Cotton Grading
Cotton Grading Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Grading : कापूस वेचणी, प्रतवारी दरम्यान घ्यावयाची काळजी

टीम ॲग्रोवन

राहुल साळवे, डॉ. पुरुषोत्तम नेहारकर,

डॉ. पुरुषोत्तम झंवर

कापसापासून मिळणाऱ्या सेल्युलोजयुक्त (Cotton Cellulose) तंतूपासून प्राचीन काळापासून धागा काढून त्यापासून कापड (Cloth) बनवले जाते. हातमागावर कापड बनविण्याची प्रक्रिया ही यांत्रिक मागावर गेल्यानंतर ही पीक नगदी गणले जाऊ लागले. कापसापासून तयार केलेले सुती कपडे (Cotton Cloth) मऊ आणि घाम शोषून घेणारे असल्यामुळे उष्ण कटिबंधातील देशात ते प्राधान्याने वापरतात.

कापसाच्या बियांपासून (सरकी) स्वस्तामध्ये तेल उपलब्ध होते. त्याचा वापर स्वयंपाकासह साबण व अन्य व्यवसायामध्ये होतो. कापसामध्ये जवळपास ९५% सेल्युलोज (Cellulose) असते. कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम असून, व्यापारी तत्त्वावर बहुधा गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींचे पीक घेतले जाते.

कापसापासून मिळणारे धागे पाच प्रकारचे असतात.

अतिशय लांब : (१-३/८ इंच आणि त्याहून लांब),

लांब : (१-१/८ इंच ते १-११/३२ इंच, Gossypium barbadense),

मध्यम लांब : (१-१/३२ इंच ते १-३/३२ इंच),

मध्यम : (१३/१६ इंच ते १ इंच)

आखूड : (१३/१६ इंचापेक्षा कमी, Gossypium herbaceum).

जागतिक व भारतीय पातळीवर कापूस

अमेरिका, अर्जेंटिना, उजबेकिस्तान, ऑस्ट्रेलिया, चीन, तुर्कस्थान, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, ब्राझील, भारत या देशांमध्ये कापूस पिकतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार अमेरिका, भारत, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि उझबेकिस्तान हे पाच देश अग्रेसर कापूस उत्पादक आहेत. जागतिक कपाशी पिकाखालील क्षेत्रापैकी एक चतुर्थांश क्षेत्र भारतात आहे.

महाराष्ट्रात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. तसेच गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस पिकवला जातो. अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वांत मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.

कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो. प्रत राखण्याकरिता वेचणीपासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. वेचणीदरम्यान योग्य ती काळजी न घेतल्यामुळे कापसामध्ये ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा येऊन धाग्यांच्या गुणधर्मावर विपरीत परिणाम होतो. अशा कापसाला दर मिळतो.

वेचणी करताना घ्यावयाची काळजी

बोंड फुटल्यानंतर योग्य पक्वतेला ठरावीक कालावधीतच वेचणी करावी. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्यात पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात. कापसाची प्रत खराब होते. वेचणी सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी. त्याला पालापाचोळा चिकटून येणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याच वेळी चिकटलेला पालापाचोळा काढावा.

अपरिपक्व व अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते. असा कापूस वेचून तसाच साठविल्यास रुईला पिवळसरपणा येतो व कापसाची प्रत खालावते. शिवाय अशा कापसाच्या सरकीचे आवरण टणक नसल्याने गलाई करताना सरकी फुटते. रुईची प्रत खराब होते. परिपक्व व पूर्ण फुटलेल्या बोंडातील कापसाची व पर्यायाने पुढे धाग्याची प्रत चांगली मिळते.

कापसाची साठवण कशी करावी?

प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.

कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा तसेच बागायती कपाशीच्या मधल्या चार वेचणींचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतोवर वेगळा साठवावा.

वेचणीच्या काळात पावसाने भिजलेला कापूस झाडावर सुकू द्यावा. पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करावी.

शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला ‘झोडा’ असे संबोधले जाते. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून असा कापूस वेगळा साठवावा.

कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास हा चिकट स्त्राव पानांवरून कापसावर पडतो व रुईची प्रत खालावते. त्याचीही साठवण वेगळी करावी.

पूर्णपणे कोरड्या कापसाची वेचणी करून तो कोरड्या खोलीत साठवून ठेवावा. उघड्या अंगणात कापूस साठविलेला असल्यास त्वरित झाकून ठेवावा.

डागाळलेला रंग बदललेल्या किडलेल्या (कावडी) कापूस वेगळा साठवावा.

कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कापूस मोकळी हवा असलेल्या पक्क्या गोदामात साठवावा. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसास पिवळसरपणा येतो.

वेगवेगळ्या वाणांच्या वरील प्रकारे वेगवेगळ्या काढलेल्या कापसाची साठवणही वेगवेगळी करावी. त्यात मिसळण झाल्यास चांगल्या कापसाचीही दर कमी होतो, हे लक्षात ठेवावे.

विक्री किंवा संकलन केंद्रावर घ्यावयाची दक्षता

आवार प्रत्येकी तीन ते चार तासांनी साफ करीत राहिले पाहिजे.

कार्यरत प्रत्येक व्यक्तीला (दलाल, व्यापारी, हमाल व अन्य) स्वच्छ कापसाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्या एकाही चुकीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाची प्रतवारी कमी होऊ शकते. उदा. कापूस कधीही खुल्या जागेवर खाली करू नये.

इथे वेगवेगळ्या जातीच्या कापून एकत्र होऊ देऊ नये.

कापसावर कोणत्याही व्यक्तीने बसू नये.

तंबाखू, गुटखा व अन्य पाऊच जमिनीवर फेकू नयेत. तीच कापसामध्ये जाऊन अडकतात.

कपाशीची प्रतवारी

शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या कापसाला योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी आवश्यक असते. ही प्रतवारी म्हणजे निर्धारीत केलेल्या गुण वैशिष्ठ्यांच्या आधारावर केली पाहिजे. कपाशीची प्रतवारी सादृश पद्धतीने केली जाते. सर्वसाधारणपणे कपाशीची वेचणी व विक्रीचा कालावधी जवळपास सारखाच असतो. त्यामुळे बाजारपेठेत व संकलन केंद्रावर कापसाची आवक सुरू असल्यामुळे प्रतवारी, मोजमाप व प्रक्रियेमध्ये अडचणी येत असतात. म्हणूनच सादृश पद्धतीनेच प्रतवारीचे काम होते. मात्र आता नवीन तंत्रामुळे बऱ्याच संकलन केंद्रावर कापसाच्या गुणवैशिष्ट्यांनुसार कापसाचा भाव ठरविला जातो. त्यामुळे चांगली प्रतवारी असलेल्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होते.

प्रतवारीचे निकष

कापूस वाण निश्‍चित केल्यानंतर प्रत ठरवितांना कापसाचा रंग, स्वच्छता, रुईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, काडीकचरा, माती इत्यादीचे प्रमाण, कापसात असलेले अपरिपक्व व पिवळी टिक असलेल्या कापसाचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण या बाबी विचारात घेतल्या जातात. बोंडातील कापूस दवाने किंवा पावसाने भिजलेला असल्यास वेचणी करू नये. पावसाने किंवा किडीने खराब झालेला कापूस वेचून वेगळा ठेवावा किंवा त्याची वेगळी वेचणी करावी.

कापसाचा रंग : प्रत्येक वाणाच्या कपाशीस विशिष्ठ प्रकारचा रंग असतो. तो सर्व कापसाला असावा. कापसाची प्रत हलकी असल्यास किंवा पावसाने कापूस भिजला गेल्यास त्याचा परिणाम कपाशीच्या रंगावर होतो. रुईमधे लाल पिवळसर रंगाची रुई आढळल्यास अशा रुईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो.

कापसाची स्वच्छता : कपाशीची वेचणी करतांना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिकटून येतो, काही वेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केले जाते. अशा प्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, नख्या, माती इ. अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो.

तंतूची लांबी : सर्वसाधारणपणे कापसाची गलाई झाल्यानंतर त्यापासून मिळालेल्या रुईतील थोडा भाग घेऊन हाताने त्यातील धागे ओढून किंवा प्रयोगशाळेत विशिष्ट उपकरणांद्वारे धाग्याची लांबी ठरविण्यात येते. त्यासाठी काही कापूस एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने ओढून कापसातील रुई सरकीपासून वेगळी केली जाते. विशिष्ठ पातळीवर धाग्याची समानता आल्यानंतर धाग्याच्या लांबीचा अंदाज घेतला जातो. ही बाजारातील सामान्य पद्धत आहे. मात्र आता प्रयोगशाळेत उपकरणाद्वारे धाग्याची लांबी ठरवून अधिक लांब धाग्याच्या कापसाला अधिक दर देणे शक्य आहे.

तंतूची ताकद : विक्रीस आणलेल्या कापसापैकी काही कापूस हातात घेऊन दुसऱ्या हाताने त्यातील तंतू वेगळे करून व तंतूना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकद ठरविली जाते. चांगली, मध्यम व कमी अशा प्रकारे धाग्याच्या ताकदीचे प्रकार करून कापसातील परिपक्व व अपरिपक्व कापसाचे प्रमाण ठरविण्यात येते. तंतूच्या लांबीप्रमाणे ताकदीवर भर देण्यात येतो.

कापसाच्या तंतूची परिपक्वता : विक्रीस आणलेला कापूस पूर्णतः परिपक्व, अर्धपरिपक्व वा अपरिपक्व आहे हे तपासणे आवश्यक असते. परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते. रुईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो. परिपक्व कापसाचे बोंड फुललेले असते व रुईचे प्रमाण अधिक असते.

कापूस प्रतवारीचे फायदे

कापसाच्या गुणवैशिष्ट्यांची पारख करण्यास व त्याप्रमाणे किंमत ठरविण्यास मदत होते.

प्रतवारीमुळे कापसाचा प्रातिनिधिक नमुना पाहून संपूर्ण कापसाची प्रतवारी ठरविता येते.

प्रतवारीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होते.

नियमित प्रतवारी करण्यावर भर दिल्यास शेतकऱ्यांनाही उत्तम प्रतीचा कापूस उत्पादित करण्यास प्रोत्साहन मिळते.

- राहुल साळवे, (पीएच.डी. स्कॉलर),

९१६८४९७८८३

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT