Grape Farming : निर्यातक्षम रंगीत द्राक्ष उत्पादनातून देश-परदेशांत मिळवली बाजारपेठ

भुयाणे (जि. नाशिक) येथील खंडेराव शेवाळे यांनी संपूर्ण द्राक्ष उद्योगात स्वतःचे आदराचे स्थान निर्माण केले आहे. ज्येष्ठ शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, दूरदृष्टी, जागतिक बाजारपेठांचा अभ्यास, जिद्द, प्रयोगशीलता या गुणांचा त्यांनी विकास केला.
Exportable Grapes
Exportable GrapesAgrowon

Export Quality Grape Production : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका आगाप द्राक्ष हंगामासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तालुक्यातील भुयाणे येथील खंडेराव दौलत शेवाळे हे नाव तर संपूर्ण द्राक्ष उद्योगात (Grape Farming) अनेक वर्षांपासून परिचित असलेले नाव आहे.

त्यांचा शेती प्रगतीतील आजवरचा प्रवास अत्यंत अभ्यासपूर्ण व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी, दिशादर्शक असाच आहे. सन १९७७ मध्ये १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती नसल्याने खंडेराव शेतीतच उतरले. त्या वेळी कुटुंबाची अवघी तीन एकर शेती होती.

गहू (Wheat), बाजरी, कापूस (Cotton) आदींसह भुईमूग (Groundnut) हे नगदी पीक होते. आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी शेती व पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे होते. त्या उद्देशाने कुटुंबाने मोठी मेहनत घेऊन विहीर खोदली. त्यास पाणी लागल्यानंतर पारंपारिक पिकांना फाटा देत हे कुटुंब भाजीपाला उत्पादनाकडे (Vegetable Production) वळले.

सन १९७८ मध्ये कोथिंबीर, टोमॅटो, कोबी अशी पिके घेण्यास सुरुवात झाली. बाजारात विक्रीसाठी गेले असता संवाद वाढू लागला. त्यातून द्राक्ष उत्पादकांशी ओळखी झाल्या. यातूनच १५ ऑगस्ट १९८६ रोजी एक एकर क्षेत्रावर स्वमूळ पद्धतीने सोनाका वाणाची लागवड केली.

त्या वेळी २ रुपये प्रति काडी असा दर होता. त्यातूनच मिळणाऱ्या उत्पन्नातून एक एक रुपया जोडून संघर्षातून पुढे जणू प्रगतीच्या वाटा उजळल्या.

Exportable Grapes
Grape Farming : प्रयोगशील शेतीत जिद्दीने ‘ती’ राहिली उभी

अभ्यासूवृत्तीने भिनली प्रयोगशीलता

एकीकडे द्राक्षशेतीचा (Grape Crop) अभ्यास सुरू असताना सन १९८८ च्या दरम्यान गणेश व त्यानंतर भगवा वाणाच्या डाळिंबाची २५ एकरांवर लागवड केली. कालांतराने ‘तेलकट डाग’ व ‘मर’ या रोगांमुळे बागा नाइलाजाने काढून टाकाव्या लागल्या. वायनरी द्राक्ष उत्पादनाचाही अनुभव घेतला.

आज मात्र द्राक्ष हेच मुख्य पीक झाले असून ‘खंडूअण्णा शेवाळे’ या नावाने राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रंगीत द्राक्षवाण लागवडीखाली मोठे क्षेत्र आणणारे ते राज्यातील एकमेव शेतकरी असावेत.

Exportable Grapes
Grape Farming : प्लॅस्टिक आच्छादनाच्या प्रयोगांचे आश्‍वासन हवेत

ज्या वेळी हे पीक त्यांच्यासाठी नवखे होते त्या वेळी त्यातील बारकावे समजून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे सभासदत्व घेतले. चर्चासत्रे, परिसंवाद यात सहभागी होऊन उत्पादन तंत्र आत्मसात केले.

शास्त्रीय ज्ञानाची ही भूक भागवण्यासाठी जाताना काही वेळा एसटी स्टँडवर झोपण्याचीही वेळ यायची. या वाटचालीत उत्कृष्ट नियोजन असलेल्या बागा पाहण्याचा छंद लागला.

Exportable Grapes
Exportable Grape production : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात तयार केला हातखंडा

द्राक्ष तज्ज्ञ कै. श्री. अ. दाभोळकर, कै. बाळासाहेब जगताप, कै. विजयराज ब्रह्मेचा, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक जगन्नाथ खापरे, श्रीराम ढोकरे, अशोक गायकवाड आदींचे मार्गदर्शन मिळत गेले. आजही नवे तंत्रज्ञान व आदर्श कामकाज अभ्यासण्यासाठी भेटी देण्याची सवय टिकून आहे.

इस्राईल, दक्षिण आफ्रिका, चीन, जर्मनी, नेदरलँड, फ्रान्स, हॉलंड आदी देशांत अभ्यास दौरे केले आहेत. बांगलादेशमध्ये जाऊन ‘मार्केटिंग’ केले आहे.

आर्थिक शिस्तीमुळे घडली प्रगती

एकेकाळी गोबर गॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी बॅंकेकडे कर्जाची मागणी केली होती. त्या वेळी बँकेने त्यांना नकार दिला होता. ही गोष्ट शेवाळे यांच्या मनाला लागली. त्या दिवसापासून बचतीची कास धरून आजपर्यंत त्यांनी कुठलेही कर्ज घेतलेले नाही.

शेतीतून आलेल्या उत्पन्नातूनच शेती विकासासाठी गुंतवणूक असे आदर्श नियोजन आखले आहे. त्यातूनच आज शेतीचे क्षेत्र १२० एकरांवर पोहोचले आहे. मुरमाड जमिनीवर बागा फुलविल्या आहेत.

खंडूअण्णांची शेती दृष्टिक्षेपात.

द्राक्ष वाण- क्षेत्र (एकर)

क्रिमसन... ४०

रेड ग्लोब... १२

मांजरी सफेद.. ४

तास-ए-गणेश...१२

केसर आंबा...५

उर्वरित क्षेत्रावर कांदा, बाजरी व चारापिके

वाणांची निवड

चव, आकर्षकपणा यामुळे बाजारपेठेत मागणी अभ्यासून २०११ पासून ‘रेडग्लोब’. सन २०१७ पासून ‘क्रिमसन’. पावसात प्रतिकारक व फुलोरा अवस्थेत कूज कमी होत असलेल्या ‘तास-ए-गणेश’ वाणाची लागवड.

शाश्‍वत पाणीसाठा

अलीकडील वर्षांत या भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याचे खंडूआण्णा सांगतात. तरीही पाण्याविषयीची जागरूकता व वर्षभर शाश्‍वती होण्यासाठी मोसम नदीवरून पाइपलाइन केली आहे.

भुयाणे, लाडूद, करंजाड व ढोलबारे या शिवारात प्रत्येकी दोन कोटी लिटर क्षमतेची चार शेततळी घेतली आहेत. १२ विहिरी आहेत. जमीन चढ-उताराची असल्याने सर्वत्र समदाबाने पाणी वितरण होण्यासाठी विशिष्ट ड्रीपर सिस्टीमचा वापर केला आहे. ‘सेंट्रलाइज्ड’ स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा आहे.

रंगीत वाणांवर भर का?

बाजारपेठेत किंवा ग्राहकांकडून रंगीत वाणांना अधिक मागणी आहे. ते ओळखून तशा वाणांच्या निवडीला प्राधान्य दिले. खंडूआण्णा सांगतात की आम्ही आगाप हंगाम घेतो. गोड्या छाटण्यांचे काम एक जुलैला सुरू होते. त्यामुळे पावसाळ्यात जोखीम मोठी असते.

अशा काळात व्हाइट द्राक्षांपेक्षा रंगीत द्राक्षे अधिक चांगली टिकतात. आगाप मुळे १० ते २० टक्के जास्त व रंगीत असल्याने २५ टक्के असा दरवाढीचा फायदाही मिळतो. गेल्या चार वर्षांत वातावरणीय बदल, अतिवृष्टीमुळे तयार सफेद वाणाचे नुकसान झाले.

त्या तुलनेत रंगीत वाणाचे नुकसान कमी झाले. रंगीत वाणात सुरुवातीच्या काळात बाग जिरण्याची समस्या येते. मात्र योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करून वेलीत योग्य अन्नसाठा झाल्यास व खोड सशक्त झाल्यावर ही समस्या कमी होते असा अनुभव आहे.

रंगीत वाणात ‘डीपिंग’ कामे कमी असतात. सफेद वाणांच्या तुलनेत रंगीत वाणांचे एकरी उत्पादन कमी येते. मात्र ही तफावत अधिक दरांमधून भरून निघते. अधिक जोखीम अधिक दर हे सूत्र लक्षात घेतले आहे.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

-लागवडीचे अंतर- ९ बाय ६ फूट.

-एकरी वेलींची संख्या- ८०० ते ८५०

-आगाप हंगामात अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासह जोखीम कमी करताना टप्प्याटप्प्याने एक जुलै ते एक सप्टेंबरदरम्यान गोड्या छाटणीचे नियोजन. त्याचबरोबर बागेवर प्लॅस्टिक आच्छादनाचाही वापर.

-डाऊनी प्रादुर्भाव टाळण्यासह प्रकाशसंश्‍लेषण क्रियेसाठी कॅनोपी व्यवस्थापन करताना वेलींवरील पानांची संख्या मर्यादित. प्रत्येक वेलीवर ३०-३५ मर्यादित घडसंख्या

-संजीवकांचा अति वापर कमी. इथेफॉनचा संतुलितपणे वापर

-माती, पान-देठ परीक्षण अहवालानुसार मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर.

-काढणीपूर्व साखर उतरण्याच्या अवस्थेत पक्षांपासून घडांचे नुकसान टाळण्यासाठी ‘बर्डनेट’चा वापर

-मण्यातील साखरेचे प्रमाण १८ ब्रिक्स व आम्लता तपासून काढणी. गोडी, टिकवणक्षमता, मण्यांचा आकार, चकाकीमुळे बाजारपेठ मिळविण्यात यश आले.

-बाजारभाव आपल्या हाती नाही. त्यामुळे गुणवत्तेत तडजोड न करता यांत्रिकीकरण करून आर्थिक बचत साधली.

-प्रत्येक हंगामनिहाय कामकाज, खर्च, उत्पादन व उत्पन्न यांच्या नोंदी

-सिंचन नियोजनात हलक्या जमिनीसाठी ४ दिवसांत ५ तास, मध्यम हलक्या जमिनींसाठी सहा दिवसांत ६ तास, तर काळ्या जमिनीत १० दिवसांत ८ तास सिंचन.

-सुमारे ७५ ते ८० टक्के सेंद्रिय पद्धतीने नियोजन. उर्वरित प्रमाणात रसायनांचा वापर.

-एक हजार लिटर टाकीत डीएफ द्रावण तयार ठिबक सिंचनातून दर महिन्याला मात्रा

Exportable Grapes
Grape Export : कमी साखरेच्या द्राक्ष माल निर्यातीचा मुद्दा पुन्हा समोर

-मृदा संवर्धनासह सेंद्रिय कर्बवाढीसाठी शेणखत, पोल्ट्रीखत, मळीखत यासह एरंडी, मोह व शेंगदाणा पेंड यांचा वापर. घरच्या चार गीर गायी व १० म्हशी. वर्षाला १०० ट्रक शेणखत उपलब्ध होते. मात्र क्षेत्र अधिक असल्याने खरेदीही करावे लागते.

- बाष्पीभवन कमी होण्यासाठी ऊस पाचट, मका चारा, सोयाबीन भुसा यांचे जैविक आच्छादन

- चार प्लॉट्‌समध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे. त्याआधारे हवामानाच्या अचूक माहिती तपशिलाद्वारे व्यवस्थापन. अनावश्यक फवारण्या कमी केल्याने खर्चात बचत. यात अत्याधुनिक हाय व्हॉल्यूम तसेच इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्राचा वापर

-व्यक्तीनिहाय कामाच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करून नव्या पिढीकडे शेती व्यवस्थापनाची जबाबदारी; खंडूअण्णा आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत.

-हाताळणी व प्रतवारीसह सुसज्ज पॅक हाउस.

उत्पादन, बाजारपेठ- विक्री व्यवस्था

-एक नोव्हेंबरपासून माल काढणी. जानेवारीअखेरपर्यंत विक्री.

-एकरी उत्पादन खर्च किमान दोन लाख रुपये.

-एकरी उत्पादन- सात ते नऊ टन.

तीन वर्षांत मिळालेले प्रति किलो दर (रु.)

वाण... २०२०...२०२१...२०२२

क्रिमसन...९२...१३०...१५१

रेड ग्लोब...११०...१२१...१३१

निर्यात

सुरुवातीच्या टप्प्यात सफेद व त्यानंतर रंगीत वाणाचे खुडे होतात. ‘ख्रिसमस’ सणाची मागणी अभ्यासून रशियासह युरोपमध्ये माल निर्यातदारांमार्फत पाठविला जातो.

पूर्वी स्वतःही निर्यात केली होती. उत्पादनाच्या एकूण ७० टक्के निर्यात, तर ३० टक्के मालाची देशांतर्गत विक्री होते. ‘क्रिमसन’ची आखाती देशात व त्यातही दुबईत सर्वाधिक निर्यात होते. नंतरच्या टप्प्यातील माल युरोपमध्ये पाठवला जातो.

केशर फार्म नावाने ब्रॅण्डिंग

रेड ग्लोब वाणाची दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता व मुंबई आदी मोठ्या शहरांमध्ये मागणी असल्याने स्वतः ‘मार्केटिंग’ करून ‘केशर फार्म’ ब्रँडने द्राक्षे पनेटमध्ये भरून आकर्षक बॉक्समधून पाठवली जातात. व्यापारी व निर्यातदार यांमध्ये या द्राक्षांनी ओळख मिळविली आहे. ‘अपेडा’चा नोंदणीकृत परवाना आहे.

कौटुंबिक व सामाजिक प्रगती

खंडूआण्णांचे वडील दौलत, आई केशरबाई आज हयात नाहीत. मात्र त्यांच्याच वडिलकीच्या सल्ल्याने हे कुटुंब शेतीत यश मिळवीत गेले. सध्या खंडेराव व भाऊ काकाजी नियोजन करतात. कृषी पदवीधर घनश्याम व गोविंद ही मुले व्यवस्थापन सांभाळतात.

मजुरांची देखरेख व माल काढणीपश्‍चात जबाबदारी पत्नी अंजनाबाई व भावजय संगीता यांच्याकडे असते. शेतीसह पुढची पिढी घडविण्याचे काम खंडूआण्णांनी केले आहे. मुलगी प्रेरणा, पुतणी गायत्री या डॉक्टर झाल्या आहेत. पुतण्या जयदीप अन्नप्रक्रिया विषयात पदवी घेत आहे.

यश, कीर्ती, कष्टातून अर्थकारण उंचावले आहेच. पण साधेपणा हा परिवाराचा गुण वाखाणण्याजोगा आहे. हजारो शेतकऱ्यांनी आजवर शेताला भेटी दिल्या आहेत. आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करणे, त्यांना वेळ देऊन मार्गदर्शन करून अवलंब केलेले तंत्रज्ञान खंडूआण्णा समजावून सांगतात.

कृषी विभागाचा ‘कृषिभूषण’ यासह गिरणा गौरव आदी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शेतीतील समस्यांची मांडणी ते शासन दरबारी करीत असतात. त्यांची प्रेरणा व मार्गदर्शन यातून कसमादे भागात अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड साधली आहे.

संपर्क : खंडेराव शेवाळे, ९४२२७५५४३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com