Lemon
Lemon Agrowon
ॲग्रो गाईड

Lemon : शेतकरी पीक नियोजन : लिंबू

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. डी. एस. यादव, टीम ॲग्रोवन

शेतकरी ः किसन निवृत्ती शिंदे

गाव ः आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर

लिंबू लागवड ः ५ एकर

एकूण झाडे ः ७००

नगर जिल्ह्यातील आढळगाव येथील किसन निवृत्ती शिंदे यांची साडेसात एकर शेती आहे. त्यात ५ एकरांवर लिंबू लागवड (Lemon Cultivation), तर उर्वरित क्षेत्रामध्ये ऊस लागवड (Sugarcane Cultivation) आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची लिंबू लागवड आहे. हा भाग दुष्काळी (Drought Area) म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या कुकडी प्रकल्पाचे पाणी (Kukadi Water Project) आल्यामुळे काही प्रमाणात येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुष्काळी भाग असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लिंबाची लागवड केली आहे. लिंबू हे काटक फळपीक असून इतर फळपिकांच्या तुलनेत लिंबास जास्त पाण्याची आवश्यकता नसते. तसेच उत्पादन खर्चही तुलनेने कमी आहे. त्यामुळे लिंबू लागवड येथील शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत उत्पादनाचा स्रोत झाली आहे. वर्षभर उत्पादन देणारे पीक म्हणून लिंबाकडे पाहिले जाते. त्यामुळे लिंबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

किसन शिंदे यांची १२ वर्षांपूर्वी दोन एकरांवर साई सरबती वाणाच्या ३०० झाडांची जुनी बाग आहे. लागवड क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने त्यांनी मागील ४ वर्षांपूर्वी नव्याने सव्वातीन एकरांवर फुले सरबती वाणाची ४०० झाडे लावली. सध्या त्यांच्याकडे सव्वापाच एकरांवर मिळून सुमारे ७०० झाडे आहेत. संपूर्ण लागवड १८ बाय १८ फूट अंतरावर आहे. दरवर्षी एका झाडापासून साधारण १ क्विंटल लिंबू उत्पादन मिळतो. या वर्षी लिंबास प्रतिकिलो ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत दर मिळाला असल्याचे किसन सांगतात. किसन यांच्याकडे सिंचनासाठी ३ बोअर, १ शेततळे आणि १ विहीर आहे. त्यातील उपलब्ध पाण्याचा आवश्यकतेनुसार ठिबकद्वारे वापर केला जातो.

व्यवस्थापन बाबी ः

- लिंबामध्ये जून-जुलै महिन्यात मृग बहर, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हस्त बहार आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आंबिया बहर धरला जातो. या तिन्ही बहरांत लिंबाच्या झाडांना फळे येतात. मात्र हस्त बहरातील फळे मार्च- एप्रिल महिन्यात विक्रीयोग्य होतात. या काळात बाजारात लिंबास चांगली मागणी असते आणि दरही चांगला मिळतो. त्यामुळे हस्त बहर धरण्यावर विशेष भर देतो, असे किसन सांगतात.

- किसन हे लिंबू झाडांची छाटणी करण्याचे टाळतात. फक्त जुन्या लागवडीतील झाडांच्या वाळत चाललेल्या फांद्या छाटून घेतात. या फांद्याची उत्पादनक्षमता कमी असते. त्यामुळे त्यांची छाटणी आवश्यक असते. छाटणीनंतर बोर्डो मिश्रणाची फवारणी घेतली जाते.

- छाटणीनंतर जून महिन्यात प्रति झाड ५० किलो शेणखत दिले जाते. याशिवाय एनपीके, मॅग्नेशिअम, फेरस आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा झाडाचा आकार ध्यानात घेऊन दिल्या जातात. झाडाला खतांची उपलब्धता होण्यासाठी कुदळीने जमीन मोकळी केली जाते.

हस्त बहराचे नियोजन ः

- येत्या काळात हस्त बहराचे नियोजन केले जाईल. त्यानुसार १५ ऑगस्ट दरम्यान बागेचे पाणी तोडून बाग ताणावर सोडली जाईल. पावसाळ्यात बागेस ताण व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे हस्त बहराचा ताण बसण्यासाठी संजीवकांच्या फवारण्या घेणे आवश्यक असते. त्यानुसार ताणाच्या कालावधीत पाऊस झाल्यास, २ वेळा संजीवकांच्या फवारण्या घेतल्या जातील. पाऊस नसेल तर फवारण्या घेणार नाही. असे किसन सांगतात.

- बागेचा ताण हा साधारण १५ सप्टेंबर दरम्यान तोडला जातो. पाऊस असेल तर नैसर्गिकरीत्या ताण तुटतो. मात्र पाऊस नसेल तर ठिबकद्वारे सिंचन करून ताण तोडला जाईल.

- दर महिन्याला ठिबकद्वारे नत्र, स्फुरद, पालाश खतांच्या एकरी २ ते ३ किलो मात्रा दिल्या जातील.

- साधारण ऑक्टोबर महिन्यात झाडांना फुले येण्यास सुरुवात होते. या काळात फुलगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे सिंचन आणि खत व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

- लिंबावर काळा मावा, पांढरी माशी व खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव पाहून गरजेनुसार बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.

- झाडांना लिंबू लागल्यानंतर खैऱ्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर डाग पडून फळांचा आकार बदलतो. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणीचे नियोजन केले जाते, असे किसन यांनी सांगितले.

किसन शिंदे ः ९७६६६४३३५५

(शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT