Sitaphal Bahar Agrowon
ॲग्रो गाईड

Sitaphal Bahar : सीताफळ बहराची घाई नको...

सीताफळ हे हलक्या ते मुरमाड अशा जमिनीत येणारे कोरडवाहू फळपीक आहे. अत्यंत कमी पाणी, खर्च आणि अत्यल्प मशागतीमध्ये चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. त्यासाठी बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

Team Agrowon

डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, नितीश घोडके

सीताफळामध्ये (Custard Apple) जून महिन्यात नैसर्गिक बहर (Sitaphal Bahar) येतो. मात्र पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहर धरता येतो.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागात प्रामुख्याने उन्हाळी बहर (Summer Blossom ) घेतला जातो. उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होऊन बाजारात चांगला दर (Sitaphal Rate) मिळू शकतो.

वातावरणातील थंडीमुळे (Cold) अजूनही सीताफळाची झाडे सुप्तावस्थेत असून, झाडांची पूर्णपणे पानगळ झालेली नाही. अशा स्थितीतही सध्या उन्हाळी बहर धरू इच्छिणाऱ्या काही शेतकऱ्यांनी झाडांची छाटणी पूर्ण केली आहे; तर काही शेतकरी छाटणी करण्याच्या तयारीत आहेत.

अशा प्रकारे थंडी संपण्यापूर्वी सीताफळाची छाटणी केल्यास येणाऱ्या नवीन कोवळ्या फुटीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे या सारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

रसशोषक किडी पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषतात. यामुळे नवीन फुटींची व पानाची वाढ खुंटते. फळांचा आकार वेडावाकडा होतो. फळांची वाढ व्यवस्थित होत नाही.

तसेच या किडीद्वारे टाकल्या गेलेल्या चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते. परिणामी, पाने व कोवळ्या फांद्याचे शेंडे, तसेच फळे काळपट पडतात.

फळांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. ही सारी समस्या टाळण्याकरिता फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी झाल्यानंतरच बहराची कामे सुरू करावीत.

...असे करावे उन्हाळी बहर व्यवस्थापन

१) झाडांची छाटणी करणे : मागील हंगामातील फळांची काढणी झाल्यानंतर पाण्याचा ताण व हिवाळ्यातील कमी तापमानामुळे सीताफळ झाडांची पानगळ होऊन झाडे सुप्तावस्थेत जातात.

अपेक्षित फळधारणा व फळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने झाडाच्या फांद्यांची हलकी छाटणी करणे आवश्यक असते. उन्हाळी बहर धरावयाचा असल्यास फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात छाटणी करावी.

छाटणीमुळे झाडांची वाढ नियंत्रित ठेवून झाडावर मर्यादित फळे राहतात. ती आकाराने मोठी होतात, तसेच फळांची गुणवत्ता वाढते.

छाटणी करताना जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्‍यक व दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.

झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास भरपूर सूर्यप्रकाश मिळेल.

झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे यांच्याशी संबंधित आहे. झाडास मिळणारा सूर्यप्रकाश कमी असल्यास कमी फळधारणा होते.

झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत मोकळी करून, त्यावर बोर्डो पेस्ट (१० टक्के) लावावी.

झाडांवर नवीन फूट फुटण्यापूर्वी बोर्डो मिश्रण (१ टक्का) (१०० ग्रॅम चुना अधिक १०० ग्रॅम मोरचूद प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी.

२) पाणी व्यवस्थापन : नैसर्गिक बहरात निव्वळ पावसाच्या पाण्यावरसुद्धा चांगले उत्पादन मिळते. परंतु उन्हाळी बहरात जमिनीच्या मगदरानुसार भारी जमिनीत ५-६ व हलक्या जमिनीत ३-४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे.

फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब केल्यास ५० -७० टक्के पाणी वाचते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

२) अन्नद्रव्य व्यवस्थापन : पूर्ण वाढ झालेल्या बागेतील झाडांना प्रति झाड २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद, १२५ ग्रॅम पालाश व ५० किलो शेणखत किंवा ६ किलो गांडूळ खत अशी खतमात्रा द्यावी.

नत्राची निम्मी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देताना द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा त्यानंतर ३० दिवसांच्या अंतराने द्यावी. माती परीक्षणा, तज्ज्ञांच्या सल्ल्याने सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरावीत.

बहर नियोजनातील महत्त्वाच्या बाबी...

बागेतील जमिनीची नांगरट आणि खणणी करावी व जमीन चांगली तापू द्यावी. म्हणजे जमिनीत असणाऱ्या रोग आणि किडींचा नाश होईल.

सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते. उन्हाळी बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्याने त्याचा सीताफळाच्या फळधारणेवर परिणाम होतो.

बऱ्याच वेळा चांगली फुले लागतात, पण फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बागेत वाढलेले तापमान आणि कमी आर्द्रता.

ज्या भागामध्ये आर्द्रता कमी असते, अशा बागेत बाजरीचे आंतरपीक घ्यावे. त्यामुळे बागेत आर्द्रता राखण्यास मदत होते. फळधारणा वाढते.

उन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्‍यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ महिने पाणी तोडून पानगळ करून घ्यावी. चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्‍यक असते.

ताण देण्याचा काळ संपल्यावर बहर धरण्यापूर्वी रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने बागेतील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

छाटणी करताना झाडावर शिल्लक राहिलेली रोगट फळे, रोगट फांद्या, पाने, गर्दी होत असलेल्या फांद्या छाटून छाटणीनंतर सर्व रोगग्रस्त अवशेष गोळा करून नष्ट करावेत.

झाडांच्या खोडाभोवतीच्या जमिनीत क्लोरपायरिफॉस (१.५ टक्का भुकटी) हेक्टरी १० किलो या प्रमाणात मिसळावी.

बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत असे फायदे मिळतात. यासाठी प्लॅस्टिक आच्छादन, अथवा सेंद्रिय घटक उदा. पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा यांचा वापर करता येतो.

बागेतील तण, बांधावरील गवत आणि लहान झुडपे, झाडे उदा. ग्लिरिसिडीया, जास्वंद, चिंच इ. वाढू देऊ नये. तसेच बागेशेजारी भेंडी आणि कपाशी यासारखी पिके घेऊ नयेत. कारण या पिकांवर पिठ्या ढेकूण कीड मोठ्या प्रमाणावर वाढते. तिचा प्रादुर्भाव सीताफळ बागेत होऊ शकतो.

पिठ्या ढेकणाच्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठी खोडांची व फांद्यांची बहरापूर्वी स्वच्छता महत्त्वाची आहे. पिठ्या ढेकणाची पिले खोडावरून झाडावर चढतात. यासाठी उपाय म्हणून १५ ते २० सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिक पट्टी खोडाला बांधावी. त्याला ग्रीस लावावे, त्यामुळे पिले ग्रीसला चिकटून मरून जातात. झाडावर या किडीच्या प्रादुर्भाव होण्यास आळा बसतो.

- डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५

(उद्यानविद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके -अंजीर आणि सीताफळ संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT