
गजानन तुपकर
Exportble Okra production : महाराष्ट्रात भेंडी पिकाखालील क्षेत्र ५,३०० हेक्टर असून, पुणे, जळगाव, धुळे, नगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भेंडीची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते, मात्र त्यासाठी पुढील निकष महत्त्वाचे ठरतात.
-भेंडी कोवळी, गर्द हिरवी, आकर्षक व लुसलुशीत असावी.
-फळांची लांबी ७.५ ते १० सें.मी. एवढी लांब, सरळ व पाचधारी असावी.
-फळांची टोके निमुळती, टवटवीत व देठासह असावीत. फळावर लव (केसासारखे मऊ काटे) असू नयेत.
-फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत सरळ व निरोगी असावा.
-कीडनाशकांचे रासायनिक अवशेष त्यामध्ये शिल्लक नसावेत.
वरील निकष पूर्ण करण्यासाठी लागवडीपासून सर्व अवस्थेत पिकाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. त्याची माहिती घेऊ.
जमीन : भेंडीसाठी कसदार किंवा पोयट्याची, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. सेंद्रिय खतांचा वापर करावा. जमिनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असावा.
हवामान ः
भेंडीला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर बियांची उगवण चांगली होत नाही. तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते.
सामान्यतः २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये हे पीक चांगले येते. अतिशय दमट हवेत पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. उन्हाळ्यातील हवामान भेंडीच्या वाढीस पोषक असून, उत्पादन चांगले मिळते.
संकरित भेंडी -
१) महाबीज ९१३ (तर्जनी) - या जातीची भेंडी ४५ ते ४६ दिवसांत तोडणीला येते. पिकाचा कालावधी १०० ते ११० दिवस आहे. फळे मध्यम लांब (१० ते १२ सेंमी) असून, सर्वसाधारणपणे एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन मिळते.
२) फुले कीर्ती - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसित या जातीची फळे हिरव्या रंगाची असतात. खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामामध्ये लागवडीसाठी योग्य जात आहे. ही जात केवडा रोगास प्रतिकारक्षम आहे.
बियाण्याची निवड :
विषाणूला प्रतिकारक, फळाला व देठाला हिरवा रंग असणारी, फळे पाचधारी असणारी, रोग व किडींना प्रतिकारक्षम, चांगले उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करावी.
बीज प्रक्रिया ः
बियाण्याची निवड केल्यानंतर बियाण्याची टोकण किंवा पेरणी करण्यापूर्वी २४ तास साध्या पाण्यात भिजत ठेवावेत. रोपे लवकर उगवून येतात. जोमदार वाढ होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
पूर्वमशागत :
प्रथम जमिनीची नांगरट करून ढेकळे फोडून घ्यावीत. त्या नंतर उभ्या-आडव्या दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर प्रति हेक्टर २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. म्हणजे ते जमिनीत चांगले मिसळले जाईल.
लागवड पद्धत : भेंडीची लागवड सरी वरंबा तसेच पट्टा पद्धतीने करतात. परंतु सरी वरंबा पद्धत ही प्रचलित व अधिक उत्पादनासाठी उपयुक्त आहे. भेंडीची लागवड करताना ६० सेंमीवर सरी पडून सरीच्या दोन्ही बाजूंस टोकण पद्धतीने ३० सेंमी अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी प्रति हेक्टरी १५ किलो बियाणे वापरावे. बियाणे लागवडीनंतर भरपूर पाणी द्यावे, म्हणजे मातीच्या चांगल्या ओलाव्यामुळे उगवण चांगल्या प्रकारे होते..
अ.क्र. --- हंगाम --- बी लागवडीचा काळ --- लागवड अंतर (सें.मी.)
१ --- खरीप --- जून – जुलै --- ६० × ३० सें. मी. किंवा ६० × ४५ सें. मी.
२ --- रब्बी --- थंडीच्या अगोदर --- ४५ × १५ सें. मी. किंवा ४५ × २० सें. मी. किंवा ६० × २० सें. मी.
३ --- उन्हाळी --- १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेरपर्यंत --- ४५ × १५ सें. मी. किंवा ६० × १५ सें. मी. किंवा ६० × २० सें. मी.
सिंचन व्यवस्थापन :
जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हंगामानुसार ५ ते ६ दिवसांच्या अंतराने भेंडीला पाणी द्यावे. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहण्यासाठी वाळलेल्या गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे आच्छादन दोन ओळींमध्ये घालावे. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो व पाण्यातही बचत होते.
जिथे ठिबक सिंचन असेल, त्या ठिकाणी ठिबक सिंचनाबरोबर वाहते पाणी १२ ते १३ व्या दिवशी दिल्यास उत्पादनात व गुणवत्तेत चांगली वाढ होते.
खत व्यवस्थापन :
१) सेंद्रिय खतांचा वापर ः
दर्जेदार व चांगल्या उत्पादनासाठी सेंद्रिय खते किंवा भरखते देणे आवश्यक. हेक्टरी २५ टन शेणखत टाकून मातीत एकत्र करून घ्यावे. किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा. भेंडी लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा या हिरवळीच्या पिकाची लागवड करून ते जमिनीत गाडावे.
२) रासायनिक खते ः
लागवडीपूर्वी रासायनिक खतांचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव अधिक होऊन झाडांच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा. अन्यथा भेंडीची शाखीय वाढ जास्त होते व फलधारणा कमी होते. यासाठी वातावरण व वाढीची अवस्था पाहूनच खतांचा वापर करावा.
लागवडीचे वेळी (प्रति एकरी)
१०:२६:२६ हे खत १०० किलो + अमोनिअम सल्फेट २० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्य ८ किलो
लागवडीनंतर ३० दिवसांनी
म्युरेट ऑफ पोटॅश ४० किलो + दुय्यम अन्नद्रव्य ३० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्य ८ किलो
आंतरमशागत : कीड व रोग आटोक्यात आणण्यासाठी व झाडाची वाढ एक समान होण्यासाठी खुरपणी महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या महिन्यात दोन वेळा व भेंडी तोडणी चालू झाल्यानंतर दोन वेळा खुरपणी करावी.
वाण
सुधारित वाण ः अर्का अनामिका, फुले विमुक्ता, परभणी क्रांती, अर्का अभय इ.
संकरित वाण ः महाबीज ९१३ (तर्जनी), फुले कीर्ती इ.
१) अर्का अनामिका - आय. आय. एच. आर., बंगळूर येथे विकसित या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामांत लागवडीस योग्य आहे.
२) परभणी क्रांती - फळे व ८ ते १० सेमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामांत लागवडीस योग्य जात.
३) अर्का अभय - फळे अर्का अनामिकासारखी दिसतात. विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून, दोन बहर मिळतात.
४) पुसा सावनी - भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसित या जातीची फळे १० ते १५ सेंमी लांब असून, झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून, त्यावर तांबूस छटा असतात. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामांत लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून, फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.
गजानन तुपकर, ८२७५४१२०६४, (विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.