ॲग्रो गाईड

Watershed Development In Katkalamba : काटकळंबा गावाने दुष्काळ केला हद्दपार; आता पाणीदार झाले गाव...

कृष्णा जोमेगावकर

Rural Development : नांदेड हा अवर्षण प्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकूण १६ तालुक्यांपैकी कंधार, मुखेड, लोहा, देगलूर व नायगाव हे नेहमी दुष्काळाच्या छायेत असतात.

यापैकीच कंधार तालुक्यातील काटकळंबा या गावाने जल व मृद्‌संधारणाच्या कामांमधून दुष्काळावर विजय मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी झालेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

गावची पार्श्‍वभूमी

काटकळंबा गावचे भौगोलिक क्षेत्र एक हजार २२१ हेक्टर असून, त्यापैकी ९८० हेक्टर लागवडीखाली आहे. नव्वद टक्के जमीन कोरडवाहू होती. कापूस, सोयाबीन व ज्वारी ही मुख्य पिके होती.

यापैकी केवळ ६८ हेक्टर जमीन ओलिताखाली होती. गावची लोकसंख्या सुमारे ४६५९ आहे. गावच्या शिवारात डोंगराळ, उताराच्या व धूप झालेल्या जमिनी होत्या. दर दोन-तीन वर्षानी दुष्काळ ठरलेलाच. सन २०१२ ते २०१६ अशी चार सलग वर्षे दुष्काळात गेली.

परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार

सन २०१२ मध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली. गावचे भूमिपुत्र व विद्यमान भाईंदर महानगर पालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे तसेच शिक्षक बाबूराव बस्वदे यांनी गावची परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण या अनुषंगाने युवकांना प्रेरित केले.

मोहन पवार, बालाजी पानपट्टे, गोविंदराव वाकोरे, सुभाष मोरे, सदाशिव हम्पल्ले, शिवाजी वाकोरे, राष्ट्रपाल चावरे, साईनाथ कोळगिरे, अशोक चावरे, रामदास बस्वदे, बाबूराव गुरुजी,

माधवराव शेळगावकर आदी असंख्य व्यक्ती एकत्र आल्या. हिवरे बाजार, राळेगणसिद्धी गंगापूर आदी गावांचा अभ्यास दौरा करून ग्रामस्थांनी पाणलोट विकास व विकासाची सूत्रे समजून घेतली. संस्कृती संवर्धन मंडळाचे (सगरोळी) अध्यक्ष प्रमोद देशमुख, सेववर्धिनी संस्था, ॲटलास कॅप्को चॅरिटेबल फाउंडेशन, नाबार्ड, नाम फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग व ग्रामस्थ आदी सर्वांच्या एकीतून गावात विविध कामे झाली. बालविकास संस्था, वरंगल यांच्या मदतीने शुद्ध पेयजल पुरवठा झाला.

कामांची अंमलबजावणी

सन २०१६-१८ या कालावधीत जलदूत प्रकल्प राबविण्यात आला. मृद्‍ व जलसंधारण व माथा ते पायथा अशी कामे झाली. सन २०१५ मध्ये ‘केअरिंग फ्रेंड्‍स’च्या मदतीने एक किलोमीटर नाल्याचे खोली व रुंदीकरण डोह पद्धतीने पूर्ण केले.

यात दर ५० ते ६० मीटर अंतरावर उताराप्रमाणे डोह करण्यात आले. दहा किलोमीटर मुख्य नाल्याची रुंदी १५ ते २० फूट व खोली ३ ते ५ फूट होती. पुराचे पाणी नाल्यातून शेतात येत होते. त्याची रुंदी ५० फूट व खोली २० फूट करण्यात आली.

परिणामी पुरापासून शेतजमिनीचे संरक्षण होऊ लागले. जमिनीची धूप कमी झाली. पुरामुळे होणारे पिकाचे नुकसान थांबले. मुख्य बदल म्हणजे भूजल पातळीत वाढ होऊ लागली. परिणामी गावकऱ्यांनी माती अडवा व पाणी जिरवा या संकल्पनेवर भर दिला.

सन २०१९ ते आजपर्यंत गावाच्या एकूण उपचारक्षम क्षेत्रापैकी म्हणजे एक हजार १९२ हेक्टर क्षेत्रापैकी ६२० हेक्टर क्षेत्रावर पाणलोटाची कामे करण्यात आली आहेत. यात शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

६२० हेक्टर क्षेत्रापैकी ९५ हेक्टर पडीक क्षेत्रावर सलग समतल चर, खोल समतल चर, गलीप्लग, अर्दन (earthen) बंधारे तसेच उर्वरित ५२५ हेक्टर वहितीखालील क्षेत्रात बांधबंदिस्ती, चिबड चार, दगडी सांडवे आदी कामे पूर्ण झाली.

येत्या दोन वर्षांत उर्वरित क्षेत्रात याच पद्धतीने कामे पूर्ण होणार आहेत. सिमेंट बंधारे, गॅबियन जाळीचे बंधारे, लूज बंडिंग , दगडी कट्टे आदी कामे प्रस्तावित आहेत.

शिवाराचा होतोय कायापालट

झालेल्या कामांमुळे जमिनीतील पाणीपातळी तीन मीटरपर्यंत वाढली आहे. पूर्वी मे महिन्यात पाचशे फूट खोली असलेल्या कूपनलिका बंद पडत होत्या. आता दोनशे ते अडीचशे फुटांवर पाणी आले आहे. विहिरींचेही पूर्वी ८० फुटांखाली असलेले पाणी ६५ ते ७० फुटांवर आले आहे.

जलसंपन्नता येऊ लागल्याने शेतीचा कायापालट होऊ लागला आहे. पूर्वी पाण्याअभावी रब्बी व उन्हाळी पिके घेता येत नव्हती. आता शिवारात पाचशे हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांखाली आले आहे.

हरभरा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. शंभर हेक्टरवर हळदीची लागवड होत आहे. उन्हाळी भाजीपाला पिकांसह ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, टरबूज, खरबुजाची लागवड वाढली आहे.

नैसर्गिक साधनसामग्री बळकटीकरण

शिवारातील नैसर्गिक साधनसामग्री बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने वनीकरणासारखे पूरक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. मुख्य नालाकाठांवर जवळपास पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

यात बांबू व अन्य वृक्षांचा समावेश आहे. गावातील रस्त्यालगत दोन हजार करंज वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पडीक क्षेत्रावर कडुनिंब व सीताफळ लागवड करण्यात येत आहे.

शेती प्रशिक्षण, पीक प्रात्यक्षिक

गावात हवामान बदल अनुकूल पीक प्रात्यक्षिक प्रकल्प, शेतकरी मेळावे व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. यात सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) योगदान लाभले. केंद्राने काटकळंबा गाव त्यासाठी दत्तक घेतले आहे.

केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार व त्यांच्या ‘टीम’तर्फे आधुनिक पीक पद्धती, प्रक्रिया उद्योग, अवजारे, फळबाग लागवड, पशुधन, दुग्ध व्यवसाय, चारा लागवड याविषयी मार्गदर्शन लाभत आहे.

गंगाधर कानगुलवार, पाणलोट विकास प्रकल्प, सगरोळी, ९८६०५२१६०१

शिवारात जलसंधारणाची कामे झाल्याने आमच्या विहिरीला व कूपनलिकेला बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. रब्बी, उन्हाळी पिके घेऊन उत्पादन वाढवणे शक्य झाले आहे. दोन एकरांत सीताफळ लागवड आहे. त्यातून दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे. मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन घेत आहे. त्यातून आर्थिक जीवनमान उंचावू लागले आहे.
गणेश रामराव हम्पले
माझी दहा एकरी शेती आहे. पूर्वी मार्चमध्ये विहिरींचे पाणी आटायचे. रब्बीत पिके घेता येत नव्हती. आता रब्बी सह उन्हाळी हंगामात पाच एकरांवर पिके घेत आहे. खरिपात हळदीसह रब्बीत हरभरा, गहू तर उन्हाळी हंगामात भुईमुगासारखी पिके घेत आहे. मिळत असलेल्या उत्पन्नातून शेतीतील पायाभूत सुविधांसह घर बांधणे शक्य झाले आहे.
मोहन कामाजी पवार
गाव स्वच्छ, आरोग्यसंपन्न व पाणीदार करण्यासाठी सर्व ग्रामस्थ व युवकांची साथ मिळाली. संस्थेच्या माध्यमातून यापुढेही सामाजिक उपक्रम राबविणार आहोत.
बाबुराव बस्वदे, अध्यक्ष, जय शिवराय पाणलोट विकास समिती, काटकळंबा, ९६५७५७७१०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT