परभणी - वसमत राष्ट्रीय महामार्गावर आरळ (जि. हिंगोली, ता. वसमत) हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. येथील मुंजाजी कातोरे यांचे वडील गंगाधरराव, आई, दोन भाऊ, मुले, सुना असे १७ सदस्यांचे कुटुंब आहे. त्यांची वडिलोपार्जित १५ एकर जमीन होती. कोरडवाहू जमिनीत हंगामी पिके असत. सिंचनाची सुविधा (Irrigation Facility) निर्माण केल्यानंतर पीक पद्धतीत (Crop Pattern) बदल केला. शेतीतील उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने २५ एकर क्षेत्र खरेदी केले. आज एकूण ४० जमीन असून ती मध्यम ते भारी प्रकारची आहे.
सिंचन क्षेत्र वाढवले
क्षेत्र विस्तारासोबत वाढीव सिंचन स्रोतांचाही निर्मिती केली. सन १९९० मध्ये परिसरातील थूना नदीवरून पाइपलाइन केली. सन १९९५, २००५ आणि २०११ मध्ये विहिरी खोदल्या. गावातील घराजवळील बोअरचे पाणी तीन किलोमीटर पाइपलाइनद्वारे शेतात नेले. एरंडेश्वर शिवारातील जमिनीत शेततळ्याची निर्मिती केली.
फळबाग लागवडीचे प्रयोग
पुरेशा प्रमाणात सिंचन व्यवस्था उभारल्यानंतर कातोरे ऊस, केळी, पपई आदी फळबाग पिकांकडे कातोरे वळले. बाजारपेठेचा अंदाज घेत दरवर्षी ३ ते ५ एकरांत कलिंगड घेऊ लागले. सन १९९० मध्ये एक एकरात नागपुरी संत्रा घेतला. लातूर, नागपूर मार्केटमध्ये विक्री व्यवस्था उभारली. सन २००८ मध्ये दुष्काळात संत्रा बाग वाळून गेली. झाडे उपटून टाकावी लागली. पण कातोरे यांनी हार मानली नाही. लातूर येथील मार्केटमध्ये त्यांना लिंबाच्या किफायतशीर शेतीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हे पीक घेण्याचे निश्चित केले.
लिंबू झाले मुख्य पीक
सन २००१ मध्ये हलक्या प्रतीच्या मात्र लिंबासाठी योग्य तीन एकरांत बाग विकसित करण्यास सुरुवात केली. नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय पिके संशोधन केंद्रातून साई सरबती जातीची रोपे प्रति नग २५ रुपये दराने घेतली. तब्बल दहा वर्षे उत्पादन घेतले. परंतु दुष्काळी स्थितीमुळे २०१७ मध्ये झाडे मोठ्या संख्येने वाळून गेली. संपूर्ण बाग काढावी लागली. लिंबाद्वारे दररोजच्या उत्पन्नाची शाश्वती होती. मुळे धीर खचू न देता सन २०१६ मध्ये साडेपाच एकरांत २० बाय २० फूट अंतरावर सुमारे ६०० झाडे लावली.
साई सरबती जात का निवडली?
-पातळ साल, चकाकी, आकर्षक, रसाळ लिंबू.
-आकार चांगला, बाजारपेठेत मागणी.
-फुलोऱ्यानंतर तीन महिन्यांनी फळ सुरू.
बहर व विक्री व्यवस्थापन
लिंबाचे वर्षभर उत्पादन घेण्यात येते. मात्र मृग आणि हस्त या दोन मुख्य बहरांत प्रत्येकी ४० टक्के, तर दोन छोट्या बहरांमध्ये २० टक्के उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सातत्याने ताजे उत्पन्न मिळत राहते.
हस्त बहर अधिक किफायतशीर ठरतो. उन्हाळ्यात लिंबांना मागणी व दरही चांगले मिळतात. परभणी येथील व्यापाऱ्यांमार्फत रेल्वेद्वारे अमृतसर (पंजाब) येथे लिंबू पाठविले जातात. त्यामुळे हे मुख्य मार्केट असते. उर्वरित विक्री वसमत, नांदेड आदी ठिकाणी होते. बहुतांश विक्री जागेवरच होते.
नव्या बागेत उत्पादनाचे यंदाचे तिसरे वर्षे आहे. पहिल्या दोन वर्षी कोरोना संकटात खूप मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी (२०२१) मध्ये साडेपाच एकरांतून २५ टन उत्पादन मिळाले. प्रतिकिलो सरासरी १५ ते २५ रुपये दर मिळाले. यंदा मार्च ते मे कालावधीपर्यंत २० टन उत्पादन मिळाले. हे वर्ष संपेपर्यंत अजून २५ ते ३० टन उत्पादनाचा अंदाज आहे. प्रति किलो ४० ते ८५ रुपये दर जागेवर मिळाले. आहेत. यापूर्वीही २०१६ मध्ये प्रति किलो ९० ते ९५ किलो दर मिळाले.
तोडणी नियोजन
-दररोज दोन-तीन क्विंटल लिबांची तोडणी तीन ते चार मजुरांकडून.
-त्यासाठी ५० किलो लिंबांमागे १२५ रुपये मजुरी.
-तोडणीनंतर आखाड्यावर आणून लिंबांची स्वच्छता, प्रतवारी.
-बोरीचे पॅकिंग. वजनमाप होते. व्यापारी बँक खात्यावर रक्कम जमा करतात.
हळद व सोयाबीन
-दरवर्षी दोन एकरांत गादी वाफा पद्धतीने हळद. एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन.
-यंदाच्या उन्हाळी हंगामात फुले संगम वाणाच्या सोयाबीनचे बीजोत्पादन. (एकरी ११ क्विंटल).
-त्यामुळे खरिपात घरचे दर्जेदार बियाणे उपलब्ध झाले. शिल्लक बियाण्याची विक्री होणार.
एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे प्रगती
मुंजाजीराव कुटुंबात सर्वांत थोरले आहेत. धाकटे बंधू भास्करराव यांच्यासह ते पूर्णवेळ शेती करतात. मधले बंधू बालासाहेब पुणे येथे नोकरी करतात. सर्वांची मुले चांगले शिक्षण घेत आहेत. पैकी मुंजाजी यांची संदीप आणि सचिन ही मुले अभियंता असून, बालासाहेब यांची मुलगी सृष्टी बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. गावापासून शेत सुमारे अडीच किलोमीटरवर आहे. शेताकडे ये -जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी अडचणी येतात. आजवर शेतातील आखाड्यावर पत्र्याचे निवारे होते. यंदा पक्क्या घराचे बांधकाम केले आहे. शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम, सालगड्यांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था केली आहे. पावसाळ्यामध्ये लिंबाची प्रतवारी करण्यासाठी खोलीची व्यवस्था केली आहे.
पशुधनाचा सांभाळ
शेतीसाठी आवश्यक गावरान तसेच लाल कंधारी गाय व बैलजोडी, वासरे असे पशुधन आहे. घरच्या गरजेपुरते दूध मिळते. शेणखतामुळे जमिनीची सुपीकता टिकून आहे. बहुतांश कामे ट्रॅक्टरचलित अवजारांद्वारे केली जातात. आंतरमशागतीसाठी बैलचलित अवजारांचा वापर होतो.
पुरस्काराने गौरव
शेतीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हिंगोली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे मुंजाजी यांना दोन वेळा कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंजाजी कातोरे, ७०३०३१२६२४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.