
भारत हा विविध संस्कृती आणि परंपरेने नटलेला देश. अन्न देणाऱ्या जमिनीला काळी आई- भूमाता म्हणत असताना गाईला (Cow Rearing) गोमाता म्हणण्याची संस्कृती- परंपरा आपल्याकडे आहे. गाय- गोमाता माणसांना दूध देते तसेच जमिनीला- भूमातेला शेण- गोमूत्र देते. दुसऱ्याचे संगोपन (Cow Farming) करणाऱ्यांना आई म्हणणे ही आपली परंपरा असल्यामुळेच आपल्या स्वतःच्या आईबरोबरच भूमाता आणि गोमाता अशा तीन आईंचा सांभाळ करण्याचे काम भूमिपुत्रावर पूर्वजांनी- ऋषिमुनींनी दिलेले आहे.
गोमाता मानवाचे आणि जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करते. खरं तर आपल्या वेदशास्त्रांप्रमाणे पाच हजार वर्षांपूर्वी गाईंचे संगोपन मथुरेमध्ये केले जात होते; जेथे भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले. श्रीकृष्णाने आपला बराचसा काळ गाईंसोबत घालवला. म्हणूनही आपल्या संस्कृतीमध्ये गाईला वेगळे महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी दुसऱ्या राज्यांना धन देताना सोने- नाणे याबरोबरच गोधन दिले जात होते. मुलीच्या लग्नातही कन्यादानात गोधन दिले जात होते.
भारतात हरितक्रांतीपाठोपाठ धवलक्रांती घडून आली. ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डा’ने १९७० मध्ये हा उपक्रम सुरू केला. डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड यासारख्या देशातील संस्थांबरोबर करार करून देशात ठिकठिकाणी संकरीकरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. भारत आता दुग्धोत्पादनात जगामध्ये अव्वल स्थानी आहे. या संकरीकरणामुळे देशात दुधाचा महापूर आला खरा पण या प्रक्रियेत भारतातील काही देशी गाईंच्या जाती नामशेष झाल्या.
त्यामुळे अनेक शेतकऱ्याकडे जर्सी, होलस्टिन फ्रिजियन किंवा संकरित गाईंचे मोठमोठे गोठे आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे एक-दोन संकरित गाईही आहेतच. देशातील एकूण रोजगारांपैकी आठ ते नऊ टक्के रोजगार दुग्ध व्यवसायातून निर्माण होतो. अत्यल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार देणारा दुग्धव्यवसाय तसेच दैनंदिन व्यवहार अन् आर्थिक गरज भागविणारा हा व्यवसाय शेती क्षेत्रातील आघाडीवर आहे.
खरे तर विदेशी काऊ या गाई नाहीत; विदेशी काऊ व देशी गाई या बॉस जीनसमध्ये मोडतात. देशी गाई इंडिकस तर विदेशी काऊ टॉरस या प्रजातींमध्ये येतात. यांच्याप्रमाणेच याक, गवा, मिथुन व बेंटेग यांच्या चार प्रजाती बॉस जीनसमध्ये मोडतात. याचा अर्थ विदेशी काऊ या गाई नाहीत. या दोन्ही वेगळ्या प्रजाती असल्या तरी त्यांचं संकरीकरण सहज होतं. देशी गाई कमी दूध देत असल्या तरी त्या काटक आहेत. त्यांचे वळू शेतीसाठी उपयोगी पडतात.
विदेशी व संकरित गाई नाजूक असून त्यांचा खर्च खूप मोठा असतो. त्यांचे गोऱ्हे शेतीसाठी योग्य नसतात. त्यातील दुसरा महत्त्वाचा फरक दुधामध्ये आहे. दुधाला पूर्णअन्न म्हटले जाते. दुधातून प्रथिने, जैविके, प्रतिजैविके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ऊर्जा सर्वांत जास्त आणि स्वस्तात मिळते. याचमुळे लहान मुलांपासून ते वयस्कांपर्यंत दुधाचे दररोज सेवन केले जाते. विदेशी गाई व संकरित गाई यांचे दूध ए-१ प्रकारचे असते. देशी गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांचे दूध ए-२ प्रकारचे असते. देशी गाईंमध्ये प्रोलिन नावाचे अत्यंत महत्त्वाचे अमिनो आम्ल असते. गाईच्या शरीरामध्ये अत्यंत लहान असा प्रथिन म्हणजे बीटा कॉस्मोप्रोलिन- ७ (बीसीएम-७) जो मानवाला घातक असतो.
देशी गाईमधील प्रोलिनसोबत बीसीएम-७ चे पक्के बंधन होऊन ते दुधामध्ये येत नाही. त्यामुळे याला ए-२ दूध म्हणतात. संकरित गाईच्या दुधामध्ये असलेल्या प्रोलिनचे हिस्टिडीनमध्ये रूपांतर होऊन याचे बीसीएम-७ बरोबर कच्चे बंधन तयार होत असल्यामुळे गाईच्या दुधात येते. म्हणून या दुधाला ए-१ दूध म्हणतात. या दुधामुळे अपचन, पोटदुखी, डायबेटिस १, हृदयरोग, ऑटिझम, मानसिक आजारांसह कॅन्सर सारखे अनेक दुर्धर रोग उद्भवतात असे संशोधनात आढळले आहे.
देशातील धवलक्रांती दरम्यान देशी गाईंचे संकरीकरण करण्यात आले. त्यात देशातील ८० जातिवंत देशी गाईंपैकी ५३ जाती नामशेष झाल्या. आता केवळ २७ जाती शिल्लक आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसर्च या संस्थेने देशातील एकूण २२ गाईंचे गुणसूत्र तपासले. त्यांपैकी रेड सिंधी, साहिवाल, थारपारकर, राठी आणि गीर या गाईंमध्ये ए-२ दूध तयार करायचे १०० टक्के गुणधर्म आढळले तर बाकीच्या गाईंमध्ये ९४ टक्के आढळून आले. ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि मलेशिया या देशांनी ८०-९० वर्षांपूर्वी आपल्या गीर, साहिवाल, ओंगोल, कांक्रेज अशा उत्कृष्ट जातींच्या गाई व वळू त्यांच्याकडे नेले. त्यांनी या जातींची आनुवंशिक सुधारणा केली.
आता ब्राझीलमध्ये रोज सरासरी ४०-४५ लिटर दूध देणाऱ्या गीर गाई आहेत. रोज ६५ लिटर दूध देणाऱ्या अनेक गाई तेथे आहेत. या सुधारित गाई आता ‘ब्राझिलियन कॅटल’ या नावाने ओळखल्या जातात. देशी गाईंचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत आहे. दूध उत्पादन तसेच चांगल्या गुणवत्तेचे दूध निर्मितीसाठी गीर, साहिवाल, राही, थारपारकर, लालसिंधी, खिल्लार, कांकरेज, माळवी, देवणी, लालकंधारी, डांगी, कोकण कपिला इत्यादी जातींमध्ये आनुवंशिक सुधारणा करावी लागेल.
आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात जगातील सर्वांत बुटकी गाय पंगणूर ड्वार्फ आहे. ती अडीच फूट उंचीची असून, तिच्या दुधात आठ टक्के फॅट असते. तिचं दूध पोषक व औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. गुजरातमधील जुनागड कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी गीर गाईच्या मूत्रावर संशोधन केले. त्या गोमूत्रामध्ये त्यांना सोन्याची काही संयुगे आढळली.
अलीकडेच २७ ते २९ मे दरम्यान पुणे येथे कृषी विद्यापीठ आणि सकाळ- अॅग्रोवन च्या संयुक्त उपक्रमातून ‘गोधन-२२’ हे प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यापीठातील शास्त्रज्ञाबरोबर ॲग्रोवन सारखा प्रिंट मीडिया आणि सरकारातील सर्वच प्रतिष्ठितांनी देशी गोवंशाबद्दल विशेष कौतुक केले. गोवंश सुधारणा कार्यक्रमाला योग्य त्या सूचना देखील केल्या. पुण्याच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात दुधाळ गाईंचे संवर्धन करणे, आनुवंशिक सुधारणेसाठी जातिवंत देशी गोवंशाच्या वळूंच्या रेतमात्रांची निर्मिती आणि पुरवठा, भ्रूण प्रत्यारोपण तंत्राचा वापर, देशी गोवंशाचे प्रजनन, उत्पादन आणि पुनरुत्पादन इत्यादी कामगिरीचा सखोल अभ्यास या केंद्रामध्ये केला जाणार आहे.
पशुखाद्य निर्मिती आणि त्यामधील पोषक तत्त्वांचा अभ्यास, शेण- गोमूत्राच्या शेतीसाठी होणाऱ्या वापराबद्दल संशोधन, सोलर डेअरी, बायोगॅस संयंत्र, पशू उपचारासाठी हर्बल गार्डन, रासायनिक अंशापासून मुक्त सेंद्रिय दूध उत्पादन हे कार्य होणार आहे. पुढील काळात दूध व्यवसाय आणि मानवी आरोग्य या साठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थात यातून शेतकऱ्यांसाठी लवकर तंत्रज्ञान विकसित व्हावे हिच अपेक्षा!
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलसचिव आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.