Pink Berry In grape Crop
Pink Berry In grape Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Crop : थंडी, तापमानातील फरकामुळे उद्भवणाऱ्या समस्या

डॉ. आर. जी. सोमकुंवर 

पिंक बेरीची समस्या

सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेतील वातावरणाचा विचार करता प्रत्येक ठिकाणी तापमानात चढउतार (Temprature) होत असताना दिसून येते. या वेळी दिवसाचे तापमान जास्त वाढत असून, रात्रीच्या तापमानात तितक्याच प्रमाणात घट होताना दिसून येते. वेळेवर छाटणी (Grape prunning) झालेल्या काही बागा किंवा त्यापूर्वी छाटलेल्या काही बागांमध्ये सध्या एकतर मण्यात पाणी उतरण्याची अवस्था असेल किंवा पाणी उतरण्यास दोन आठवड्याचा कालावधी असेल. अशा वातावरणामध्ये मण्यात असलेला हिरव्या रंगाचा द्रव गुलाबी रंगात रूपांतरित होतो. त्याला ‘पिंक बेरी’ (Pink Berry) असे म्हटले जाते.

नाशिकमधील काही तालुक्यांमध्ये या वेळी रात्रीच्या तापमानात बरीच घट झाली आहे. किमान तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत खाली गेले, तर दिवसाचे कमाल तापमान ३५ अंशांपर्यंत झालेले आहे. यामुळे द्राक्ष घडाच्या शरीरशास्त्रीय हालचालीमध्ये अचानक बदल होऊन हिरव्या द्रव्याचे गुलाबी रंगात रुपांतर होते. अशा प्रकारची द्राक्षे निर्यात करता येत नाहीत. सामान्य हिरव्या द्राक्षांपेक्षा या घडांमध्ये गोडी जास्त आढळून येते. यावर सध्यातरी कुठल्याही उपाययोजना दिसून येत नाहीत. मात्र द्राक्षघड पेपरने झाकणे हाच एक पर्याय बागायतदारांसमोर असतो.

या वेळी मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेच्या आठ ते दहा दिवस आधी पेपरने घड झाकण्याची कार्यवाही करून घेतल्यास पिंक बेरी टाळता येतो. पेपरने घड झाकल्यामुळे बाह्य तापमानाच्या तुलनेत घडाभोवतीच्या कमाल व किमान तापमानात तफावत कमी राहण्यास मदत होते. मात्र पेपरने घड झाकण्यापूर्वी बागेत रोग (भुरी) व किडी (मिलीबग) यांचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याची खात्री करून घ्यावी.

एकदा पेपर झाकल्यानंतर फळकाढणीच्या पाच ते सहा दिवस आधीच काढला जातो. तोपर्यंत पेपर तसाच राहत असल्यामुळे जर घडावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव असल्यास शेवटच्या अवस्थेत फळकाढणी करतेवेळी हिरवा राहिला तरी त्यावरील रोग किंवा किडीमुळे तो खाण्यालायक राहणार नाही. या वेळी बागेत कोणत्याही प्रकारच्या कीडनाशकांची (कीटकनाशक व बुरशीनाशक) फवारणी करण्याची शिफारस शक्यतो नसते. या काळात जैविक नियंत्रणाचा पर्याय उरलेला दिसतो. ट्रायकोडर्मा, स्युडोमोनस बॅसिलस, व्हर्टिसिलिअम लेकॅनी इ.ची फवारणी पूर्ण घड भिजेल, अशा प्रकारे करावी. त्यानंतरच पेपरने घड झाकून घ्यावा.

बऱ्याच वेळा बागायतदार द्राक्षघड पेपरने झाकण्यापूर्वी बागेत मोकळे पाणी देतात. यामुळे किमान तापमानात काहीशी वाढ होऊन भुरीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. हे टाळण्यासाठी आधी द्राक्ष घड पेपरने झाकून घ्यावेत व त्यानंतरच पाणी द्यावे. गरज असल्यास किंवा जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास मोकळे पाणी देता येईल. मात्र पाण्याचा वापर अशा प्रकारे करावी की वेलीची मुळे कार्यरत राहतील. अन्यथा, बऱ्याच वेळा पाणी दिल्यामुळे मुळे काळी पडू लागतात. पुन्हा त्यावर उपाययोजना करत राहाव्या लागतात. त्यातून खर्च वाढतो.

पांढऱ्या मुळांची वाढ करण्याकडे लक्ष द्यावे

थंडी जास्त वाढत असलेल्या बागेत फळछाटणीनंतर ५० ते ६० दिवसांच्या कालावधीत असलेल्या बागेत मण्याचा आकार अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. बागेतील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली आल्यास वेलीमध्ये अचानक शरीरशास्त्रीय हालचाली कमी होतात. त्यामुळे पेशींची वाढ थांबते किंवा सावकाश होते. थंडी जास्त दिवस टिकून राहिल्यास मण्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा निघून गेलेला असतो. त्यामुळे पुढील काळात मण्याचा आकार कमी मिळतो. बागायतदारांजवळ या पूर्वीचा अनुभव असल्यामुळे तापमान कमी होताच बागेत संजीवकांची व तसेच टॉनिक्सची एकामागे एक फवारण्या करून आकार वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे मण्याची साल आवश्यकतेपेक्षा जाड होते.

मण्यात साखर उतरण्यास उशीर होतो. संजीवकांचा अतिरेक झाल्यास शुगर अॅसिड यांचे संतुलन बिघडते व फळकाढणीस उशीर होतो. यामुळे वेलीला ताण बसून पुढील काळात उत्पादनावर त्याचे विपरीत परिणाम होतात. आपण घेत असलेल्या परिश्रमाला व द्राक्षाला चांगला दर मिळावा, यासाठी काटेकोर नियोजन महत्त्वाचे असते. वरील परिस्थिती टाळण्यासाठी तापमान कमी झालेल्या अवस्थेत बागेत एकतर ठिबकने जास्त प्रमाणात पाणी द्यावे किंवा पाणी अधिक उपलब्ध असल्यास मोकळे पाणी द्यावे. यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होईल. घडाच्या विकासात पांढऱ्या मुळांचे विशेष महत्त्व आहे. ही मुळे सतत कार्यक्षम राहण्यासाठी बोद ७ ते ८ मि.मी. मणी आकाराच्या अवस्थेत बोद थोडेफार मोकळे करून घेता येतील. किंवा बोदाच्या बाजूने हलकीशी चारीसुद्धा घेता येईल. म्हणजेच पांढरी मुळे शेवटपर्यंत कार्यरत राहण्यास मदत होईल. खत नियोजनामध्ये पालाशयुक्त खतांचा वापर टाळून नत्र व स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा.

घडाच्या दांड्यावर गाठी येणे

बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदार आवश्यकतेपेक्षा जास्त संजीवकांचा वापर करताना दिसून येतात. यामुळे घडाचा दांडा व देठ जास्त प्रमाणात जाड झाल्याचे दिसून येते. काही परिस्थितीमध्ये घडाची स्प्रिंगप्रमाणे गुंडाळी झाल्याचे दिसून येते. काही बागेमध्ये घडाच्या देठावर गाठी आल्याचे दिसतील. तर काही ठिकाणी काडीच्या डोळ्यावर गाठी आलेल्या दिसून येतील. घडाच्या दांड्यावर आलेली गाठ ही जास्त हानिकारक असते. कारण दांड्यावरील गाठ पोकळ होऊन वजनाने घड तिथेच मोडतो. गाठीवर चिरा मारून पाहिल्यास पोकळ भागामध्ये पांढरासा द्रव दिसतो. यामध्ये काडीमधून घडाला होणारा अन्नद्रव्याचा पुरवठा खंडीत होतो.

घडामध्ये गोडी येत नाही. तसेच विकासही थांबतो. काही बागेमध्ये काडीवरील गाठींसोबतच ओलांड्यावर किंवा खोडावर चिरा पडलेल्या व त्यातून मुळे निघाल्याचेही चित्र दिसून येते. एकामागून एक संजीवके व टॉनिक्सचा वापर आपण चांगल्या उद्देशाने करत असलो तरी त्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत, याचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती ओढवते. एकदा नुकसान झाले की त्यावर उपाययोजना फारच कमी असतात. घडाची स्प्रिंग झालेल्या परिस्थितीत लवकरच युरिया एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी केल्यास थोड्याफार प्रमाणात घड सरळ होईल. पुढील घडाचे स्प्रिंग होण्याचे टाळता येईल. काही परिस्थितीत कॅल्शिअमचा वापर (२ ते ३ ग्रॅम प्रति लिटर) फायद्याचा ठरेल. जास्त नुकसान झालेल्या बागेत त्याचा अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळणार नाही. तेव्हा शक्यतो संजीवकांचा अतिरेक टाळणे हाच एक उपाय समजावा. बागायतदारांनी शिफारशीनुसार संजीवकांचा वापर करावा.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT