सध्या हळद (Turmeric) पिकामध्ये कंदमाशी (Kandmashi) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ही कीड हळदीमध्ये अत्यंत घातक व नुकसानकारक असून मुख्यतः कंदकुज होण्यास कारणीभूत आहे. कंदकुज आणि त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कंदमाशीचे व्यवस्थापन वेळेत होणे अत्यंत गरजेचे आहे. किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास हळद पिकात मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याकरिता वेळीच लक्ष देऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेल्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात जेणेकरून होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
कंदमाशी कशी ओळखाल?
कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.
कंदमाशी नुकसान कसं करते?
या किडीच्या अळ्या उघड्या कंदामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा कंदामध्ये नंतर बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. अशा झाडांची पाने पिवळी पडतात आणि खोड व कंद मऊ होऊन त्यांना पाणी सुटून ते कुजतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते.
प्रादुर्भाव कशामुळे होतो?
सततचा पाऊस आणि जास्त दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.
व्यवस्थापन कसं कराल?
कसबे डिग्रज जि. सांगली येथील हळद संशोधन केंद्राच्या संदर्भानूसार...
१. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारावे. या सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.
२.जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
३. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
४. पीक तण विरहित ठेवावे.
५. जमिनीतून क्लोरपायरीफॉस (५० टक्के) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीडनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी.
६. कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
७. कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किडनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.
८. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.
९. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.
लक्षात घ्या हळद पिकावर केंद्रीय कीडनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्याने विद्यापीठाने संशोधनातून शिफारस कलेले निष्कर्ष दिले आहेत. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या ०२४५२-२२९००० या क्रमांकावर संपर्क साधावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.