डॉ. शरद जाधव, डॉ. पंकज मडावी, डॉ. तानाजी वळकुंडे
काल आपण पंचसूत्री लागवड तंत्रज्ञानातील चार सुत्रे पाहिली. आजच्या लेखामध्ये पीक संरक्षणाची माहिती घेऊ.
अ) एकात्मिक कीडनियंत्रण
रब्बी ज्वारीमध्ये (Rabi Jowar) खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि कणसातील अळ्या या महत्त्वाच्या किडी आहेत. त्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवण्यासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा (Integrated Pest Management) वापर करावा.
मशागतीय तंत्रामुळे जमिनीतील सुप्तावस्थेत असलेल्या किडी व त्यांची अंडी इ. पक्षी व इतर कीटकभक्षकांकडून आणि वातावरणातील उष्णतेमुळे नाश होतो. कीटकांची संख्या मर्यादित राहते. त्यासाठी उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देणे आवश्यक आहे. ज्वारीचा कडबा जनावरांना खाण्यास देतेवेळी बारीक तुकडे (कुट्टी) केल्यास कोशाचा मोठ्या प्रमाणात नाश होतो.
पुरेसा पाऊस पडल्यावर शक्य तितक्या लवकर (१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर) ज्वारीची पेरणी केल्यास खोडमाशीपासून पीक वाचवता येते. पिकांची फेरपालट हेही महत्त्वाचे ठरते.
पेरणीपूर्वी बियाण्यास थायामेथोक्झाम (३०% एफ.एस.) १० मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (४८ % एफ.एस.) १० मि.लि. अधिक २० मि.लि. पाणी प्रति १ किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.
पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी साधारण १० टक्क्यांपर्यंत पोंगे मर आढळून आल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत झाल्याचे समजून खोडकिड नियंत्रणाचे उपाय करावेत. त्यासाठी, क्विनॉलफॉस (२५ % ई.सी.) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात १ किंवा २ फवारण्या कराव्यात.
ब) रोगनियंत्रण
प्रमुख रोग ः खडखड्या, पानावरील करपा, तांबेरा, चिकटा आणि कणसातील काणी.
काणी रोगाच्या नियंत्रणासाठी, पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक (८० डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति किलो ही प्रक्रिया करावी.
खडखड्या रोगाच्या प्रादुर्भावास जमिनीतील पाण्याची कमतरता आणि जास्त उष्णतामान अनुकूल असते. त्यासाठी विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण असल्यास पिकास एखादे पाणी द्यावे. त्याच प्रमाणे पेरणीनंतर चौथ्या आठवड्यात सेंद्रिय आच्छादन (हेक्टरी ५ टन तूरकाड्या) केल्यास खडखड्या रोगामुळे ताटे लोळण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी होते. धान्य उत्पादनात १४ टक्क्यांनी वाढ होते.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी करावी. वेळीच केलेल्या पीक संरक्षणामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते.
उत्पादन
या पंचसूत्रीचे काटेकोर पालन केल्यास कोरडवाहू ज्वारीचे हेक्टरी हलक्या जमिनीवर ८ ते १० क्विंटल, मध्यम जमिनीवर २० ते २५ क्विंटल, भारी जमिनीवर २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळू शकते. तर बागायती ज्वारीचे ३० ते ३५ क्विंटल उत्पादन मिळते. कोरडवाहू क्षेत्रात धान्यापेक्षा दुप्पट तर बागायतीत अडीच ते तीन पट कडब्याचे उत्पादन मिळते.
- डॉ. शरद जाधव,
९९७०९९६८९०
(विषय विशेषज्ञ -कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर)
टीप- बीजप्रक्रिया करण्यापूर्वी त्यास यापूर्वी कोणत्या रासायनिक घटकांची प्रक्रिया झाली आहे ते तपासावे. त्यानुसार वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.