कोर्टकचेरी Agrowon
ॲग्रो गाईड

कोर्टकचेरी

एकाच आईची दोन लेकरं. दोन्ही मुंबईला. दोघांनाही तसं दुसरं कोणी नाही. दोस्तिचं आणि दुष्मनीचंही. सगळं सुरळीत. पण तसं होईल तर ती गावगुंडी कसली.

संतोष डुकरे 

संतोष डुकरे

एकाच आईची दोन लेकरं. दोन्ही मुंबईला. दोघांनाही तसं दुसरं कोणी नाही. दोस्तिचं आणि दुष्मनीचंही. सगळं सुरळीत. पण तसं होईल तर ती गावगुंडी कसली. बाप गेला अन् सुताक फिटायच्या आत भांडणं सुरु. वाटण्या हव्या. बहिणींनी समजावून पाहिलं. पण नाही. शेवटी निमुट सह्या करुन बाजूला झाल्या आणि गावगुंडांचं फावलं. ढेपंला मुंगळं चिटकलं.

पहिली भांडीकुंडी वाटली. घंगाळ्यावरुन बाचाबाची झाली. पण मिटली. मग घरावरुन भडका उडाला. चार खणाच्या ऐसपैस घरात उभी भिंत पडली. पण दोघांनाही उजवी बाजू हवी. हा वाद कायम ठेवून मध्यस्तांनी वावरांना हात घातला.

खालची ताल धाकल्याला, वरची थोरल्याला. मळई याला, खळई त्याला. असं चाललं. ताबा होईतो वाटण्या टिकल्या. तोपर्यंत दोघांचंही कान हितचिंतक कानावल्यांनी चावलं आणि पुन्हा वाद सुरु झाला. प्रकरण कोर्टात गेलं. 15-20 वर्षे झाली. दोघंच काय कोर्टही माघं हटेना. खेटी सुरुच. ना कामावं ध्यान, ना बायकापोरांकडं लक्ष, ना वावरं पिकली ना घर टिकलं. एकमेकाची जिरवण्याच्या नादात कुटूंबाची अधोगती दोघांनाही समजेना. वकिलांचं खिसं भरता भरेना आणि हे दोघेही थकेना.

कालच्या तारखेला वादी महाशय आपल्या विशीतल्या पोऱ्यालाही घेवून आले. सोबत कानावलेही होतंच. एस.टी स्टॅंडवर नगर कल्याण गाडीची वाट पाहत बाप पोराला केस समजून सांगत होता.

कितीही वेळ लागू दे, खर्च होवू दे... पण त्या बावळटाला अद्दल घडवल्याशिवाय थांबायचं नाही. यावर कानावलं म्हणे, त्यो कसला सुटतोय आपल्या कचाट्यातून, आपली बाजू पावरफुल हे. काळजी करु नका मी सांभाळतो सगळं निट. बाप केलानं मुंडी हलवली. एस.टी.आली. बुडं हालली.

हातभर पसरलेलं तोंड गाडी ढळल्यावर आवरतं घेत कानावलं टपरीवं आलं. वळखीच्यानं विचारलं... कोण होतं रं त्ये. व्हतं याक बावळाट. लहानपणापासून भांडतंय. हाये त्याच्या दुप्पट नवं वावार आलं आसतं यवढं पैसं भांडणात घालावलंत. घालवनं का जायना त्याचा मारी. आपल्याला काय खर्ची पाणी भेटण्याशी मतलब. चल मावा दे...

आई भुर्रर्रर्र, बाप भुर्रर्रर्र, आयुष्य भुर्रर्रर्र...

हाती फक्त कोर्टकचेरी अन् भांडणांचा वारसा... धन्य आहे !

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT