबागेसाठी जमिनीची योग्यता ठरविण्याचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म आहे. ज्या जमिनीत हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या बहरासाठी ताण आवश्यक असणाऱ्या फळपिकांसाठी अयोग्य असतात.

अशा चुनखडीयुक्त जमिनीत अजिबात फूल वा फळधारणा होत नाही. अशा जमिनी विम्लधर्मी बनतात. त्यांचा सामू ८.५ पेक्षा जास्त होऊ शकतो. चुनखडीयुक्त भारी जमिनीत स्फुरदाची (फॉस्फरसची) विद्राव्यता घटून उपलब्धता कमी होते.

पालाशचे विनियमन कॅल्शिअम सोबत होऊन पालाशची उपलब्धताही कमी होते. याशिवाय जस्त (झिंक) या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. खतांमधून जमिनीत दिलेले लोह हे महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीत स्थिर होते व पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही.

मुक्त चुनखडीमुळे जमीन दीर्घ कालावधीपर्यंत ओलसर राहातात. त्यामुळे फायटोप्थोरासारख्या घातक बुरशी पिकाच्या मुळांवर सहजपणे हल्ला करतात. अशा कारणांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

२. मातीचा सामू (पीएच) व आम्ल विम्ल निर्देशांक - फळपिकांसाठी ६.५ ते ८.५ या दरम्यान असणाऱ्या सामूची जमीन योग्य मानली जाते. अति आम्लधर्मी आणि अति विम्लधर्मी जमीन अनेक फळपिकांसाठी अयोग्य असते.

३. मातीची क्षारता किंवा विद्युत वाहकता : सर्वसाधारणपणे १.०० डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी क्षारता असलेल्या जमिनी असल्यास त्या फळबाग लागवडीसाठी योग्य, तर त्यापेक्षा जास्त क्षारता असलेल्या जमिनी लागवडीसाठी अयोग्य असतात.

Soil Testing
Banana Crop Insurance : फळबाग पडताळणीत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा सव्वा कोटी रुपये हप्ता जप्त

मातीचा नमुना घेण्याची पद्धत

विशिष्ट फळबाग लागवडीसाठी तीचा नमुना घेण्याची पद्धत हंगामी पिकांसाठी असलेल्या प्रातिनिधिक नमुना घेण्याच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

जमिनीच्या प्रकारानुसार किंवा गुणधर्मानुसार सर्वप्रथम जमिनीचा रंग, चढ-उतार, खोली आदी बाबींमधील फरक लक्षात घ्यावा. त्यानुसार सारखे गुणधर्म असलेल्या शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत. एकसारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या एक ते दोन हेक्‍टर क्षेत्राचे भाग पाडावेत.

त्या भागाला स्वतंत्र शेत गृहीत धरून निवडलेल्या भागातून जमिनीच्या उभ्या छेदाचा (प्रोफाइलचा) स्वतंत्र नमुना घ्यावा. शेतातील माती एकसारखे गुणधर्म असणारी असल्यास असे वेगळे भाग न करता अशा शेतामधून एकच ‘प्रोफाइल’ नमुना घ्यावा.

वरीलप्रमाणे सारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या मध्यभागी ९० सेंमी (३ फूट) खोल अथवा कठीण मुरूम अथवा खडक लागेपर्यंत यापैकी जे कमी असेल तेवढा खोल खड्डा खणावा. त्यामधून मातीचा नमुना घ्यावा. प्रत्येक एक फूट खोलीसाठी एक याप्रमाणे तीन वेगवेगळे नमुने घ्यावेत.

खड्डा खणून पूर्ण झाल्यावर त्यातील सर्व माती प्रथम बाहेर काढून टाकावी. ती नमुन्यासाठी घेऊ नये. या खड्ड्याच्या पृष्ठभागापासून तळाकडे ० ते ३० सेंमी (वरील १ फूट), ३० ते ६० सेंमी (दुसरा फूट) आणि ६० ते ९० सेंमी (तिसरा फूट) असे तीन वेगवेगळे भाग पाडावेत.

त्यासाठी पृष्ठभागापासून खाली ३० सेंमी, ६० सेंमी आणि ९० सेंमी अंतरावर प्रत्येकी एक लाकडी खुंटी ठोकावी.

त्यानंतर सर्वप्रथम तिसऱ्या थरासाठी ६० सेंमीच्या खुंटीपासून खड्ड्याच्या तळापर्यंत अथवा मुरूम लागला असेल त्या खोलीपर्यंतच्या खड्ड्याच्या कडेची दोन ते तीन सेंमी जाडीची मातीची चकती किंवा खाप स्वच्छ खुरपीच्या साह्याने खरवडून घ्यावी. घमेल्यात गोळा करावी. ती एकत्र मिसळावी. त्यातील अर्धा ते पाऊण किलो माती तपासणीसाठी घ्यावी.

नमुने प्रयोगशाळेत पाठवताना...

त्यानंतर दुसऱ्या थरातील खोलीसाठी ३० सेंमी वर असलेल्या खुंटीपासून ६० सेंमीवरील खुंटीदरम्यानची माती वरीलप्रमाणे खरवडून घमेल्यात पाडावी. ती चांगली एकत्र करून त्यातील अर्धा ते पाऊण किलो तपासणीसाठी घ्यावी.

शेवटी सर्वांत वरच्या म्हणजे पहिल्या थरासाठी पृष्ठभागापासून खाली ३० सेंमीवर असलेल्या खुंटीपर्यंतची माती अशाच पद्धतीने घमेल्यात घ्यावी. काही शेतकरी तीन फूट खोल खड्ड्यातील माती एकत्र करतात.

परंतु फळबागेसाठी प्रत्येक एक फुटावरील थरातील गुणधर्म वेगवेगळे असल्याने वरीलप्रमाणे घेतलेले मातीचे तीनही नमुने तीन वेगवेगळ्या पिशव्यांत भरावेत. ते एकत्र अजिबात मिसळू नयेत. सोबतच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे तीनही नमुन्यांना वेगवेगळे क्रमांक द्यावेत.

त्यामध्ये वरच्या पहिल्या थरातील नमुन्याला नमुना क्र. १, दुसऱ्या थरातील नमुन्याला नमुना क्र. २, आणि तिसऱ्या थरातील नमुन्याला नमुना क्र. ३ असे क्रमांक नोंदवून तशा चिठ्ठ्या त्या त्या पिशवीत काळजीपूर्वक टाकाव्यात. अशाप्रकारे मातीच्या नमुन्यांसोबत शेतकऱ्याचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, शेताचे ठिकाण, गट क्रमांक नमुना घेतल्याची तारीख, घ्यावयाचे फळपीक आदी माहिती लिहून नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत.

विद्यापीठातही सोय उपलब्ध

उत्पादन देणाऱ्या उभ्या फळबागेतील अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण करावयाचे असल्यास त्यासाठी मातीचा नमुना घेण्याची पद्धतही अन्य पद्धतींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे तसेच कृषी महाविद्यालय, महाराज बाग, नागपूर येथे विद्यापीठाच्या प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी माफक शुल्क आकारून माती परीक्षण करून दिले जाते.

संपर्क - डॉ. ज्ञानेश्‍वर कंकाळ, ०८२७५१५२५५७ (लेखक मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com