Rural Development
Rural Development Agrowon
ॲग्रो गाईड

Rural Development : अकोल्यातील कापशी रोड गाव विकासकामांसह स्वच्छतेतही कसं आलं अव्वल?

 गोपाल हागे

Akola Rural Development : अकोला जिल्ह्यात कापशी रोड हे अकोला-पातूर मार्गालगतचे सुमारे २३०० लोकसंख्येचे टुमदार गाव आहे. उत्कृष्ट दर्जाच्या पेढ्यासाठी गावाची ख्याती आहे. येथील बसस्थानक परिसरात २० ते २५ दुकानांमधून उत्कृष्ट स्वादाचा पेढा मिळतो.

गावातील गजानन पांडव यांनी सुरवातीला पेढा निर्मिती सुरू केली. हा पेढा परदेशापर्यंत पोचला. आज त्यांची तिसरी पिढी म्हणजेच श्रीराम पांडव यांनी पेढ्याची गुणवत्ता आणि व्यवसायही टिकवला आहे. या व्यवसायाने अनेकांना रोजगार संधी दिल्या.

फिरत्या वाहनाद्वारे अकोला व अन्य शहरांमध्ये थेट विक्री सुरू झाली. दररोज दीड क्विंटलपर्यंत पेढयाची थेट विक्री होऊन हजारोंची उलाढाल होते. त्यातून परिसरात दुग्धव्यवसायही वाढीस लागला आहे.

विविध सुविधांनी युक्त गाव

जिल्हा मुख्यालयापासून १८ किलोमीटरवर कापशी रोड गाव आहे. गावाची वेगाने वाढलेली लोकसंख्या पाहता आवश्‍यक सुविधांमध्ये वाढ झाली आहे.

पुरेसे पाणी, कचरा संकलन, ८० टक्क्यांपेक्षा अधिक भागात भूमिगत निचरा प्रणाली ( अंडर ग्राउंड ड्रेनेज), पहिली ते सातवीपर्यंत डिजिटल शाळा, जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने डिजिटल कॉन्व्हेंट, ‘ग्रामपंचायतीला आयएसओ’ प्रमाणपत्र, करवसुलीसाठी ‘कॅशलेस’ सुविधा, सौर दिवे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक गाळे, राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा, बाजारओटे, महिला बचत गटांना प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन आदी सुविधांमधूनही गावाचे जीवनमान बळकट करण्यात येत आहे.

स्वच्छतेत अव्वल

गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन २०२०-२१ व २०२१-२२२ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत जिल्हयात पहिला क्रमांक व पाच लाखांचे बक्षीस पटकाविले. याच स्पर्धेत गाव अमरावती विभागात दुसरे येत आठ लाखांचा पुरस्कार मिळविला.

आर. आर.पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गतही जिल्हयात प्रथम क्रमांक व ५० लाखांचे पारितोषिक मिळाले. जलजीवन मिशन अंतर्गत मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत भारतातून ६७ प्रतिनिधी सहभागी झाले.

सरपंच म्हणून महाराष्ट्रातून कापशीचे सरपंच अंबादास गजानन उमाळे यांना संधी मिळाली. या कार्यशाळेनंतर त्यांनी गावात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी व मीटर बसवून २४ तास पाणी पुरवण्याचा संकल्प केला. हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.

सिंचन बळकटीकरण

मागील काही वर्षात जलयुक्त व अन्य योजनांतून जलसंधारणाची कामे झाल्याने पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. परिणामी सिंचनाचे क्षेत्र विस्तारले. गावशिवारातील वगाळी नाल्याचे दोन किलोमीटरपर्यंत खोलीकरण झाले.

कापशी तलावातील गाळाचा उपसा दुष्काळी वर्षात म्हणजे सन २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात केल्याने पाणीपातळी वाढली. गाळ शेतकऱ्यांनी शेतीत वापरला.

डाकबंगला ते वाशीम रस्ता आणि राजंदा फाटा ते वगाळा नाला हे शेतरस्ते झाले. दोन शेतरस्त्यांचे काम प्रस्तावित आहे.

शेतीचा विकास

सुमारे २५ शेतकऱ्यांनी बांधावर फळबाग लागवड केली. गावात ८७ हेक्टरपर्यंत फळबागा उभ्या राहिल्या. कागदी लिंबूचे क्षेत्र वाढत आहे. कृषी- आत्मा यंत्रणेमार्फत ११ शेतकरी उत्पादक गटांची नोंदणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन होत आहे. काही महिला गट पेढा व आदी उत्पादने विविध प्रदर्शनांमधून सादर करीत आहेत.

रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळाले असून सुमारे २३ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे. काहीजणांकडे रेशीम कोष उत्पादन सुरु झाले आहे.

मुलींच्या जन्माचे आगळेवेगळे स्वागत

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे आगळेवेगळे स्वागत केले जाते. दरवर्षी आठ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत या मुलीच्या नावाने २१०० रुपयांची मुदत ठेव (एफडी) केली जाते.

याद्वारे संबंधित दांपत्याचा सन्मान केला जातो. महिलांचे रक्त व हिमोग्लोबीन अनुषंगाने चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत केली जाते. कोरोना काळात गावाने अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतल्याने जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त करीत तसे प्रमाणपत्रही दिले.

कापशी गाव- विकास कामे दृष्टीक्षेपात

-भौगोलिक क्षेत्र- ५८४.४३ हेक्टर, विहितीखालील क्षेत्र- ५३२ हेक्टर

-करवसुलीत अव्वल

-स्पर्धा परीक्षांसाठी परिक्षा केंद्र

-तरुणपिढीसाठी खुली व्यायामशाळा .

-वृक्ष लागवड व संगोपनासा़ठी पुढाकार

-संगणकीकृत ग्रामपंचायत

-संपूर्ण गावात खडीकरण

या गावाचा दुसऱ्यांदा सरपंच होण्याची संधी गावकऱ्यांमुळे मिळाली. अनेक उपक्रम लोकसहभागातून पूर्णत्वास जात आहेत. त्यामुळेच या १० वर्षाच्या काळात गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देता आली.
अंबादास गजानन उमाळे, सरपंच, कापशी रोड ७७९८६२८९८७
गावाचा चेहरामोहरा सन २००३ पासून बदलायला सुरवात झाली. पूर्वी गावात पायी चालत जाणे अवघड असायचे. आता सर्वत्र रस्ते झाले. बंदिस्त नाल्या, कचरा संकलन, पिण्याचे मुबलक पाणी, नियमित ग्रामस्वच्छता आदी कामे झाली. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीसही चालना मिळाली आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी गावातील युवा पिढीचा पुढाकार आहे ही उल्लेखनीय बाब आहे.
विजय तायडे, पुरुषोत्तम चतरकर सामाजिक कार्यकर्ते, कापशी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT