हिवाळ्यात कमी होणार तापमान हे विविध फळबागेसाठी (Fruit Crop) समस्या ठरू शकतं. थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी फळबागेमध्ये योग्य त्या तापमान नियंत्रणाच्या उपाययोजना वेळीच कराव्यात.
त्यातून कमी खर्चातून फळबागेचे आयुष्यकाळ वाढवण्यास मदत होईल. राज्यात हिवाळ्यातील तापमान हे अनेकवेळा १६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं.
अशा कमी तापमानाचा फळझाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. विविध फळपिकांची कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांची मर्यादा वेगवेगळी असते.
त्यामुळे आपल्या विभागातील तापमानाचा विचार करूनच फळपिकांची निवड केली पाहिजे. त्यातून फळबागांची उत्तम वाढ व दर्जेदार उत्पादनाची शाश्वती मिळत असली तरी ऋतूनुसार हवामानामध्ये होणारं कमी अधिक बदल पिकांसाठी त्रासदायक ठरू शकतात.
हे बदल मुख्यतः तापमान आणि आर्द्रतेच्या बदलांमुळे होत असतात. सामान्यपणे ज्या वेळी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं, तेव्हा उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील फळझाडांची कार्यशक्ती कमी होते.
त्यापेक्षाही तापमान कमी झाले तर झाडांच्या पानांना इजा होऊन ती करपतात. फळांना भेगा पडतात. फळे काळी पडतात. मुख्यतः केळी, द्राक्षे व पपई या पिकांचे कडाक्याच्या थंडीमुळे नुकसान होण्याची शक्यता असते.
जर तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषय़ी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?
फळबागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, पांगरा, मलबेरी व बांबू या सारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.
बागेभोवती सजीव कुंपण लावले नसल्यास थंड वाऱ्यापासून संरक्षणासाठी लागलीच बागेभोवती चोहोबाजूनं दोन ओळीत शेवरी, गजराज गवत, एरंड, गिरिपुष्प अथवा सुरुची दाट लागवड करावी.
बागेत झाडांची सतत निगा राखावी व छाटणी करावी.
मुख्य फळझाडे लहान असताना रबी हंगामात मोकळ्या व रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पिके घ्यावीत.
केळी, पपई व पानवेलीच्या बागेभोवती दाट शेवरी लावून सजीव कुंपण तयार करावं.
नियंत्रणाचे उपाय
थंडीच्या प्रमाणाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्यांच्या पूर्वसूचनांकडे लक्ष ठेवावं. अशा पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री अथवा पहाटेच्या वेळेस ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा.
असे पाणी दिल्याने बागेतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. विहिरीच्या पाण्याचे तापमान हे कालव्यापेक्षा थोडे जास्त असते, याचा फायदा होतो.
झाडाच्या खोडापाशी व आळ्यात तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावं.
यामुळे मुळांच्या परिसरातील तापमान नियंत्रित राहू शकेल. अत्यंत कमी झालेल्या तापमानाचा झाडांच्या मुळ्यांवर व कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही.
केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी.
यामुळे अन्नद्रव्ये मिळण्यासोबतच पेंड कुजतेवेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे बागेतील तापमान सुधारतं. याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.
थंडीचे प्रमाण कमी होईल, तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये. यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही.
रोपवाटिकेतील रोपे, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट किंवा तट्टे याचे छप्पर उभारावे.
असे खोपट/छप्पर सायंकाळी ६ वाजता घालावे व सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर काढून घ्यावे. छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथीनचाही वापर करता येतो.
रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी पालापाचोळा किंवा काडीकचरा जाळून धूर करावा.
नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. पालाशयुक्त खते जसं म्युरेट ऑफ पोटॅश किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची व वहनाची क्षमता वाढते.
नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीस प्रतिकारक जाती वापराव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.