Water Conservation  Agrowon
ॲग्रो गाईड

Water Conservation : जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया तुम्हाला माहितेय का?

जमिनीतील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. खूप मोठी आकडेवारी देण्यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचे तर ४० ते ५० वर्षांपूर्वी विहिरीतून मोटेद्वारे पाणी काढले जायचे.

Team Agrowon

सतीश खाडे

Water Issue : एका गावात सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळ पडण्याची चिन्हं दिसत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी पावसासाठी देवाकडे गाऱ्हाणे मांडायचे ठरविलं. ग्रामदैवत महादेवाला दुधात बुडवून टाकायचं असा विचार झाला.

यामुळे देव खडबडून जागा होईल, आणि त्याला पाऊस पाडण्यास भाग पाडायचे. ठरले तर! सर्वांनी पुढच्या सोमवारी तांब्याभर दूध आणून महादेवाच्या पिंडीवर वाहायचे. पिंडीवर पडणारे दूध मंदिराबाहेर वाहून जाऊ नये, याची व्यवस्था करण्यात आली.

सोमवारी सकाळी एकेक जण येऊन मंदिराच्या खिडकीतूनच दुधाचा तांब्या ओतू लागला. आता महादेवाची पिंड दुधामध्ये बुडू लागली. मंदिराचा दरवाजाही बंद होता. खिडकीतून अंधाऱ्या गाभाऱ्यातील काही दिसत नव्हतं.

सगळ्या गावाची पाळी येऊन गेल्यावर एका बुजुर्गाने मंदिराच्या आत डोकावून पाहिले की, महादेव किती बुडाला.

तेव्हा दुधाऐवजी गाभाऱ्यात सर्व पाणीच असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्याचं कारण असं की, प्रत्येक गावकऱ्याने हाच विचार केला की इतर सर्वजण दूध टाकणार आहेत, तर मी एक तांब्या पाणी टाकलं तर ते सबादून जाईल, त्याने काही फरक पडणार नाही.

आपण सर्वजण पाण्याचा विशेषतः भूजलाचा वापर करताना सर्वसाधारणपणे असाच विचार करतो. ‘मी एकट्याने पाणी वाचवून काय उपयोग’ किंवा ‘मी एकटाच पुनर्भरणाचा विचार कशाला करू’. त्यामुळेच महादेव कायम दुधाऐवजी पाण्यातच बुडतो आणि पाणी संपून जाते.

विहीर, बोअरवेल कोरड्या पडतात. पाण्यासाठी आणखी चार ठिकाणी बोअरवेलसाठी खर्च केला जातो. पण, पुनर्भरण वा काटेकोर व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जात नाही.

जमिनीतील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. खूप मोठी आकडेवारी देण्यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचे तर ४० ते ५० वर्षांपूर्वी विहिरीतून मोटेद्वारे पाणी काढले जायचे. तेव्हा पाण्याची पातळी १५ ते २० फुटांवर होती. आज बोअरवेलला २०० फुटांवरही पाणी लागत नाही. लागलंच तर तो खूप नशीबवान समजला जातो.

आठशे, हजार, बाराशे फूट खोलीपर्यंत बोअर घेतल्या जातात. नद्या अन् धरणं असली तरी त्याच्यामुळे बारमाही बागायत जास्तीत जास्त २० ते २५ टक्क्यांपर्यंतच आहे. उर्वरित शेती भूजलावर अवलंबून आहे. राज्यासह देशातील ७५ ते ८० टक्के जमीन ही भूजलावर अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्याची स्पर्धा शेतीच्या पाण्यासोबत होत आहे.

लाखो वर्ष साठलेले गावोगावचे भूजल गेल्या ६० ते ७० वर्षांपासून आपण संपवत आणले आहेत. काही ठिकाणी तर संपवले देखील आहेत. त्यामुळे भूजल पातळी वाढवणे फक्त अटल भूजल योजनेतील गावे व भागांतच नाही तर सर्वत्रच अत्यंत गरजेचे आहे.

पाणी मुरण्याची प्रक्रिया ः

लाखो वर्षांपासून पावसाच्या पडणाऱ्या पाण्यातूनच भूजलाची निर्मिती झाली आहे. पावसाचे पाणी भूजलात रूपांतर होण्याची प्रक्रिया ही पाणी मुरण्याने होते.

पाणी मुरण्यासाठी एकूण पर्जन्यमान, पर्जन्यकाळ, दोन पावसातील अंतर, जमिनीचा उतार, मातीचा प्रकार, मातीची खोली, मातीखालील खडकांचे प्रकार, परिसरातील बाष्पीभवनाचा वेग आणि पावसाची तीव्रता इ. बाबी महत्त्वाची भूमिका बजावतात.

पाऊस व पाणी मुरणे ः

पाऊस संततधार व कमी तीव्रतेने पडत असेल तर पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक असते, त्यास ‘भीज पाऊस’ असेही म्हणतात. याउलट कमी वेळात अधिक पाऊस झाला, तर पाणी मुरणे कमी होते. खूप कमी पाऊस पडला, तर मातीत मुरलेले पाणी खडकात जिरण्याइतके नसते अन् ते बाष्पीभवनात उडून जाते.

जमीन उतार व पाणी मुरणे ः

अभ्यासकांनी जमिनीच्या उताराचे साधारण ३ भाग वर्णिले आहेत. ते पुढीलप्रमाणे..

१) तीव्र उतार ः

हा पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त उतार असलेला भाग असतो. असा उतार डोंगराच्या सर्वात वरील भागात पाहायला मिळतो. इथे जंगल वा उघडे खडक असतात. या भागामध्ये पडलेल्या पावसाचे पाणी वाहूनच जाते. या भागाला अपधाव क्षेत्र (runoff zone) असेही म्हणतात. येथे पाणी मुरतच नाही.

२) मध्यम उतार ः

या ठिकाणच्या जमिनीला ५ ते १५ टक्केपर्यंत उतार असतो. या भागात वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो आणि पाणी मुरण्याचे प्रमाण चांगले असते. येथे पाणी अडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठीची परिस्थिती ही पूरक असते. यालाच ‘पुनर्भरण क्षेत्र’ (Recharge Zone) असेही म्हणतात.

३) सखल प्रदेश ः

उतार पाच टक्क्यांपेक्षा कमी असतो. या भागात प्रामुख्याने शेती केली जाते. ओढे, नदी, नाले यावर छोटी मोठे धरणे बांधता येतात. या भागांत पाणी साठविण्यासाठी सर्वोत्तम अनुकूल परिस्थिती असते.

यालाच ‘साठवण क्षेत्र’ असे म्हणतात. पाणी साठविले गेल्याने जमिनीत मुरण्याचे प्रमाणही या ठिकाणी चांगले असते. मातीच्या प्रकारावरही पावसाच्या पडणाऱ्या मुरण्याचे प्रमाण अवलंबून असते.

वरील चर्चा केलेले पाऊस, उतार, माती हे सर्व घटक सामान्यपणे डोळ्यांना दिसणारे व सहज निरीक्षण करता येण्याजोगे आहेत. त्यामुळे त्याविषयीचे माहिती किंवा जाणून घेणे अधिक सोपे आहे. मात्र, खडकांच्या बाबतीत तसे नाही.

मातीच्या प्रकारावर मातीची सछिद्रता अवलंबून आहे. तर सछिद्रतेवर पाणी मुरण्याचे प्रमाण अवलंबून असते. तक्ता क्र. १

माती-मुरूम निहाय सच्छिद्रता ः

चिकण माती ः ४५ ते ५० टक्के

वाळुयुक्त माती ः ४५ ते ५० टक्के

बारीक रेती ः ३० ते ३५ टक्के

मध्यम वाळू ः ३५ ते ४० टक्के

गोटे व वाळू ः २० ते ३५ टक्के

सँड स्टोन (वाळूचा दगड) ः १० ते २० टक्के

मातीचा दगड ः १ ते १० टक्के

चुन्याचा दगड ः १ ते १० टक्के

जांभा खडक ः ३० ते ३५ टक्के

मऊ मुरूम ः २ ते १४ टक्के

कठीण मुरूम ः १ ते ८ टक्के

गेरू ः ३५ टक्के

काळा कठीण खडक ः ०.१४ ते १ टक्के

खडक आणि भूजल ः

१) खडकांच्या भेगा, छिद्रे, दोन खडकांमधील जागा यात मुरलेले पाणी साठवले जाते. ज्या खडकांमध्ये पाणी साठवले जाते त्यांना ‘जलधर’ (Aquifer) असे म्हणतात. सर्वच खडक जलधर नसतात. बऱ्याचदा खडकांची रचना ही साधारणपणे जमिनीलगत जलधर, त्याखाली पक्का अछिद्र खडक (solid rock) आणि त्याखालोखाल पुन्हा जलधर अशी असते.

जमिनीपासून जवळ असणाऱ्या जलधराला ‘उथळ जलधर’ (Shallow Aquifer) आणि खोलीवर असणाऱ्या खडकाला ‘खोल जलधर’ (Deep Aquifer) असे म्हणतात.

२) विहिरीला पाणी उथळ जलधरातून तर बोअरवेलला खोल जलधरातून मिळते. तेथे खडक सच्छिद्र असतात. खडकांचा जो काही भाग पाणी मुरण्याचा असतो, त्याला ‘पुनर्भरण उपयुक्त क्षेत्र’ असे म्हणतात.

तर ज्या भागांत पाणी साठवून ठेवलेले असते, त्याला ‘भूजल उपलब्धतेचे क्षेत्र’ म्हणतात. खडकात खाली गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने पाण्याचा प्रवाह ही चढाकडून उताराकडे कधी जलद ते सावकाश गतीने सुरू असतो.

३) उत्तर प्रदेशमधील बऱ्याचशा भागात एकूण पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी ३१ टक्के पाणी जमिनीत मुरते. पंजाबमध्ये १८ टक्के, हरियानात १६ टक्के तर दक्षिण भारतातील खडकाळ प्रदेशात ३ ते १२ टक्के पावसाचे पाणी जमिनीत मुरते. मात्र, पाणलोट क्षेत्र विकासानंतर हे प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

४) कोकणातील घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो. मात्र, जमिनीतील कठीण खडकांमुळे अर्धा टक्के पाणी देखील मुरत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT