Milk Production: जास्त दूध देणारी कालवड मिळवण्यासाठी काय करावे?

कालवड संगोपनाचा विचार आपण नेहमी कालवड जन्माला आल्यानंतर करतो. खरे तर कालवड जन्माला येतानाच तिची जनुकीय क्षमता आपल्याला माहिती असायला हवी.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. गोपाल गोवणे, डॉ. सचिन रहाणे

दुग्ध उत्पादन व्यवसायामध्ये (Dairy business) आर्थिक आकलन आणि पशुप्रजननाचे नियम महत्त्वाचे आहेत. कुठल्याही गोठ्यामध्ये कालवड ही भविष्यातील संभाव्य उच्च जनुकीय दर्जाच्या गाईंमध्ये परिवर्तित होण्याची क्षमता ठेवते.

भविष्यामध्ये उच्च दर्जाचे जनुकीय पशुधन (cattle wealth) जर गोठ्यामध्ये हवे असेल तर जन्मतःच आपल्या गोठ्यात उच्च दर्जाच्या कालवडी तयार होणे गरजेचे आहे. दर पिढीमधील गुणांचा वारसा अभ्यासून वंशावळीमध्ये सुधारणा करावी. हा वारसा उच्च दर्जाचा असावा.

कालवड संगोपनाचा (Calvad Sangopan) विचार आपण नेहमी कालवड जन्माला आल्यानंतर करतो. खरे तर कालवड जन्माला येतानाच तिची जनुकीय क्षमता आपल्याला माहिती असावी. यासाठी गोपैदासीचे धोरण ठरवून त्यानुसार ठराविक कालमर्यादेत विविध उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी उत्तम गाय आणि वळू निवडून पुढील पिढी तयार करावी लागते.

पशुप्रजनन प्रक्रियेतील धोरण ः

- गोपैदाशीचे धोरण आणि त्यांची उद्दिष्ट्ये साध्य करणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता गोठ्यामध्ये सध्या कोणत्या गाई, म्हशी आहेत, त्यांची गुणवत्ता किती? याचे संपूर्ण ज्ञान असावे.

- वर्तमानातील स्थितीचा योग्य आढावा आल्यास भविष्यामध्ये काय आणि किती सुधार करू शकतो, याची कल्पना येते. गोठ्यात प्रजनन तंत्रज्ञानाची दिशा आपल्याला निर्धारित करावी लागेल.

प्रजनन ध्येय ः

- गोपैदाशीचे धोरण राबविण्याकरिता प्रजनन ध्येयांची मांडणी करावी. प्रजनन ध्येय ठरविताना कोणती गुण-वैशिष्ट्ये फायदेशीर आहेत आणि कशी साध्य करता येतील याचा आराखडा तयार करावा.

- एकापेक्षा अधिक गुणांची वृद्धी गोठ्यात करणे कठीण काम आहे. त्यासाठी कालबद्ध प्रजनन कार्यक्रम राबवावा. त्वरित साध्य करण्याची आणि दीर्घ मुदतीत साध्य करावयाची उद्दिष्ट्ये वर्गवारी करून ठरवावीत.

Animal Care
Desi Cow Conservation : निष्णात वैद्यकाचे वनशेती आणि देशी गोवंश संवर्धनाचे प्रयोग

तत्काळ साध्य करायचे ध्येय ः

- दुग्ध व्यवसाय आधारित पशुपालनासाठी तत्काळ उद्दिष्ट हे दूध उत्पादन वाढविण्याचे असते. आज गोठ्यात असणाऱ्या गाईंपेक्षा येणाऱ्या पिढींमध्ये जास्त दूध उत्पादन क्षमता वाढविणे हेच प्रमुख ध्येय असावे. परंतु हे उत्पादन किती वाढणार हे फक्त उच्च जनुकीय क्षमताच नव्हे तर त्यासोबत लागणारे वातावरणसुद्धा निर्धारित करते.

- उत्तम प्रतीचा चारा, गोठा, मनुष्यबळ आणि यंत्रबळाची उपलब्ध असेल तर तत्काळ दुग्ध उत्पादन वाढविणे शक्य आहे.

मध्यम मुदतीत साध्य करावयाचे ध्येय ः

- अधिक दुग्धउप्तादन वाढीबरोबर गाईंमध्ये काही समस्या जाणवू लागतात. त्यामुळे वाढलेले उत्पादन त्याच स्तरावर ठेवणे किंवा आणखी उत्पादन स्तर वाढविणे हे आव्हान असते.

- वाढलेल्या दूध उत्पादनसोबत निगडित वैशिष्ट्यांचे व्यवस्थापन करावे. दुधामधील स्निग्धांश, एसएनएफ आणि प्रथिने यांचा समतोल साधावा.

- दुग्ध व्यवसायामध्ये स्निग्धांश महत्त्वाचा आहे. या घटकांमध्ये घट फायद्याची नाही. सतत सुधार करताना सोमॅटिक सेल काऊंट नियंत्रित ठेवावा. कासदाह तसेच इतर आजारांचे प्रमाण कमी करावे.

- गाईंची प्रजनन क्षमता वाढविणे महत्त्वाचे आहे.

- सर्व ध्येयांची पुर्तता तीन ते चार पिढ्यांमध्ये साध्य करावी. पशुधन आणि पुनरुत्पादन करताना जातीविशेष गुणधर्मांमध्ये कमी असणे अपेक्षित नाही.

दीर्घ मुदतीमध्ये साध्य करावयाची उद्दिष्ट्ये ः

- येणाऱ्या सात ते आठ पिढ्यांमध्ये आपल्या गोठ्यात उच्च गुणवत्ता असलेली गाय तयार करावी. ही गाय निरोगी तसेच शुद्ध प्रजातीची असावी.

- शरीराची बांधणी शुद्ध प्रजातीची असावी. शरीर नेहमी मध्यम आकाराचे असावे. गाईची चाऱ्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असावी. गाय किती चपळ आणि व्यवस्थापन सुलभ राहील याचा विचार करावा.

- यंत्राद्वारे दूध काढणे महत्त्वाचे आहे. यासाठी कासेचा आकार, बांधणी, सडांची ठेवण, लांबी, रुंदी तसेच कासेचा सर्वोपरी अभ्यास करून त्यांचा दूध उत्पादनावर प्रभाव आणि त्यांचा प्रजनन विज्ञानामध्ये समावेश दीर्घकाळात अतिशय आवश्यक आहे.

- गाईचे प्रजनन सुलभ असावे. दीर्घ काळात प्रजनन ध्येयांमध्ये वासरांची मरतूक कमी करणे गरजेचे आहे. कमी वयात जास्त वेतांचे दूध तसेच संतती तयार करणारी गाय भविष्यात गरजेची आहे.

निवड प्रक्रिया ः

आनुवंशिक सुधारामध्ये निवड प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. उच्च गुणवत्तेकरिता जातिवंत वळू आणि गाईच्या पोटी कालवड जन्माला येणे गरजेचे आहे. यासाठी गाय, वळूची निवड अभ्यासपूर्वक करावी.

गाईची निवड ः

- फक्त दूध उत्पादन न बघता जातीचे गुणधर्म, शरीराची ठेवण, आरोग्य प्रजनन क्षमता, इत्यादी गोष्टींचे लक्ष द्यावे.

- शरीराचा रंग, बांधणी, तिच्या जाती जाती वैशिष्ट्यांप्रमाणेच असावे. त्वचा चमकदार असावी, मान पातळ असावी, पाय सरळ व मजबूत असावे. पुढील दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर असावे.

- कास आकाराने मोठी असावी. त्वचा मऊ असावी. त्यावर रक्तवाहिन्यांचे जाळे भरपूर असावे. पुढील बाजूला कास शरीराबरोबर सरळ जोडलेली असावी.

कास लोंबणारी नसावी, सड एकसारखे असावेत. गाय कमी आजारी पडणारी, कासदाह न होणारी, वेळेत माजावर येणारी, शांत व सहज दूध काढू देणारी असावी.

- गोठ्यात उच्च उत्पादकता असलेल्या गाई नसतील, तर सध्या उपलब्ध असलेले भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान किंवा लिंगवर्गीकृत रेतमात्रांचा वापर करून योग्य प्रजनन कार्यक्रम राबवावा.

वळूची निवड ः

- वळूचे व्यवस्थापन, निवड या गोष्टी सरकारी, नीम-सरकारी तसेच खासगी संस्था करतात.निवडक वळूंमधून आपण कुठल्या वळूच्या रेतमात्रा वापरणार आहोत हे पशुपालकांनी गोपैदाशीचे ध्येय व धोरण पाहून ठरवावे.

- वळू निवड करताना तो कुठल्या जातीचा आहे हे माहिती असणे आवश्यक असते. रेतमात्रा निवडताना आपल्याकडे असलेल्या गाईंची जात, त्यांची उत्पादनक्षमता माहिती असावी.

- कृत्रिम रेतनाकरिता वळूच्या दुग्धोत्पादन क्षमतेची पैदास गुणांकन क्षमता ही गोठ्यात असणाऱ्या गायींच्या पैदास गुणांकन क्षमतेपेक्षा जास्त असावी.

Animal Care
Lumpy Skin : गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्याची गरज ः रघुनाथदादा

- वळू निवडताना तो सिद्ध आहे किंवा नाही याची खात्री करावी. सर्वोत्तम वळूच्या रेतमात्रा निवडाव्यात.

- वळूची निवड करताना त्याच्या मातेचे दूध उत्पादन तसेच इतर आनुवंशिक गुणधर्म तपासावेत. यामध्ये वळूच्या कालवडींची शारीरिक ठेवण, कासेचा आकार, सडांची लांबी, कासदाहाचा त्रास, इत्यादी.

- योग्य वळूंची निवड केल्यास गाईंमधील नको असलेले गुणधर्म कमी होऊन आवश्यक ते गुण कालवडींमध्ये येतात.

संपर्क ः डॉ. गोपाल गोवणे, ८८३००८१३१३ (वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना)

डॉ. सचिन रहाणे, ९९७५१७५२०५ (पशुधन विकास अधिकारी, डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com