Agriculture Development Agrowon
ॲग्रो गाईड

Agriculture Development Plan : गावपातळीवर करा शेती विकासाचा आराखडा

दुष्काळ केवळ नैसर्गिक कारणांमुळे होतो असे नाही, तर त्यात मानव निर्मित कारणांचा प्रभाव अधिक दिसत आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे आता दुष्काळाचे कारण होऊ पाहत आहे.

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

दुष्काळ ही एक वारंवार येणारी आपत्ती आहे. यामुळे अनेक दशके भारतीय शेतीला (Indian Agriculture) विस्कळीत झाली आहे. दुष्काळाचे घातक दीर्घकालीन परिणाम कृषी उत्पादन, शेती उत्पन्न, व्यापक ग्रामीण बेरोजगारी, ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर आणि पशुधनावर होतो.

दुष्काळ महाराष्ट्राला आणि देशालाही नवीन नाही. राष्ट्रीय कृषी आयोगाने (National Agricultural Commission) तीन प्रकारच्या दुष्काळाचे वर्गीकरण केले आहे.

दुष्काळाची वर्गवारी ः

१) हवामानशास्त्रीय ः यामध्ये विशेषतः पर्जन्याचे विचलन कारणीभूत आहे असे मानले जाते.

२) कृषी ः यामध्ये पिकांच्या वाढीच्या काळात पाऊस किंवा ओलावा नसल्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जेव्हा पिकांच्या निरोगी वाढीसाठी जमिनीतील ओलावा आणि पाऊस अपुरा असतो. पिकांच्या सुरुवातीच्या काळात, मध्य हंगाम आणि शेवटचा हंगाम याचा प्रभाव जाणवतो.

३) जलविज्ञान ः हवामानशास्त्रीय दुष्काळ जेव्हा एखाद्या क्षेत्रावरील सामान्य पर्जन्यमानापेक्षा लक्षणीय घट होते (म्हणजे १० टक्क्यांपेक्षा जास्त). प्रदीर्घ हवामानशास्त्रीय दुष्काळामुळे भूपृष्ठ आणि उप-पृष्ठभागावरील जलस्रोतांचा ऱ्हास होऊन जलविज्ञानविषयक दुष्काळ निर्माण होतो.

दुष्काळाचा परिणाम ः

महाराष्ट्रात हवामानशास्त्रीय, कृषी आणि जलविज्ञान या तीनही दुष्काळाचा दाह वारंवार दिसतो. दुष्काळ कोणताही असो, त्यात शेतकरी भरडला जातो हे मात्र नक्की. दुष्काळ इतर आपत्तीपेक्षा भिन्न आहे.

कारण त्याची सुरुवात मंद गतीने होते, महिने किंवा अगदी काही वर्षातून तो विस्तारतो. त्याचा मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर परिणाम होतो. त्याची सुरुवात आणि शेवट तसेच तीव्रता निश्‍चित करणे अनेकदा कठीण असते.

इतर आपत्तीप्रमाणे, दुष्काळाचे परिणाम आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक क्षेत्रांवर पसरतात.

महाराष्ट्रातील कृषी हवामान प्रदेश :

पर्जन्यमान, जमीन आणि कृषी पद्धतीनुसार महाराष्ट्रात कृषी हवामान पद्धती निश्‍चित केली आहे आणि ती नऊ विभागांत विभागलेली आहे.

१. दक्षिण कोकण ः अति पर्जन्याचा जांभ्या मातीचा प्रदेश

२. उत्तर कोकण ः अति पर्जन्याचा तथापि जांभ्या माती नसलेला प्रदेश

३. पश्‍चिम घाटाचा प्रदेश. (संपूर्ण पश्‍चिम घाट परिसर)

४. संक्रमण भाग ः१ ः नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा काही भाग

५. संक्रमण भाग २ ः नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा काही भाग.

६.दुष्काळी प्रदेश (पर्जन्य छायेचा प्रदेश)ः नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा काही भाग, नगर बीड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, पुणे, सांगली जिल्ह्यांचा काही भाग)

७. निश्‍चित पावसाचा प्रदेश ः यात पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांचा समावेश होतो.

तसेच जळगाव जिल्ह्याचा बराचसा भाग त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा काही भाग, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांचा काही भाग.

८. मध्यम पावसाचा प्रदेश ः पश्‍चिम विदर्भ आणि नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांचा काही भाग.

९. अति पावसाचा तथा रुपांतरीत खडकाचा प्रदेश ः पूर्व विदर्भ मागील काही वर्षांत मॉन्सूनचा स्वभाव बदलला आहे. पर्जन्य छाया तसेच अवर्षण प्रवण भागासोबत पर्जन्याचे विचलन सर्वत्र आढळतात. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत.

दुष्काळ निसर्ग निर्मित कमी, पण मानव निर्मित अधिक ः

दुष्काळ केवळ नैसर्गिक कारणांमुळे होतो असे नाही, तर त्यात मानव निर्मित कारणांचा प्रभाव अधिक दिसत आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे आता दुष्काळाचे कारण होवू पाहत आहे. पाण्याचा अतिवापर, भूगर्भातून अधिक उपसा, बदललेली पीक पद्धती इत्यादी कारणे आहेत.

दुष्काळाचे व्यवस्थापन ः

१) ब्रिटिश काळापूर्वी दुष्काळाचे नियोजन आणि व्यवस्थापन ही गावची जबाबदारी होती आणि ती प्रभावीपणे होत असे. ब्रिटिश काळात मात्र देशाने खूप यातना सोसल्या. स्वातंत्र्योत्तर काळात दुष्काळाची स्थिती आहेच;

तथापि, त्याचे व्यवस्थापन काही अंशी तरी होत असल्याचे जाणवते. प्रत्येक बाबीसाठी लोकांची अवलंबित सरकारवर असल्याने प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ती तीव्र होत आहे.

२) २००९ साली दुष्काळाच्या व्यवस्थापनासाठी संहिता केंद्र शासनामार्फत करण्यात आली आहे. २०१७ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन सूची तयार करण्यात आली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता तयार केली आहे.

दुष्काळ व्यवस्थापन आराखड्याचा उद्देश :

१) दुष्काळाच्या सर्वांगीण व्यवस्थापनासाठी वेळ, श्रम आणि संसाधनांचा सर्वात कार्यक्षम आणि उपयुक्त वापर करून निश्‍चित आणि नियोजित पद्धतीने मार्गदर्शन करावे लागते. जेणेकरून समाजावर होणारा प्रतिकूल परिणाम कमी होईल.

२) दुष्काळ व्यवस्थापनासाठी केंद्र, राज्य, जिल्हा आणि गाव पातळीवरील प्रशासनामध्ये समन्वय आवश्यक आहे.

३) दुष्काळ व्यवस्थापनात सहभागी असलेल्या विविध भागधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्‍चिती करणे आहे.

दुष्काळ आणि अर्थव्यवस्था :

भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ५६ टक्के क्षेत्र हे पावसावर आधारित आहे आणि अन्न उत्पादनात ४४ टक्के वाटा आहे. मॉन्सून हा देशातील शेती आणि अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्याचा अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांवरही परिणाम होत असतो.

दुष्काळ आणि मॉन्सून ः

१) दक्षिण-पश्‍चिम मॉन्सून (जून ते सप्टेंबर) पावसाचा देशातील एकूण पावसाच्या सुमारे ७३ टक्के वाटा आहे. खरीप पिकांच्या लागवडीसाठी पावसाची वेळेवर सुरुवात आणि व्यापकता महत्त्वपूर्ण आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी विशेषतः जून आणि जुलै महिन्यात पडणारा पाऊस महत्त्वाचा असतो.

२) दुष्काळ किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. आपत्तींचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना पूरक ठरणे आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी अतिरिक्त संसाधन (अन्नधान्य/आर्थिक साह्य इ.) प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

दुष्काळा जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेले विविध निर्देशांक आणि मापदंड ः

१. पर्जन्य निर्देशांक.

२. वनस्पती स्थिती निर्देशांक.

३. जमिनीतील ओलाव्याची टक्केवारी.

४. जलाशय साठवण निर्देशांक.

५. प्रवाह-प्रवाह दुष्काळ निर्देशांक.

६. भूजल दुष्काळ निर्देशांक.

यामध्ये प्रत्येक निर्देशांक/मापदंडांच्या मर्यादा ठरविलेल्या आहेत. दुष्काळाच्या घटनेची तीव्रता मध्यम आणि गंभीर म्हणून मूल्यांच्या प्रमाणात वर्गवारी केली गेली आहे. इतर घटकांचा विचार करता खालील गोष्टींचा समावेश होतो.

१. चारा पुरवठ्याची व्याप्ती.

२. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची टंचाई.

३. रोजगाराची मागणी.

४. मजुरांचे स्थलांतर (मजुरीचा स्थिती आणि कल)

५. अन्नधान्य पुरवठ्याची स्थिती.

वरील मुद्यांच्या आधारे राज्य सरकार वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकते.

देखरेख यंत्रणा आणि बेसलाइन संख्याकीय माहिती ः

१) दुष्काळाचे मूल्यांकन करताना पर्जन्यमानाशी संबंधित निर्देशांकांची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार कोरडा आणि ओला दुष्काळ ठरतो.

२) रॅण्डम सॅम्पलद्वारे निवडलेल्या १० टक्के गावांमध्ये सर्वेक्षण केले जाते. क्षेत्रीय सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारे दुष्काळ आणि आपत्तीची तीव्रता जाहीर केली जाते. खरिपासाठी ३० ऑक्टोबर आणि रब्बीसाठी ३१ मार्च. दुष्काळ जाहीर करण्यासाठी कालमर्यादा सूचित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्ये दुष्काळ जाहीर करून मदत कार्याला सुरुवात करतात.

३) दुष्काळ गंभीर स्वरूपाचा असल्याचे आढळल्यास राज्य सरकारने केंद्र सरकारला आर्थिक साह्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

दुष्काळाशी सामना :

१) दुष्काळ व्यवस्थापनासाठी मार्गदर्शिका ही दुष्काळ निवारण, शमन आणि व्यवस्थापनात गुंतलेली शासन आणि संस्थांसाठी मार्गदर्शक आहे.

२) सुधारित दुष्काळ नियमावली दुष्काळ जाहीर करण्याशी संबंधित आहे. या तरतुदी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी अनिवार्य केल्या आहेत. संकट

व्यवस्थापन योजना ः

१) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जो दुष्काळाच्या प्रसंगी, जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी कृतीत आणला जातो.

दुष्काळाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि त्यांच्या विभागासह विविध हितभागधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे निर्धारित आहेत. मॉन्सून सुरू होण्यापूर्वी ते दरवर्षी अद्ययावत केले जाते.

महालनोबीस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर ः

१) दुष्काळ व्यवस्थापनासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे. यास्तव थोर शास्त्रज्ञ श्री. महालनोबीस यांच्या नावाने या केंद्राची स्थापन करण्यात आलेली आहे.या केंद्राची स्थापना कृषी मंत्रालयाशी संलग्न कार्यालय म्हणून २०१२ मध्ये कृषी मूल्यांकनासाठी अंतराळ तंत्रज्ञान वापरण्यासाठी करण्यात आली.

२) अंतराळ विभागातील (भारत सरकार) राष्ट्रीय सुदूर संचार केंद्रामधून तंत्रज्ञान हस्तांतरित केल्यानंतर या केंद्राद्वारे राष्ट्रीय कृषी दुष्काळ मूल्यांकन आणि देखरेख प्रणाली (NADAMS) अंतर्गत दुष्काळाचे मूल्यांकन आणि निरीक्षण करते.

३) या प्रकल्पांतर्गत भारतातील १४ प्रमुख दुष्काळी कृषी राज्यांसाठी जिल्हा/उप-जिल्हा स्तरावर मासिक दुष्काळाचे मूल्यांकन केले जाते. वनस्पती निर्देशांकावर दीर्घकालीन उपग्रहाकडून प्राप्त हवामानविषयक माहिती वापरून पावसाची कमतरता, मातीतील ओलावा निर्देशांक वापरून दुष्काळाचे मूल्यांकन केले जाते.

४) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेले अत्याधुनिक तंत्र आणि पद्धतींचा वापर करून हंगामातील पिकांचे अंदाज आणि दुष्काळाच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT