Agro Idol
Agro Idol Agrowon
ॲग्रो गाईड

Agro Idol: स्वत:च स्वत:चे आयडॉल बना

टीम ॲग्रोवन

शेतीतील एक कहाणी ही कधीच एका शेतकऱ्याची नसते.ती शेकडो, हजारो शेतकऱ्यांची असते.थोडा-बहुत तपशीलात फरक असतो मात्र गाभा सारखाच. त्यामुळं ती कहाणी वाचणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं, ही कथा तर माझीच आहे.त्याला आश्चर्य वाटतं की, त्याची कहाणी त्याने न सांगता मला कशी कळली!

अॅग्रोवनमध्ये २३ सप्टेंबरला `तुमच्या जिवापेक्षा जगात दुसरी कुठलीच मोठी गोष्ट नाही` हा माझा लेख छापून आला. रविवारी सकाळपासूनच फोनचा धडाका सुरू झाला.प्रत्येकाला वाटतं, माझ्याशी बोलावं. मन मोकळं करावं. एखादा बोलू लागला की तो थांबतच नाही.

तोपर्यंत चार-पाच मिस्ड कॉल झालेले असतात. या आठवड्यात माझ्याशी बोलताना तिघेजण रडले. चार-पाच जण भावविवश झाले. एकाला बोलताच येईना. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. मी फोन बंद करून थोड्या वेळाने लावला...तो बोलला, हे सगळं वाचताना मला माझा तो प्रसंग आठवला...किटकनाशकाची बाटली तोंडाला लावत असतानाच एकदम मांजराने समोर उडी मारली अन् मी वाचलो... तेव्हापासून मी घरात मांजर पाळतोय...

तुम्ही लिहिलयं ते शंभर टक्के खरयं,तो क्षण टाळता आला पाहिजे...पण तेच कठिण असतं.म्हणून तर शेतकरी जीव देतात.... खरं सांगायचं तर, या सगळ्या फोनचा मलाही त्रास होतो. नैराश्य दाटून येतं. आपली हतबलता जाणवते. शेवटी दु:खाच्या, अपयशाच्या किती कहाण्या ऐकायच्या? पुन्हा सगळ्या कहाण्यांचा गाभा तोच फक्त तपशील वेगळे.

कोणी डाळिंबाच्या प्रयोगात बुडालाय, कोणी द्राक्षात, कोणाला टोमॅटोनं फटका दिला तर कोणाला बोअरवेलनं दगा दिलाय. एका चार एकरवाल्या शेतकऱ्यानं दुधाचा व्यवसाय करायचा म्हणून ७० हजाराची म्हैस घेतली.

त्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतलं. बाळंतपणात म्हैस व वासरू मेलं. पाच वर्षे झाली तरी तो कर्ज फेडू शकला नाही. फक्त व्याजच भरतोय. उसापासून ते फळबागापर्यंतचे शेतकरी मला बोलले. ते शेतीला काळी आई मानतात.

पण परिस्थिती हाताबाहेर गेलीय.. भावनिकता जीवावर बेततेय, हे कळतंय. यावेळी फोन करणाऱ्या सगळ्यांनीच जीवापेक्षा शेतीचं मोल अधिक नाही, हे माझ्या लेखातील सर्वात महत्त्वाचं वाक्य मलाच परत ऐकवलं.

तुमचं म्हणणं एकदम खरं आहे बघा...काळजाला भिडलयं. आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर शेती विकू...पण मरणार नाही, तुम्ही मार्ग दाखवलाय, असं म्हणून अभिनंदन करणारेही अनेक होते.लेख आमच्या लई कामाचा हाय..आवडला म्हणून फोन केला..अशी दोनच वाक्यं बोलणारेही बरेच होते.

त्यांना बोलण्याचा अनुभव नसावा. मात्र सगळेच मनापासून बोलत होते. त्यात कसलीच औपचारिकता नव्हती. एखाद्या मित्राशी बोलल्यागत ते संवाद साधत होते.फोन करणाऱ्यांत काही जुने परिचितही होते. लातूर जवळच्या महमदापूरचे सूर्यकांत शेळके यांच्याशी जुनी ओळख. ते पूर्वी राजकारणात सक्रिय असताना सतत भेट व्हायची.

ॲग्रोवनमधील लेख वाचून त्यांनी तीनवेळा फोन केलाय. परवाही ते बोलले. लातूरला जाताना मला नक्की भेटून जा. मलाही त्यांना भेटायचंय. चारचाकी घेऊन लातूरला निघेल तेव्हाच ते शक्य होईल.

लेख प्रकाशित झाला की, किमान दहा-बारा निमंत्रणं असतात...आमच्याकडं या. तुमच्याशी बोलायचंय. मी नेहमी सांगतो की, माझ्याकडं सांगण्यासारखं जे आहे ते मी लिहिलंयंच. त्यापलिकडं नव काय सांगू? जे बोलायचं ते फोनवर बोला. तरीही त्यांचा आग्रह असतो.... नाही भेटू..बोलायचंय. या भेटीगाठी होणं कठीण आहे.

बोलणारे सगळेच शेतकरी किंवा शेती व्यवस्थेशी संबंधित असतात. कोणी पहाटेच फोन करतो तर कोणी थेट रात्री अकरा वाजता. त्यांची त्यावेळची फोन करण्याची इच्छा एवढी तीव्र असते की, ते वेळ पाहत नाहीत. मी झोपलो असेन, कामात असेन , असाही विचार त्यांच्या मनात येत नाही.

मी शेतातल्या घरात- रुद्रा हटला- असताना रात्री कधीच फोन बंद ठेवत नाही. तो ठेवता येत नाही. कधीही इमर्जन्सी निर्माण होऊ शकते. त्याचा अशा वेळी बराच त्रास होतो.पण त्याकडं दूर्लक्ष करावं लागतं.

मी सध्या शेतीच्या कामात पूर्णवेळ व्यस्त आहे. ते काम करीतच मी फोन घेतो. माझा प्राधान्यक्रम माझं काम आहे. ते समोरच्याच्या लक्षात येतं. तो म्हणतो...तुमचं माझ्या बोलण्याकडं लक्ष दिसत नाही..काहीतरी कामात दिसतायं. मी हसून म्हणतो...काम करता करता बोलता येतचं की! कोणी फारच लांबण लावू लागला की, त्याला सांगावं लागतं,मुद्याचं बोला, मी कामात आहे. त्याचाही काहींना राग येतो. खरं तर ही माझ्या संयमाची परीक्षा असते. प्रत्येकवेळी मी यात पास होतोच असं नाही.

मला एका गोष्टीचं नवल वाटतं की, हे लोक माझ्याशीच का बोलू इच्छितात? माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख नाही. आम्ही कधी भेटलेलो नाही. भेटण्याची फारशी शक्यताही नाही. मी फोनवर तसाही रूक्षपणेच बोलतो...तरीही ते त्यांच्या खाजगी आयुष्यातील यशापयश, दु:ख, वेदना मलाच का सांगू पाहात आहेत? मी बऱ्याच जणांना विचारतो, तुम्ही माझ्याशी जे बोलताय, ते तुमच्या मुलाशी, पत्नीशी, जवळच्या मित्रांशी का बोलत नाही?

माझ्यापेक्षा त्यांच्याशी बोलणं तुमच्या अधिक हिताचं आहे .तुमच्या सुख-दु:खात तेच मदतीला येतील. कोरडी सहानुभूती व्यक्त करण्यापलिकडं मी काही करू शकणार नाही...त्याचं उत्तर असतं, त्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही.

तुम्ही तुमच्या माणसांशी का बोलत नाही? एवढा साधा वाटणारा हा माझा प्रश्न त्यांना अवघड वाटत होता. .. नाही... घरात कोणाला बोलावं वाटना...माझं मन त्यांना कळंना, आपलं अपयश सांगितलं तर समाज टिंगलटवाळी करतो..असं कोणापाशीही मन मोकळं करून उपयोग काय?

मी अस्वस्थ होऊन विचारतो, तुमची बायको, मुलं, जवळचे नातेवाईक, मित्र हे दूरचे कसे? तेच तर तुमचे सगळ्यात जवळचे...तसं नाही पत्रकार साहेब...यशाचे सगळे धनी..अपयशात कोणी भागीदार नसतो.मी म्हटलं, शेतीतील अपयशाला तुम्ही एकटे जबाबदार नाहीत. तुम्ही कष्ट केले, सगळे प्रयत्न केले, शेतीतील अपयश हे व्यवस्थेचे, नैसर्गिक परिस्थितीचे अपयश आहे. त्याचा दोष तुम्ही स्वत:ला का लावून घेता...

तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोक जवळचे वाटत नाहीत, याला तुम्हीही जबाबदार आहात. सगळ्यांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन सगळी परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे....हे एवढं सोपं नाही साहेब..असं म्हणत त्यांनी फोन बंद केला. मी परत फोन लावला पण त्यांनी उचलला नाही.

मला वाटतं, प्रत्येक व्यक्तीचा आपल्या आसपासचा एखादा तरी नातेवाईक,मित्र हा जिव्हाळ्याचा माणूस असायलाच हवा. ज्याच्याजवळ तुम्हाला तुमचं जगणं मोकळेपणाने मांडता आलं पाहिजे. मग ते कौटुंबिक असो की, व्यावहारिक. अनेकदा लैंगिक बाबींमुळेही अनेकांची घुसमट होत असते.

माणूस व्यक्त झाला की, तो मोकळा होतो. अशी मोकळं व्हायची ठिकाणं प्रत्येकानं निर्माण करायला हवीत. माझं कोणाशी पटत नाही, माझं कोणी ऐकून घेत नाही, मला कोणीच समजून घेत नाही...या पळवाटा आहेत. आणि याला ती व्यक्ती स्वत: तेवढीच जबाबदार असते.

अनेकांचे आयडॉल हे आभासी जगातील असतात. कोणाचे चित्रपटातील हिरो, कोणाचे फेसबुकवर, कोणाचा ट्वीटरवर तर कोणाचा इंस्टाग्रामवर! हे आयडॉल तुमच्या वास्तव जीवनात फारसे कामाला येत नाहीत. वास्तवातील मित्र हेच तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढू शकतात.

मला येणाऱ्या फोनमध्ये एखादा-दुसरा फोनच महिलेचा असतो.ही बाब पुरेशी बोलकी आहे. एका अनोळखी पुरूषाशी कसं बोलायचं? हे बोलणं नवऱ्याला कळलं तर, त्याची प्रतिक्रिया काय असेल, याची भीती मनात आहे. ही भीती रास्तच आहे. आपण स्त्री स्वतंत्र झाल्याचा कितीही दावा केला तरी, वास्तवात स्त्रियांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशी शेकडो बंधने आहेत.

परवाच हिप्परसोगाचे माजी सरपंच मगरभाऊ सांगत होते. पुण्यात काम करणारा मुलगा. त्याचं गावाकडील मुलीशी लग्न झालं. त्यानंतर महिनाभरातच त्या मुलीला गावातील एका तरुणाचा फोन आला. हे नवऱ्याने बघितलं. तो फोन कोणाचा होता, ते काय बोलले, याची कसलीही खातरजमा न करता, त्याने पत्नीला गावाकडं पाठवलं. आता तो सोडचिठ्ठी मागतोय. मी हे ऐकून हादरून गेलो...भारतात तरी मुठभर स्वावलंबी , उच्चवर्गीय विचारी स्त्रियाच स्वातंत्र्याचा अनुभव घेत असाव्यात...

या आठवड्यात आलेल्या फोनपैकी दोघांनी मला विचारलं, शेतकरी स्त्रिया का आत्महत्या करीत नाहीत. त्या मनाने अधिक खंबीर असतात का?मी म्हटलं, एक तर शेतकरी स्त्री अशी तिची स्वतंत्र ओळख क्वचितच कुठे असेल.ती कुटुंब प्रमुख नसते.त्यामुळं आर्थिक ताणतणाव तिच्या वाट्याला थेट येत नाहीत. कथित प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, हे सगळं पुरूषांसाठी असतं. त्यामुळं तेच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. स्त्रिया मनाने खंबीर असतात, असं मला वाटत नाही. त्या पुरूषांपेक्षा अधिक सहनशील असतात, हे नक्की. माझ्या या उत्तराने त्याचं समाधान झालेलं दिसलं.

बरेचजण असंच लिहित चला, आम्हाला प्रेरणा मिळते असं म्हणतात. त्यांना मी म्हणतो, असंच किती दिवस लिहिणार...आणि इतरांकडून किती दिवस प्रेरणा घेणार! प्रेरणा स्वत:कडूनच घ्यायला शिका. स्वत:चं स्वत:चे आयडॉल बना. तुमचं भलं फक्त तुम्हीच करू शकता.सल्ला देणं सगळ्यात सोप असतं. पण त्या व्यक्तीला त्याचा फारसा उपयोग होत नाही. सल्ला देणारा समोरच्या व्यक्तीचं भावविश्व जाणू शकत नाही. त्यामुळं मी कधीच कोणाला सल्ला देत नाही... तरीही लोक सल्ला विचारतातच..

मी आधी हसतो...,तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करा, या माझ्या लेखाची आठवण करून देतो...सल्ल्याशिवाय दुसरीच चर्चा करून थांबतो.मी शेतीमधल्या कामात गळ्यापर्यंत बुडालोय . त्याच्यापासून सध्या तरी सुटका नाही.

अर्थात हे काही समाजकार्य वगैरे नाही. मी माझ्या स्वप्नपूर्तीसाठी ही अफाट मेहनत घेतोय. कितीही शारिरीक त्रास असला तरी आनंदही तेवढाच आहे. माझं आवडतं जगणं हेच तर आहे....तरीही मी शेतकऱ्यांना फोनवर बोलत राहातोच...आपलं बोलणं कोणाला समाधान देत असेल तर ते टाळायला नको, ही भूमिका त्यामागे असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT