Fertilizer Use
Fertilizer Use Agrowon
ॲग्रो गाईड

Fertilizers : खतांचा अनावश्यक वापर कसा टाळाल?

Team Agrowon

सध्या ऐन हंगामात खतांच्या ( Fertilizers) वाढत्या किंमती आणि तुडवडा यामुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे आहे त्या उपलब्ध खतांचा कार्यक्षम वापर करणे गरजेचे झाले आहे. विविध खतांपैकी कोणत्या खतामध्ये कोणत्या अन्नद्रव्याचे किती प्रमाण असते, ते कोणत्या स्वरूपात आहे हे पाहावे. तसेच आपल्या पिकासाठी व जमिनीसाठी हे खत योग्य आहे का हे पडताळून पाहावे. अशा प्रकारे केलेल्या खतांचा वापर मूलभूत शिफारशीपेक्षा जास्त परिणामकारक ठरतो. त्यामुळे अनावश्यक खतांचा वापर टाळता येऊ शकतो. खत व्यवस्थापनाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील शिफारशी केलेल्या आहेत. त्यानुसार पिकातील खत व्यवस्थापन करावे.

पीक लागवडीपासून ते वाढीस असताना त्यांच्या विविध अवस्थांमध्ये पिकात वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते. स्फुरद, पालाशयुक्त खते पिकास उपलब्ध होण्यास वेळ लागतो. त्यामुळे संपूर्ण मात्रा पीक पेरणीच्या वेळेस द्यावी लागते. आवश्यकता असल्यास फुलोऱ्याची वेळ, दाणे भरण्याची अवस्था या काळात विद्राव्य खतांची फवारणी केल्यास अधिक फायदेशीर ठरते.


- काही भागात अतिवृष्टी झालेली आहे. अशा ठिकाणी उभ्या पिकात पाणी साचलेले आहे. पाणी साचलेल्या जमिनीत खते देऊ नयेत. कारण जमिनीतील ओलावा सुद्धा खतांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतो. अशा जमिनीत नत्राच्या विलगीकरणामुळे नायट्रेटचे रूपांतर वायुरूप नत्रात होते व ते पिकास उपलब्ध होत नाही.

- जमिनीतील अति ओलावा किंवा कमी ओलावा या दोन्ही परिस्थितीत खतांची कार्यक्षमता कमी होते व त्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते.

- पावसाचा अंदाज घेऊन व जमिनीतील पूर्व ओलावा लक्षात घेता खतांचं व्यवस्थापन करावं. पाऊस झाल्यावर लगेच किंवा पावसाने मोठी उघडीप दिली असल्यास पिकास खते देणे टाळावे. पावसाचा पूर्व अंदाज घेऊनच खतांचा वापर करावा.

- नत्रयुक्त खतांचा ऱ्हास लवकर होत असल्यामुळे त्यांची आवश्यकतेनुसार दोन ते तीन भागात विभागणी करून पिकास द्यावी. मुख्यत्वे नत्रयुक्त खतांची अर्धी मात्रा पीक लागवडीच्या वेळेस द्यावी. उरलेली अर्धी मात्रा पीक लागवडीपासून ३० दिवसांच्या अंतराने दोन वेळेस विभागून द्यावी. यामुळे नत्र खतांचा होणारा अपव्यय टाळता येईल.

- खतांच्या कार्यक्षमतेमध्ये जमिनीच्या आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजे सामू यास महत्त्वाचे स्थान आहे. जमिनीतील विद्राव्य खताच्या जास्त प्रमाणामुळे जमिनीचे गुणधर्म बदलतात. अशा जमिनीत खतांचा कार्यक्षम वापर होत नाही.

- क्षारयुक्त जमिनीचा निचरा सुधारण्यासाठी चर काढणे, क्षार गोळा करणे, क्षार धूऊन काढणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, चोपण जमिनीसाठी जिप्सम या भूसुधारकाचा वापर करावा.

जमीन जास्त आम्ल असल्यास पिकांकडून खतास मिळणारा प्रतिसाद कमी होतो. यासाठी चुना या भूसूधारकाचा वापर करावा. त्यामुळे पिकांद्वारे खतांचा प्रभावीपणे वापर केला जातो.

- ज्या जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट यासारख्या गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर करावा.

- डाळवर्गीय व गळित पिकांमध्ये गंधकाची आवश्यकता जास्त असते. अशा पिकास गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा.

- क्षारयुक्त जमिनीत युरिया वापरल्यास त्याचे नायट्रेटमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागतो. परंतु नायट्रेट जमिनीत राहिल्यास पिकास अपायकारक ठरते. म्हणून अशा जमिनीत अमोनियम नायट्रेट वापरावे.

- आम्लयुक्त जमिनी सोडून इतर जमिनीत पाण्यात विद्राव्य असलेली स्फुरदयुक्त खते वापरावीत. उदाहरणार्थ सिंगल सुपर फॉस्फेट.

- माती परिक्षण अहवालात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा सुद्धा द्यावी. कारण ही अन्नद्रव्ये सुद्धा मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याइतकीच महत्त्वाची असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT