Chana Sowign
Chana Sowign Agrowon
ॲग्रो गाईड

Chana Sowing : शेतकरी नियोजन पीक : हरभरा

टीम ॲग्रोवन

शेतकरी ः विनोद देशमुख

गाव ः सवडद, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

एकण क्षेत्र ः २० एकर

हरभरा लागवड ः १३ एकर

सवडद शिवारात सध्या रब्बी पिके (Rabi Crop) जोमाने डोलू लागली आहेत. पिकांची वाढसुद्धा अपेक्षित होत आहे. सवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद देशमुख हे दरवर्षी हरभऱ्याच्या (Chana Sowing) विविध वाणांची लागवड करतात. मागील ७ वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते हरभरा उत्पादन (Chana Production) घेत आहेत. उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवून अधिक उत्पादन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सध्या हरभरा पेरणी करून २० ते २६ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. पेरणी टप्प्याटप्प्यात झाल्याने हे दिवस कमी अधिक आहेत. परतीचा पाऊस जास्त असल्याने हरभरा पेरणीस उशीर झाला. पेरणीनंतर तापमान अधिक असल्याने पेरणीच्या पाठोपाठ हलके पाणी द्यावे लागले. हरभऱ्याची उगवण एकदम चांगल्या प्रकारे झाली. ओलावा चांगला असल्याचे परिणाम उगवणीत दिसून आले. मात्र सध्या पिकाची स्थिती चांगली बनते आहे.

लागवड नियोजन ः

या वर्षी परतीच्या मॉन्सूनचा पाऊस अधिक झाल्याने जमिनीत वाफसा येण्यास विलंब झाला. शेतामध्ये अधिक प्रमाणात ओलावा असल्याने आंतरमशागतीचे कामे करण्यास अडचणी आल्या. परिणामी, लागवडीस उशीर झाला. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन मशागतीच्या कामांचे आणि पेरणीचे नियोजन केले.

साधारण १३ एकरांवर या वर्षी हरभरा लागवडीचे नियोजन केले. त्यानुसार टप्प्याटप्प्याने १०, १४ आणि १६ नोव्हेंबर या काळात पेरणी केली. संपूर्ण पेरणी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे केली आहे.

दोन ओळींत साधारण १४ इंच आणि दोन झाडांत ३ ते ४ इंच अंतर राखत पट्टापेर पद्धतीने पेरणी केली आहे. प्रत्येक सहा ओळींनंतर १ ओळ रिकामी राखली आहे.

पेरणीसाठी विविध गुण वैशिष्ट्ये असलेल्या पीडीकेव्ही कनक, आरव्हीजी २०४, जेजी २४ , फुले विश्वराज आणि पुसा मानव या ५ वाणांची निवड केली. चार एकरांत पीडीकेव्ही कनक, तीन एकरांत आरव्हीजी २०४, दोन एकरांत जेजी २४ याप्रमाणे लागवडीचे नियोजन केले.

पेरणीपूर्वी बियाण्यास जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया केली.

संपूर्ण लागवडीत सिंचनासाठी स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब केला आहे. पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी साधारण २ तास सिंचन केले. एवढ्या सिंचनावर पिकाची उगवण होते, असा त्यांचा अनुभव आहे.

मूळकुज नियंत्रणात

सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात अधिक ओलाव्यामुळे मूळकुजचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र विनोद देशमुख यांनी शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत त्यांच्या शेतात तुलनेने कमी प्रादुर्भाव दिसून आला. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बुरशीनाशकांची एक फवारणी केली आहे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विद्राव्य खतांची फवारणी केली.

सिंचन व्यवस्थान

पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी साधारण २ तास सिंचन केले. एवढ्या सिंचनावर पिकाची उगवण होते, असा त्यांचा अनुभव आहे. मात्र मध्यतरी काही दिवसा अधिक तापमान तर रात्री थंडी जाणवत होती. तापमानातील असमानतेचा पिकाच्या उगवणीवर परिणाम दिसून आला. कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्प्रिंकलरद्वारे सिंचन पुन्हा दोन तास केले. त्यामुळे सध्या हरभरा चांगला दिसून येत आहे. आगामी काळात फुलोरा निघण्यापूर्वी पुन्हा ६ तास स्प्रिंकलद्वारे पाणी दिले जाईल.

तणनियंत्रण

पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी केली होती. त्यामुळे अद्याप शेतात तण उगवल्याचे दिसून आला नाही. मात्र गेल्या हंगामात सोयाबीन लागवड केलेल्या क्षेत्रात हरभरा पेरणी केली तेथे काही प्रमाणात सोयाबीन उगवण दिसून येत आहे. पुढील आठवड्यात महिला मजुरांच्या मदतीने हे सोयाबीन उपटून टाकणार आहे.

आगामी नियोजन

सध्या हरभरा पेरणी करून २० ते २६ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला.

आगामी काळात ६ः२७ः०० हे विद्राव्य खत, बुरशीनाशक व अळीनाशकाची फवारणी घेणार आहे. जेणेकरून झाडांची वाढ व फुटव्यांची योग्य होईल.

आवश्यकतेनसार एक कोळपणी केली जाईल.

कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. पिकाची वाढीची अवस्था व प्रादुर्भाव पाहून फवारणीचे नियोजन केले जाईल.

- विनोद देशमुख,

९४२१३९६३४१

(शब्दांकन ः गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT