Grape Crop
Grape Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Vineyard Management : द्राक्ष मण्यात कमी साखर येण्याची कारणे व उपाययोजना

Team Agrowon

डॉ. एस. डी. रामटेके, अमृता लंगोटे, शरद भागवत

Vineyard Management : या वर्षी बऱ्याच द्राक्ष बागायतदारांना (Grape Producer Farmer) द्राक्षांमध्ये गोडी (Grape Sweetness) न येण्याची समस्या भेडसावत आहे. परिणामी द्राक्ष काढणीस (Grape Harvesting) बराच विलंब होत असूनही अपेक्षेइतकी साखर मण्यात उतरलेली दिसत नाही. द्राक्षाची गोडी टोटल सोल्युबल शुगर (टीएसएस) कमी असणे.

ते प्रामुख्याने पुढील घटकांवर अवलंबून असते.

१. हवामान (Weather) ः (अ) हवेतील तापमान, (ब) मुळांच्या क्षेत्रातील तापमान, (क) मण्यांच्या वाढीतील तापमान २. व्यवस्थापनातील त्रुटी : अ) जास्त उत्पादन, ब) वेलीचा विस्तार, क) पानांची संख्या, ड) वेलीतील अन्नसाठा, इ) पाणी व अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, फ) संजीवकांचा अतिरिक्त वापर.

द्राक्षाची पक्वता उशिरा येण्याची कारणे :

(अ) हवामान : हवामानातील घटकांचा द्राक्ष मणी वाढ व द्राक्षांच्या परिपक्वतेवर परिणाम होत असतो.

(१) तापमान :

हवामानातील तापमान हा घटक द्राक्षातील साखर भरण्याच्या क्रियेत मोठा परिणाम करतो. आपल्या सर्वसामान्य समजानुसार, द्राक्षमण्याचे वाढीच्या एकूण तीन टप्प्यांपैकी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मिळालेल्या तापमानाचा परिणामही द्राक्षाच्या गोडीवर होतो.

द्राक्षाची पक्वता सुरू झाल्यावर जसजसे तापमान १५ ते ३० अंश से. पर्यंत वाढत जाते, तसतसे मण्यातील साखरेचे प्रमाण हळूहळू वाढत जाते. ३३ अंश से. किंवा त्यापेक्षा अधिक तापमान वाढत गेल्यास साखरेचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे मण्यांची वाढही कमी होते. तापमान जितके जास्त राहते, त्या प्रमाणात आम्लता कमी होत जाते.

आम्लामध्ये प्रामुख्याने मॅलीक ॲसिड कमी होते. टारटारेट ॲसिडवर विशेष परिणाम होत नाही. अमिनो आम्लांपैकी प्रामुख्याने प्रोलीन वाढत्या तापमानाबरोबर वाढत जाते. अर्जिनाईन हे अमिनो आम्लही गोडी वाढेल, तसतसे वाढत जाते.

२) मुळांच्या कक्षेतील तापमान :

द्राक्ष मण्यांत साखर भरण्याच्या वेळेपासून पुढे द्राक्ष वेलींच्या मुळांच्या कक्षेतील जमिनीच्या तापमानाचा साखर वाढण्यावर विशेष परिणाम होतो. जमिनीचे तापमान कमी असल्यास आम्लता वाढल्याचे निर्दशनास येते. पक्वता सुरू असताना जमिनीचे तापमान ३० ते ३२ अंश से. दरम्यान असल्यास ब्रिक्स कमी झाल्याचे निर्दशनास येते.

३) वाढीच्या कालावधीत एकूण तापमान :

मण्यांच्या वाढीच्या कालावधीत एकूण तापमान थंड असल्यास द्राक्ष पिकण्याची क्रिया फार सावकाश चालते. याउलट तापमान उष्ण असेल तर द्राक्ष पिकण्याची क्रिया वेगाने होते.

४) प्रकाश :

प्रकाशाचा द्राक्षाची गोडी वाढण्यावर प्रत्यक्षात काही परिणाम होत नसला तरी प्रकाशाचा तापमानाशी संबंध असतो. यामुळे प्रकाशात वाढ झाली तर द्राक्षातील गोडी वाढत जाते.

(ब) व्यवस्थापनातील मुद्दे

(१) उत्पादन ः वेलींच्या क्षमतेपेक्षा द्राक्षाचे उत्पादन जास्त असल्यास त्यातील साखरेचे प्रमाण फार सावकाश वाढते. द्राक्षाच्या घडांची संख्या जास्त असेल तर फुटीची वाढ कमी होते व विस्तार मर्यादित राहतो, त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्यावर मर्यादा येतात.

२) विस्तार : द्राक्षवेलींच्या विस्तारामुळे बहुतांशी पाने उन्हात असतील तर द्राक्षाची पक्वता वेगाने होईल. पाने व घड दोन्ही सावलीत राहिल्यास सावलीतील घडांची पक्वता उशिरा येते. साखर भरण्याच्या क्रियेत अडथळे येतात. उन्हातील घडांमध्ये साखर भरण्याची क्रिया वेगाने होते.

३) पाने काढणे (डिफोलिएशन) : पाने काढण्यामुळे सुद्धा गोडीवर परिणाम होतो. मण्याच्या वाढीचे कोणत्याही टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाने काढली तर द्राक्षाची प्रत आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते.

वाढीच्या उशिराच्या टप्प्यात घडाच्या भोवतीची पाने काढली असता घडांचा रंग सुधारतो. फुलोऱ्यापूर्वी पाने काढणे योग्य नाही. पक्वता सुरू झाल्यावर सूर्यप्रकाश पडला तर त्याच्यात साखरेचे प्रमाण वाढते आणि मॅलिक आम्लाचे प्रमाण घटते.

४) अन्नसाठा : वेलीतील अन्नसाठा आणि साखर भरण्याच्या वेळेपासून पक्वता पुढे वाढत जाणे, हे प्रामुख्याने वेलीतील कर्बोदकांच्या साठ्यावरही अवलंबून असते. तोडणीवेळी घडांमध्ये असणाऱ्या एकूण साखरेपैकी ४० टक्के शर्करा वेलीच्या साठवणीच्या कर्बोदकांमधून आलेली असते.

त्यामुळे खरड छाटणीनंतर शेवटच्या टप्प्यामध्ये वेलीमध्ये भरपूर अन्नसाठा होणे आवश्यक असते. त्याच दृष्टीने पानांचे आरोग्य शेवटपर्यंत चांगले राहणे आवश्यक असते.

सातत्याने उत्पादन जास्त घेणे, अयोग्य हवामान, रोगराई किंवा तत्सम कारणामुळे वेलीतील अन्नसाठा कमी होतो. हे लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादन व्यवस्थापन केल्यास वेलीतील अन्नसाठा भरून निघेल. वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत तर मात्र हा अन्नसाठा कमी कमी होत जातो. पर्यायाने द्राक्षाला अपेक्षित गोडी (टी.एस.एस) मिळत नाही.

५) पाणी व्यवस्थापन : पक्वतेच्या काळात पाणी व्यवस्थापन आणि द्राक्षाच्या तोडणीच्या वेळेची गोडी यांचा जवळचा संबंध आहे. बाजारपेठेतील परिस्थितीनुरूप तोडणी लांबवायची असल्यास द्राक्ष बागायतदार बागेस पाणी देतात किंवा वाढवितात.

ड्रीपने पुरेसे पाणी झाले नाही तर प्रवाही पद्धतीने पाणी देतात. त्याचे परिणाम अगदी तोडणीनंतर, छाटणीनंतरच्या फुटीवरही त्याचे दुष्परिणाम दिसतात. गोडी वाढविण्यासाठी अशा पद्धतीचे पाणी नियोजन योग्य नाही.

द्राक्षबागेचे पाणी तोडल्यानंतर टी.एस.एस. वाढतो. त्या मागे कॅनोपीतील तापमान वाढणे, घड उन्हात येणे ही प्रत्यक्ष आणि काडीचा शेंडा आणि घड यांच्यात स्पर्धा वाढणे आणि पाणी कमी झाल्याने ‘डायल्युशन’ (सौम्य परिणाम) यांच्या अप्रत्यक्ष कारणांचा समावेश असतो.

शिवाय हरितद्रव्यनिर्मिती आणि अन्न व पाण्याचे वहन यावरही अयोग्य परिणाम होतो. पाण्यामुळे एकूण आम्लता वाढते. हे प्रामुख्याने मॅलिक आम्लात वाढ झाल्याने होते. टार्टारिक आम्लावर फारसा परिणाम होत नाही.

६) अन्नद्रव्ये : द्राक्षाच्या टी.एस.एस. मध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने पोटॅशचा वापर करणे आणि नत्रयुक्त खतांचा वापर कमी करणे असे काही प्रयत्न द्राक्ष बागायतदार करत असतात. हे दोन्हीही उपाय प्रामुख्याने टी. एस. एस. वाढत नसताना केले जातात.

मात्र त्यापूर्वीच जर नत्र द्राक्षात (काड्या, देठ, ओलांडे) वाढलेला असल्यास त्याचा कॅनोपीवर परिणाम होतो. वेलीचा विस्तार वाढून त्याचा पक्वतेवर परिणाम होतो. शेवटी गोडी येत नाही. म्हणूनच सुरुवातीपासूनच नत्राच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

गोडी वाढण्यासाठी पाण्याचा ताण दिल्यास घडातील पोटॅशचे प्रमाण आणखी कमी होते. म्‍हणूनच नत्र देणे उशिरा थांबविल्यास त्याचा ब्रिक्सवर अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. त्याचप्रमाणे पोटॅशही उशिरा देऊन टी.एस.एस. वाढविण्याचे प्रयत्न बरेच बागायतदार करतात.

त्याचाही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. वस्तुतः जमिनीत उपलब्ध पोटॅशचे प्रमाण पुरेसे अथवा भरपूर असताना आणि पानाचे देठांमध्ये पोटॅशचे प्रमाण भरपूर असल्यास पक्वतेसाठी गोडी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर पोटॅश पुरविण्याची काही आवश्यकता नाही.

वरील सर्व कारणे ही द्राक्षाची गोडी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. तरी सुद्धा मागील दोन तीन वर्षात पक्वतेपर्यंत द्राक्षाची अपेक्षित गोडी न येण्याची आढळलेली कारणे पुढीलप्रमाणे संभवतात.

-नत्रयुक्त खतांचा अधिक वापर ः कॅनोपी (विस्तार) किंवा शेंडे वाढ मिळावी म्हणून सुरुवातीपासून नत्रयुक्त खते विशेषतः युरिया अधिक वापरण्याचा कल बागायतदारांमध्ये रूढ होत आहे. घड सावलीत राहिल्यास पिंक बेरीजही कमी येतील, या दृष्टीनेही विस्तार मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.

- युरिया, अमोनिअम नायट्रेट अथवा युरिया फॉस्फेटसारख्या कृषी रसायनांचा फवारणीद्वारे कायम वापर. (हा वापर विशेषतः शेंडा विस्तार मिळवणे, उन्हाची इजा टाळणे, गुलाबी मणी व स्कॉर्चिंग यांचा त्रास कमीत कमी व्हावा यासाठी कॅनोपी मिळवण्यासाठी केला जातो.)

७) संजीवकांचा अतिरिक्त वापर :

- जी. ए. सारख्या संजीवकांच्या अधिक फवारण्या किंवा फवारणी अथवा घड बुडविण्यासाठी जी.ए. चा अधिक प्रमाणात व उशिरा वापर करणे.

- मुळे, खोड, ओलांडे या अवयवांमध्ये कमी अन्नसाठा, याशिवाय सी.पी.पी.यु. आणि ब्रासिनोस्टेरॉईड सारख्या अतिशय शक्तिशाली संजीवकांचा अतिरिक्त वापर झाल्यास साखर न भरण्याबरोबरच इतर दुष्परिणाम दिसून येतात.

या परिणामामध्ये द्राक्षमणी खूप टणक होणे, गळ कमी होणे, द्राक्षात तुरटपणा येणे आणि पाठोपाठ कडवटपणा येणे, गर पाणीदार न तयार होता घट्ट तयार होणे, द्राक्षात आम्लतेचे प्रमाण कमी असले तरी गोडीचे प्रमाण मात्र अतिशय कमी राहणे आणि गोडी वाढत जाण्याचा वेगही अतिशय कमी असणे यांचा समावेश होतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील संजीवके वापरायची असल्यास जी. ए. चा वापर कमी करावा लागतो. मुळातच जी. ए. पुन्हा पुन्हा वापर करावा लागू नये किंवा कमी प्रमाणात वापरून, तोच परिणाम साधण्याच्या दृष्टीने सी.पी.पी.यु. आणि ब्रासिनोस्टेरॉईडस या संजीवकांचा वापर सुरू झाला.

मात्र, बागायतदारांनी जी.ए. चा तसाच ठेऊन वरील संजीवकांचा वापर वाढविल्याने दोन्हींचे पक्वतेवर परिणाम दिसून येतात. कित्येकदा जी.ए. चा वापर या संजीवकांबरोबर केला जातो. त्यामुळे काढणीचा कालावधी हा पुढे ढकलला जातो.

डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT