Water Purification Agrowon
ॲग्रो गाईड

Water Purification : पाणी शुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती

Techniques For Purifying Water : पावसाळ्यात गढूळ पाण्याचा समस्या मोठी असते. अशा स्थितीमध्ये शेत परिसरामध्ये उपलब्ध वनस्पती व अन्य नैसर्गिक साधनांच्या साह्याने पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती अत्यंत फायद्याच्या ठरू शकतात.

Team Agrowon

सतीश खाडे

Natural Methods for Water Purification : पावसाळ्यात गढूळ पाण्याचा समस्या मोठी असते. अशा स्थितीमध्ये शेत परिसरामध्ये उपलब्ध वनस्पती व अन्य नैसर्गिक साधनांच्या साह्याने पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती अत्यंत फायद्याच्या ठरू शकतात.

पावसाळा सुरू झाला की शुद्ध पाण्याची उपलब्धता ही एक समस्या ठरते. कारण सुरवातीच्या काळामध्ये नदी, नाले, तलाव यातील पाणी गढूळ असते. त्यातही लोकवस्तीच्या जमिनीवरून वाहून येताना पावसाचे पाणीही बरेचसे प्रदूषणही घेऊन येते. शहरामध्ये तरी शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी काही योजना असतात. तसेच स्वतःच्या घरी उत्तम फिल्टर बसवणे शक्य असते.

मात्र ग्रामीण भागामध्ये लोकांना आर्थिक स्थितीमध्ये ते परवडणारे ठरत नाही. तेव्हा उपलब्ध असलेले पाणी पिण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये शेत परिसरामध्ये उपलब्ध नैसर्गिक साधनांच्या साह्याने पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती अत्यंत फायद्याच्या ठरू शकतात. या लेखामध्ये त्याची माहिती घेऊ.

पाणी शुद्धीकरणासाठी पाणी उकळून घेणे, पाण्यात तप्त लोह गोळा टाकणे, वाळूतून पाणी गाळणे या पारंपरिक उपायांप्रमाणेच अनेक लोक वनस्पतिजन्य पदार्थांची गाळणीही वापरताना दिसतात. आपल्या परिसरामध्ये असलेल्या वनस्पती उदा. तुळशी, आवळा, अंजन, हिरडा, बेहडा, धामीण, वेलदोडा, ज्वारी, लाल अंबाडी, मसूर, कापूस, मेथी, उडीद, वाळा, कमळ, गवारीची शेंग, शेवगा, निर्मळी या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त आहेत. पुणे येथील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेमधील शास्त्रज्ञ (आता निवृत्त) डॉ. प्रमोद मोघे यांनी यातील काही पर्यायांची प्रयोग करून पडताळणी व चिकित्सा प्रयोगशाळेत सुमारे वीस वर्षापूर्वी केली आहे.

त्यामध्ये या वनस्पतींच्या साह्याने पाणी शुद्ध होते का? झाले तर किती प्रमाणात होते? त्याला किती वेळ लागतो? एका लिटर पाण्याचे शुद्धीकरणाला किती ग्रॅम वनस्पतिजन्य घटक लागतो? त्यातही त्या वनस्पतीच्या कोणत्या अवयवाचा (मूळ, खोड, साल, पान, फूल, फळ या पैकी) वापर जास्त प्रभावी ठरतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला. या शुद्धीकरण प्रक्रियेच्या प्रमाणीकरणासाठी बरेच परिश्रम घेतले.

सर्वत्र मुबलक उपलब्ध असलेला शेवगा बिया पाणी शुद्ध करणाऱ्या आहेत. शेवग्याच्या बियांची एक ग्रॅम पावडर एक लिटर पाणी निर्जंतुक करते. पाण्यातील क्षार (म्हणजेच टीडीएस) कमी करते. पाण्यातील गाळ खाली बसवत असल्याने तुरटीचेही काम करते. आणि सर्वात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे शेवग्याची पावडर ही पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण खूप कमी करते.

कोणत्याही पाण्यातील फ्लोराईडची मात्रा एक ते दीड मिलिग्रॅम प्रति लिटर असल्यास ती आपल्या प्रकृतीला अत्यंत घातक असते. पण दीड मिलिग्रॅम पेक्षा अधिक मात्रा असल्यास असे पाणी पिण्यामुळे दात खराब होत पडत जातात. हाडे ठिसूळ होऊन संधिवात, अस्थिभंग आणि पाठदुखी सारखे विकार वाढतात. परिणामी चालणेही मुश्कील होते. तसेच अनेकांना उच्च रक्तदाब, त्वचारोग, वंध्यत्व, थायरॉईड असे एक ना अनेक विकार होतात. भारतातील २२ राज्यात जवळ जवळ दोनशे जिल्ह्यात समस्या गंभीर आहे.

महाराष्ट्रातही बीड, नांदेड, परभणी, लातूर हे तर फ्लोराईडग्रस्त जिल्हे आहेत. तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली, नागपूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्येही बऱ्याच बोअरवेलच्या पाण्यात फ्लुरॉईडचे प्रमाण दीड मिलीग्रॅम पेक्षा अधिक आहे. या फ्लोराईडवर डॉ. मोघे यांनी शेवग्याची बियांची भुकटीद्वारे पाण्याचे शुद्धीकरणाचा उपाय अभ्यासाअंती सांगितला आहे. तसेच अन्य काही साधे पण प्रभावी उपाय त्यांनी तपासले आहेत. तांदूळ, कडू लिंबाच्या पानांची राख, नारळाच्या शेंड्यांची राख, शेवग्याची पाने अशा वनस्पतिजन्य घटकांची मिळून एक

गाळणी तयार केली. त्यातून पाणी काढल्यास फ्लोराईडसह अन्य काही कीडनाशकांचे अंशही गाळातच अडकतात व पाणी दोषमुक्त होते. सोबतच शेवग्याच्या पानात वीस प्रकारची जीवनसत्त्वे व खनिजे असून, त्याच्या वापरामुळे अर्थराइटीसही बरा होत असल्याचे काही अभ्यासक सांगतात.

समुद्र किनाऱ्यालगतच्या जंगलात उपलब्ध होणारी निर्मळी या वनस्पतीच्या बियाही पाणी शुद्ध करणाऱ्या आहेत. या निर्मळीची बी गंधासारखी दगडावर वा सहाणेवर उगाळून पाण्यात टाकल्यास त्याचाही परिणाम शेवग्याच्या बियांप्रमाणेच मिळतो. कर्नाटक, तमिळनाडू व केरळ राज्यात निर्मळीच्या बियांचा मोठ्या प्रमाणात व्यापार व विक्री चालते.

जल शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे अन्य पारंपरिक उपाय ः
अनेक विविध झाडांच्या बिया, मूळ, खोड, पान, फुले, फळ, कंद, साल अशा विविध अवयवांचा जलशुद्धीकरणात वापर होत आहे. भारतातील विशेषतः दुर्गम भागातील रहिवासी आणि आदिवासींकडे असलेल्या पारंपरिक ज्ञानाचे एकत्रीकरण व प्रयोगातील प्रमाणिकरण केल्यास त्याचा सर्वांना नक्कीच फायदा होईल, असे वाटते. उदा.
- दहा लिटर पाण्यात तुळशीची मुठभर पाने टाकून सहा तास सूर्यप्रकाशात ठेवल्यास पाण्याची शुद्धता वाढते. सूर्यप्रकाशामुळे जिवाणू व विषाणू मोठ्या प्रमाणात नष्ट होतात, तर तुळशीच्या पानामुळे गढूळता जाते. फ्लोराईड व त्यासारखे अपायकारक क्षारसुद्धा शोषले गेल्याने पाण्यातून कमी होतात.


-कडुलिंबाची पाने ही वरील प्रमाणेच काम करत असली तरी पाण्याला किंचित कडवट चव येते.
-आवळा पावडर ही पाणी शुद्धीकरणासाठी खूप उपयुक्त साधन आहे. आवळा पावडरमुळे पाण्यातील क्षार ( TDS -Total Dissolve Solids) कमी होतात.
- कोथिंबिरीची ताजी पाने काढून ते रगडून पाण्यात रात्रभर टाकून ठेवावीत. पाणी शुद्ध होते.
- जांभळाच्या बिया तसेच फणसाच्या बियांची पावडरही पाणी शुद्धीकरणात महत्त्वाची भूमिका बजावते.
- ज्येष्ठ मधाच्या पावडरमुळे ही पाण्याचा टीडीएस खूप कमी होतो.
-अनेक तलावात असलेल्या वॉटर लिली या तलावातल्या पाण्यात विरघळलेला कार्बन डाय-ऑक्साइड कमी करतात. पाण्याची आम्लता कमी करत असल्याने पाण्याची चव सुधारते.

या उपायांच्या मर्यादा
१) पाणी शुद्धीकरणाचे गुणधर्म लक्षात घेऊन या पारंपरिक वनस्पतींसाठी औद्योगिक व व्यावसायिक उत्पादन करण्यात काही अडचणी आणि मर्यादा आहेत. उदा. बऱ्याचशा वृक्षांच्या अवयवांच्या नैसर्गिक अर्कामध्ये अनेक रसायने असतात. त्यांची रचनाही गुंतागुंतीची असते, त्यामुळे जलशुद्धीकरणात त्यातील नेमके कोणते रसायन उपयोगी पडते, हे समजून घेण्यासाठी प्रचंड संशोधनाची आवश्यकता असते.


२) या उपायांचे प्रमाणिकरण झालेले नसल्यामुळे त्याचा नेमका कसा वापर करायचा याबाबतही विविधता दिसून येते.
३)औद्योगिक रसायनांच्या तुलनेत या नैसर्गिक घटकांमुळे होणारी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही सावकाश घडते.
अशा अनेक कारणांमुळे कोणतेही हर्बल जलशुद्धीकरण उत्पादन बाजारात येण्यात अडचणी येतात.


पाणी शुद्धीकरणासाठी कोळशाचा वापर

केरळ व तमिळनाडूमध्ये विहिरीत पिण्यासाठी पाणी शुध्द व चवदार मिळावे यासाठी दरवर्षी कोळशाची पावडर किंवा कोळसे टाकतात. पाणी शुद्धीकरणासाठी असा कोळशाचा वापर जगभरात अनेक ठिकाणी केला जातो. त्याची काही महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे - कोळसा पाण्यात विरघळत नाही, पाण्यातील उपयुक्त क्षार व खनिजे यांच्यावर कोळशाचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे पाण्याची पोषण गुणवत्ता टिकून राहते. या उलट पाण्यात विरघळलेले विविध वायू व रसायने कोळशांच्या पृष्ठभागाकडे खेचले जातात. याला इंग्रजीमध्ये ‘ॲडसॉर्प्शन’ (Adsorption) असे म्हणतात.

विशेष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तणनाशके, कीडनाशके आणि रासायनिक खतांचे पाण्यातील अंशही कोळशामुळे कमी होतात वा नष्ट होतात. या प्रक्रियेमध्ये कोळशातील सक्रिय कर्ब (ॲक्टिव्हेटेड कार्बन) प्रभावीपणे काम करतो. कोळसा पावडरवर थोडीशी प्रक्रिया केली तर हा सक्रिय कर्ब मिळवता येतो. केरळसह दक्षिण भारतामध्ये उपलब्ध नारळाच्या शेंड्या, विशेषतः करवंट्यापासून बनवलेला कोळसा पाणी शुद्धीकरणासाठी वापरला जातो. अगदी जपानसारख्या विकसित देशातही ॲक्टिव्हेटेड कार्बनच्या कांड्यांचे व्यावसायिक उत्पादन होते. जपानी लोक बऱ्याचदा (विशेषतः प्रवासाच्या वेळी) या कार्बनच्या कांड्या जवळ बाळगतात. कोणत्याही उपलब्ध पाण्यात या कांड्या काही काळ बुडवून ठेवल्या की ते पाणी पिण्यालायक होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT