Vaal Crop disease Agrowon
ॲग्रो गाईड

Vaal Yellow Mosaic : वाल पिकावरील डोलिकस येलो मोझॅक रोगाचे नियंत्रण

Team Agrowon

डॉ. बबनराव इल्हे, डॉ. भानुदास गमे, भालचंद्र म्हस्के

वाल हे वेलवर्गीय पीक खरीप (जून-जुलै महिन्यांत), तर उन्हाळी (जानेवारी - फेब्रुवारी महिन्यांत) हंगामात लागवड () केली जाते.

या दोन्ही हंगामांत रसशोषक किडींचा (Sucking Pest) आणि त्यांच्याद्वारे प्रसार होऊन विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Viral disease outbreaks) वाढल्याचे दिसते. त्या मागील मुख्य कारण म्हणजे सध्याचे बदलते हवामान (Change Weather), वातावरणातील सतत कमी - जास्त होत असलेले तापमान होय.

वाल पिकात पुढील विषाणूजन्य रोग आढळून येतात.

१) डोलीकस येलो मोझॅक व्हायरस (Dolichos yellow mosaic virus) बेगोमोव्हायरस,

२) डोलीकस मोझॅक व्हायरस (Dolichos mosaic virus) पोटीव्हायरस,

३) डोलीकस इनॅशन मोझॅक (Dolichos enation mosaic) टोबॅमोव्हायरस,

४) क्लोव्हर येलो व्हेन व्हायरस (Clover yellow vein virus) पोटीव्हायरस,

५) पीनट स्टंट व्हायरस (Peanut stunt virus) कुकूमोव्हायरस,

६) बीन कॉमन मोझॅक नेक्रोसीस व्हायरस (Bean common mosaic necrosis virus) पोटीव्हायरस इ.

या विषाणूजन्य रोगांपैकी पिवळा मोझॅक रोग हा डोलीकस येलो मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होणारा रोग प्रामुख्याने अधिक प्रमाणात आढळून येतो, तर डोलीकस मोझॅक व्हायरस या विषाणुजन्य रोगाचे प्रमाण अल्प आढळते.

या रोगांचा प्रादुर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी लागवडीपासूनच रसशोषक किडींच्या नियंत्रणाची योग्य काळजी घ्यावी.

डोलीकस येलो मोझॅक व्हायरस रोगाची लक्षणे :

१) सुरुवातीला पानावर लहान फिकक्ट पिवळसर डाग किंवा चट्टे पडतात.

२) रोगाची तीव्रता वाढल्यास पानात गर्द पिवळे चट्टे पडून पूर्ण पान पिवळे पडून त्यात कमी जास्त हिरवट डाग दिसतात.

३) रोगाचा प्रादुर्भाव लवकर झाल्यास झाडाची वाढ खुंटते.

४) अशा वेलींना फुले येण्याचे प्रमाण कमी असते.

५) असलेल्या शेंगा या पिवळ्या पडलेल्या दिसतात.

डोलीकस येलो मोझॅक व्हायरस रोगाचा प्रसार :

१) वाल पिकात डोलीकस येलो मोझॅक व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरीमाशी या किडीद्वारे होतो.

२) वाल पिकाचे विषाणूग्रस्त झाडे बांधावर, घराशेजारी अथवा पिकाशेजारी असल्यास.

३) मूग, उडीद, सोयाबीन, कुळीथ, घेवडा अशी यजमान पिके किंवा काही गवतावर वाढणाऱ्या पांढऱ्या माशीमार्फत या रोगाचा प्रसार होतो.

४) विषाणूग्रस्त झाडांचे बी हे बियाण्यासाठी वापरल्यास.

उपाय योजना :

या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर कोणत्याही रसायनाची फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे रोगांचा प्रसार आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाच्या सुरुवातीपासून काढणीपर्यंत प्रयत्न करावे लागतात. कारण हा रोग पिकाच्या वाढीच्या सर्व टप्प्यांत होतो.

१) लागवडीसाठी विषाणूजन्य रोग विरहीत झाडांचे बियाणे निवडावे.

२) लागवडीसाठी शक्यतो काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर करावा.

३) लागवडीवेळी शेताभोवती सापळा पीक म्हणून ज्वारी किंवा मका पिकाच्या ४ ते ५ ओळी सर्व बाजूंनी लावाव्यात. यामुळे रोगाचा प्रसार कमी राहण्यास मदत होते.

४) वाल पिकाशेजारी असलेल्या पिके विशेषतः भाजीपाला पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण वेळीच करावे. उदा. मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटा, भेंडी व इतर वेलवर्गीय पिके इ.

५) मूग, उडीद, सोयाबीन, हुलगा, घेवडा अशी यजमान पिके वाल पिकात किंवा पिकाशेजारील प्लॅाटमध्ये घेऊ नयेत. तसेच अशी कोणती विषाणूग्रस्त झाडे बांधावर अथवा आसपास असल्यास उपटून नष्ट करावीत.

६) पीक तणविरहित स्वच्छ ठेवावे.

७) पिकातही विषाणूजन्य रोगाचे लक्षणे दिसताच अशी झाडे उपटून त्वरित नष्ट करावीत.

८) पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात पिवळे चिकट सापळे २५ ते ३० प्रति एकरी वापरावेत.

९) या पिकात विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होतो. त्यामुळे पीक ४ ते ५ पानांवर असल्यापासून फुले येईपर्यंत पांढरी माशी नियंत्रणासाठी फवारणीचे नियोजन करावे. त्यात सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीचे योग्य मिश्रण असावे.

फवारणी प्रति लिटर पाणी

१ः निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ३ मिलि किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम.

२) डायमेथोएट (३० ईसी) २ मिलि किंवा ॲसिटामिप्रीड (२० एसपी) ०.३ ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.४ ग्रॅम किंवा डायफेन्थ्युरॅान (५० डब्लूपी) १.२ ग्रॅम.

टीप ः आलटून पालटून फवारण्या ८-१० दिवसाच्या अंतराने वेळीच कराव्यात.

डॉ. बबनराव इल्हे, ९४०५००८९१४ (कवकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र निफाड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT