Okra Production Management
Okra Production Management Agrowon
ॲग्रो गाईड

Lady Finger Production Management : भेंडी उत्पादनात अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं?

Team Agrowon

डॉ. साबळे पी. ए., डॉ. जी. एस. पटेल, डॉ. पीयूष वर्मा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील हवामान भेंडीच्या लागवडीस (Okra Cultivation) पोषक असून, पावसाळी आणि उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करता येते. उन्हाळी हंगामासाठी भेंडी लागवड १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर या कालावधी पूर्ण झालेली असेल. मुळात भेंडी या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते.

विशेषतः २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल, तर बियांची उगवण चांगली होत नाही. तसेच तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते.

जमीन : भेंडीसाठी कसदार किंवा पोयट्याची, चांगल्या निचऱ्याची, सामू ६ ते ७ दरम्यान असलेली जमीन योग्य मानली जाते. जमिनीत सेंद्रिय व जैविक खताचा वापर करावा.

बियाणे व बीजप्रक्रिया : हंगामानुसार प्रति हेक्टरी १०-१२ किलो बियाणे लागते. जिवाणू खतांचा वापर केल्यास पीक उत्पादनात ७ ते १० टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. बियाण्याला ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) या संवर्धकांची प्रति किलो २५ ग्रॅम या प्रमाणे प्रक्रिया करावी.

बियाणे सावलीत वाळवून त्वरित वापरावे. बीजप्रक्रिया करताना जैविक घटक बियाण्यावर हाताने जोरात चोळू नये. बियाण्याचे बाहेरील नाजूक आवरण निघून बियाण्याची उगवणक्षमता कमी होते. म्हणून बियाणे प्लॅस्टिक पिशवीवर किंवा गोणीवर पातळ थरामध्ये पसरावे.

त्यावर संवर्धके टाकून प्लॅस्टिक पिशवी किंवा गोणी दोन व्यक्तींच्या साह्याने टोके धरून अलगद हलवावी. यामुळे संवर्धकाचा लेप बियाण्यावर एकसारखा चिकटण्यास मदत होते. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे २४ तासांच्या आत पेरावे.

या प्रक्रियेमुळे नत्र व स्फुरदयुक्त खतांच्या मात्रेमध्ये सुमारे २५ ते ३० टक्के बचत होते. रासायनिक खत किंवा रासायनिक घटकांबरोबर जिवाणू संवर्धक मिसळू नयेत किंवा जैविक प्रक्रियेनंतर रासायनिक बीज प्रक्रिया करू नये.

लागवड : साधारणतः ३० ते ६० × १५ते ३० सें.मी. अंतरावर भेंडीची करता येते. उच्च प्रतिची गुणवत्ता आणि हिरव्या-कोवळ्या, लुसलुशीत भेंडी फळांची नियमित तोडणी करण्याच्या उद्देशाने लागवड ४०× १० किंवा ४५ × २० सेंमी अंतरावर करणे फायदेशीर दिसून आले आहे.

वाण : फुले उत्कर्षा, फुले विमुक्ता, गुजरात आनंद भेंडी ५, काशी लालिमा (लाल भेंडी), इ.

जातीपरत्वे, जमिनीतील ओलावा, हंगाम इ. नुसार सर्वसाधारणपणे आठवड्याने बी उगवण्यास सुरुवात होते आणि १०-१२ दिवसांपर्यंत सर्व बिया उगवतात.

ज्या ठिकाणी बी उगवले नसेल, त्या ठिकाणी राखून ठेवलेले त्याच वाणाचे बियाणे नांग्या भरण्यासाठी वापरावे. लगेच पाणी द्यावे. बियाणे उगविण्यासाठी संरक्षित पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन :

पिकाच्या उत्पादकता वाढीसह जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यासाठी माती परीक्षणानुसार सेंद्रिय, जिवाणू आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. माती परीक्षणामध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो/ हे.) मध्यम प्रमाणात असल्यास शिफारशीत खतमात्रा द्यावी.

त्यापेक्षा कमी किंवा अत्यंत कमी असल्यास शिफारशीपेक्षा अनुक्रमे २५ टक्के किंवा ५० टक्के अधिक खतमात्रा द्यावी. उपलब्ध अन्नद्रव्ये जास्त किंवा अत्यंत जास्त असल्यास शिफारशीपेक्षा अनुक्रमे २५ टक्के किंवा ५० टक्के कमी खतमात्रा द्यावी.

सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन

१) सेंद्रिय कर्ब जमिनीच्या भौतिक गुणधर्माशी निगडित असून, ते जमिनीचे गुणधर्म संतुलित ठेवण्याचे कार्य करते.

२) सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढते. परिणामी जमिनीत जिवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढते. त्याद्वारे पिकांना अन्नद्रव्याची उपलब्धता केली जाते.

३) जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खते, भरखते व जिवाणूखते वापरावीत. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत या भरखतांचा आणि निंबोळी पेंड अशा जोरखताचा वापर करता येतो. हेक्टरी २० टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे.

जमिनीत निसर्गतः असलेले अनेक प्रकारचे जिवाणू व ॲक्टिनोमायसीट्स हे अद्राव्य स्वरूपात स्थिर झालेले स्फुरद विरघळून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करतात. पिकांसाठी आवश्यक असलेले वाढवर्धक द्रव्ये तयार करण्याचे कार्यदेखील हे सूक्ष्मजीव करत असतात.

पिकासाठी जमिनीत उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढविण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करावा. एकरी ट्रायकोडर्मा २.४ किलो, ॲझोटोबॅक्टर १ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.) १ किलो या प्रमाणे सेंद्रिय खतात एक आठवडा मुरवून वापरावे.

कोणतीही जैविक संवर्धने रासायनिक खते, कीडनाशक आणि बुरशीनाशकांबरोबर एकत्र देऊ नयेत. साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रेनंतर आठवड्याने द्यावीत. जर जैविक संवर्धने द्रव स्वरूपात असतील तर ठिबक सिंचनाद्वारे देखील देऊ शकतो.

४) हेक्टरी २५० किलो निंबोळी पेंड देखील मातीत मिसळून द्यावी. हेक्टरी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) द्यावे.

नत्र खताच्या एकूण मात्रेपैकी अर्धे नत्र ५० किलो (युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडी वेळी द्यावे. उर्वरित अर्धे नत्र ५० किलो (युरिया १०९ किलो) लागवडीनंतर १, १.५ आणि २ महिन्यांनी तीन समान हप्त्यांत विभागून द्यावे. माती परीक्षणानुसार खतमात्रेमध्ये योग्य ते बदल करावेत.

५) पिकाच्या वाढ आणि विकासासाठी लोह, जस्त, मँगेनीज, बोरॉन इ. सूक्ष्म अन्नद्रव्ये अल्प प्रमाणात मात्र अत्यावश्यक असतात. त्यांच्या कमतरतेमुळे वनस्पती-शरीर व चयापचय प्रक्रियेत बदल होऊन उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होतो.

माती परीक्षणावर आधारित सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी असलेल्या जमिनीत फेरस सल्फेट व झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो आणि बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे. किंवा लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी ५ ग्रॅम आणि बोरीक ॲसिड २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड-४ (लोह ४ टक्के, जस्त ६ टक्के मँगेनीज १ टक्का तांबे ०.५ टक्का बोरॉन ०.५ टक्का) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. घटकांचे वेगवेगळे प्रमाण असलेले सूक्ष्म अन्नद्रव्यांची विविध मिश्रणे उपलब्ध असून त्यातील घटकांच्या प्रमाणानुसार फवारणीचे प्रमाण बदलू शकते. त्यामुळे आवश्यक तिथे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

भेंडी लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी १९:१९:१९ (०.५ %) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास अधिक उत्पादनात मिळते. पाण्यात विरघळणाऱ्या पोषण तत्त्वांची फवारणी करताना शिफारशीत प्रमाणात चिकट द्रव्याचा वापर करावा. फळ तोडणीप्रमाणे १९:१९:१९ देण्याच्या वेळा वाढवत गेल्यास उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

पाणी व्यवस्थापन : हे हवामान आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. पहिले पाणी लागवडीनंतर लगेच आणि आंबवणीचे पाणी दुसऱ्या ते चौथ्या दिवसांनी द्यावे. हलक्या जमिनीसाठी ५ ते ७, तर भारी जमिनीसाठी ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर पाणी व खतांची ही बचत होते. उन्हाळ्यात जमिनीत पुरेसा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन वेळापत्रकाबरोबर १२-१५ दिवसांतून एकदा पाट पाणी द्यावे.

तण व्यवस्थापन/ आंतर मशागत

प्राथमिक अवस्थेत पिकात तण जागा, पाणी, अन्नद्रव्ये इत्यादींसाठी पिकाशी स्पर्धा करते. त्यामुळे या पीक-तण स्पर्धा काळात पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक असते. तणांच्या प्रादुर्भावानुसार आंतरमशागत आणि खुरपण्या कराव्यात. खुरपणीनंतर पिकास मातीची भर द्यावी.

तोडणी व उत्पादन

भेंडीचे उत्पादन जाती आणि संकर, लागवडीचे अंतर, जमीन व हवामान, पीक व्यवस्थापन इ घटकांवर अवलंबून असते. लागवडीपासून साधारणतः ४५ दिवसात भेंडीस फुले येण्यास सुरुवात होते. त्यानंतर आठवडाभरात फळे लागण्यास सुरुवात होते. काढणी सकाळच्या किंवा व संध्याकाळच्या वेळेत केल्यास फळे बराच काळ ताजी टवटवीत राहतात.

१०-१२ सें.मी. लांबीच्या हिरव्या-कोवळ्या, लुसलुशीत फळांची काढणी करावी. त्यासाठी एक दिवसाच्या अंतराने किंवा दररोज तोडणी गरजेची असते. भेंडी फळांवरील लव किंवा बारीक काट्यांमुळे हातांना होणारी इजा टाळण्यासाठी हातमोज्यांचा वापर करावा.

तोडणीला उशीर झाल्याने फळे टणक, तंतुमय बनतात. फळांचा कोवळेपणा कमी होऊन चवीवर परिणाम होतो. भेंडी पिकात जातीनुसार आणि पीक व्यवस्थापनानुसार साधारणतः १६ ते २० तोडण्या होतात. उन्हाळी हंगामात १५ ते २० टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.

संपर्क : डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२, (डॉ. साबळे व डॉ. पटेल हे सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात येथील उद्यानविद्या महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत, तर डॉ. पीयूष वर्षा हे प्रभारी प्राचार्य आणि अधिष्ठाता आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT