Maize Agrowon
ॲग्रो गाईड

Maize : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

मका पिकामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी वाढत असल्याचे चित्र आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच एकात्मिक कीडनियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

टीम ॲग्रोवन

डॉ. ए. जी. लाड, डॉ. योगेश मात्रे, डॉ. राजरत्न खंदारे

मका (Maize) पिकामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा (Army worm Outbreak) प्रादुर्भाव अनेक ठिकाणी वाढत असल्याचे चित्र आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच एकात्मिक कीडनियंत्रण उपाययोजनांची (Integrated Pest Control Management) अंमलबजावणी करावी.

अमेरिकन फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी)

शास्त्रीय नाव - स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डा

-ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड असून, जून २०१८ मध्ये भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव आढळला.

- बहुभक्षीय कीड असून, ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते.

- गवतवर्गीय पिके उदा. मका, मधू मका, ज्वारी ही आवडीची. सोबतच हराळी, शिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वाटाणा, भात, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस, तंबाखू व गहू यावर वारंवार प्रादुर्भाव होतो.

जीवनक्रम व ओळख

१. चार अवस्था - अंडी, अळी, कोष व पतंग.

२. मादी पानावर किंवा खाली, पोंग्यामध्ये पुंजक्यामध्ये पिवळसर सोनेरी रंगाची एका वेळी २०० ते ३०० अंडी घालते. (अंडी अवस्था २ ते दिवस)

३. अळी ही अवस्था सहा अवस्थांतून पूर्ण होते. (अळी अवस्था १४ ते १९ दिवस)

प्रथम अवस्थेतील अळी - लहान, हिरवी, काळ्या रंगाचे डोके.

दुसऱ्या अवस्थेत अळी - डोके तपकिरी.

तिसऱ्या अवस्थेतील अळी - रंग तपकिरी, अंगावर तीन पांढऱ्या रेषा.

चौथ्या ते सहाव्या अवस्थेतील अळी - शरीरावर उंचवट्यासारखे ठिपके

४. कोष अवस्था - पूर्ण वाढलेली अळी २ ते ८ सेंटिमीटर जमिनीत मातीच्या आवरणात लालसर तपकिरी कोष तयार करते. (कोषावस्था ९ ते १२ दिवस)

५. पतंग अवस्था (चार ते सहा दिवस)

नर पतंग - राखाडी ते तपकिरी, पुढील पंखाच्या वरच्या बाजूला त्रिकोणी पांढरा ठिपका, पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका. मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचा असतो.

मादी पतंग -पुढील पंख राखाडी, मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचा.

एकूण जीवनक्रम ३२ ते ४६ दिवस.

स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डा अळी ओळखण्याची खूण

-डोक्याच्या पुढील बाजूस उलट इंग्रजी ‘Y’ आकाराची खूण

-शरीराच्या आठव्या ‘बॉडी सेगमेंट’वर चौकोनी आकारात चार ठिपके. त्यात केसही आढळतात.

-शरीरावर अन्यत्र अशी ठेवण नाही.

या किडीचा प्रसार वेगाने का होतो?

१) प्रवास क्षमता - स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डाचा पतंग एका रात्रीत १०० किमी, तर १५ दिवसांत २००० किमी प्रवास करू शकते. त्यामुळे अगदी दुर्गम भागातील मका पिकावर अंडी घातल्याचे आढळते.

२) प्रजनन क्षमता – मादी पतंग एका वेळी २०० ते ३०० अशी एकूण आयुष्यामध्ये ७ ते ८ वेळा २००० अंडी देते. यामुळे किडीची संख्या अल्पावधीत प्रचंड वाढते.

व्यवस्थापनाचे महत्त्व

अळीचे पुढील दोन लक्षणांवर आधारित व्यवस्थापन करावे

१. पिकावर वाढणारी लक्षणे अळीची वाढ दर्शवितात.

२. अळीच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य ते कीटकनाशक निवडावे.

नुकसानीचा प्रकार

१. मका रोपाची पाने पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसून आल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याचे समजून नियंत्रणाचे उपाय योजावेत.

२. तिसऱ्या अवस्थेतील अळी पोंग्यात शिरून पाने खाते.

छिद्रे दिसतात.

३. पाचव्या अवस्थेत पोंग्यामध्ये राहून पाने खाते. पानांवर मोठी छिद्रे दिसतात.

४. सहाव्या अवस्थेत अळी अधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. मक्‍याची पाने झडल्यासारखी दिसतात.

५. तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. मधुमका जास्त प्रमाणात बळी पडतो. आर्थिक नुकसान अधिक होते.

शेतात निरीक्षण कसे करावे?

शेताचे दररोज निरीक्षण करताना बाहेरील बाजूच्या तीन ते चार ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू (W) आकारात चालावे. या वेळी प्रत्येक ओळीतील पाच अशी एकूण वीस झाडे निवडावीत. पैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे याची नोंद घ्यावी. वीस झाडांपैकी दोन झाडे प्रादुर्भावित असतील तर नुकसान पातळी १० टक्के आहे असे समजावे. जर पीक रोपावस्थेत अथवा मध्य वाढीच्या अवस्थेत असेल तर नियंत्रणाचे उपाय योजावेत.

आर्थिक नुकसान संकेत पातळी

१. रोपावस्था ते सुरुवातीची पोंगा अवस्था (उगवणी नंतर दोन आठवड्यांपर्यंत)-तीन पतंग प्रति सापळा सलग तीन दिवस किंवा ५ टक्के प्रादुर्भावित झाडे

२. सुरुवातीची पोंगा अवस्था ते मध्य पोंगा अवस्था (उगवणीनंतर दोन ते चार आठवडे) : ५ ते १० टक्के प्रादुर्भावित झाडे

३. मध्य पोंगा अवस्था ते उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर ४ ते ७ आठवडे): १० ते २० टक्के प्रादुर्भावित झाडे

४. उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर सात आठवड्यांपुढे)- २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रादुर्भावित झाडे.

५. तुरा लागण्याची अवस्था ते पीक काढणी : १० टक्क्यांपेक्षा जास्त कणसाचे नुकसान.

एकात्मिक व्यवस्थापन

१. पाऊस पडण्याआधी खोल नांगरट. त्यामुळे किडीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते.

२. फेरपालट करावी. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्यावे.

३. पेरणी पाऊस पडल्यानंतर करावी. उशिरा पेरणी टाळावी.

४. गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी एकाच वेळी पेरणीचे नियोजन करावे. त्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.

५. आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी. उदा. मका+ तूर, उडीद, मूग

६. मका पिकाभोवती सापळा पीक म्हणून नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावावे. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५० मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

७. मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षिथांबे उभारावेत.

८. पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.

९. मक्यावरील लष्करी अळीसाठी कामगंध सापळे वापरावेत. (सर्वेक्षणासाठी एकरी ५. नियंत्रणासाठी एकरी १५) तसेच प्रकाश सापळे लावावेत.

१०. किडींचे नैसर्गिक शत्रू उदा. परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनोमस, कॅम्पोलेटीस इ.) यांचे संवर्धन करावे. त्यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी.

११. कामगंध सापळ्यामध्ये ३ पतंग/सापळा आढळल्यास, ट्रायकोग्रामा किंवा टिलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त ५० हजार अंडी प्रति एकर या प्रमाणे एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा शेतात प्रसारित करावीत.

१२. पोंगा व्यवस्थित तयार होईल, त्या वेळी माती आणि राख किंवा चुना (९:१) मिश्रण त्यात टाकावे.

१३. प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटारायझिम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

१४. प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीवर गेल्यास द्रावण पोंग्यात जाईल अशी फवारणी करावी.

(प्रमाण ः प्रति लिटर पाणी हाय व्हॉल्यूम पंपासाठी.)

१. थायामेथोक्झाम (१२.६ %) अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रिन (९.५ % झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) अर्धा मिलि किंवा

२. स्पिनेटोरम (११. ७ एससी) ०.९ मिलि किंवा

३. क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.४ मिलि

टीप ः

१. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करू नये.

२. एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हंगामात दोनपेक्षा जास्त वेळा करू नये.

३. तुऱ्याची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.

(टीप : एकात्मिक व्यवस्थापन, केंद्रीय कृषी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या ६ मे २०१९ व रासायनिक कीटकनाशकांचा वापर २८ मे २०१९ च्या कार्यालयीन परिपत्रकानुसार आहे.)

डॉ. ए. जी. लाड, (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४

डॉ. योगेश मात्रे, (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT