Rabies  Agrowon
ॲग्रो गाईड

Rabies : रेबीजपासून सतर्क रहा...

श्वानांपासून मनुष्याला संक्रमित होणाऱ्या आजारांमध्ये रेबीज (श्वानदंश) हा सर्वात प्रमुख आजार आहे. रेबीजपासून पूर्ण संरक्षण मिळविण्यासाठी लसीचा पूर्ण कोर्स करणे आवश्यक आहे.

टीम ॲग्रोवन

डॉ. विकास वासकर, डॉ. राहुल कोल्हे, डॉ. चंद्रकांत भोंग

श्वानांमध्ये सुप्तावस्थेत असणाऱ्या अनेक विषाणू, जिवाणू, बुरशी तसेच आंतर आणि बाह्य कृमींमुळे त्यांच्या सतत संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना या सूक्ष्मजीवाणूंचा (Micro Bacteria) प्रादुर्भाव होऊन साधारण तसेच गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात, प्रसंगी रुग्णाचा मृत्यूदेखील ओढवू शकतो. अशा गंभीर आजारांसोबतच काही संवेदनशील व्यक्तींना श्वानांच्या गळणाऱ्या केसांमुळे ऍलर्जी होऊ शकते तसेच श्वसनाचे विकारदेखील उद्भवू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार श्वानांपासून मनुष्याला संक्रमित होणाऱ्या आजारांमध्ये रेबीज (श्वानदंश/अलर्क) हा सर्वात प्रमुख आजार आहे. मानवाला होणाऱ्या रेबीजच्या (Rabies) घटनांपैकी ९९ टक्के लोकांमध्ये रेबीजचे संक्रमण बाधित कुत्रा चावल्यामुळे होते.

अद्यापपर्यंत उपचार सापडलेला नाही परंतु योग्यरीत्या केलेल्या लसीकरणाद्वारे हा आजार १०० टक्के टाळता येतो. रेबीज या आजाराचा प्रादुर्भाव आणि प्रसार सर्वच प्राण्यांमध्ये होत असला तरी श्वानवर्गीय प्राण्यांपासून होणाऱ्या संक्रमणाचे प्रमाण ९९ टक्यांपेक्षा जास्त आहे. मनुष्यांमध्ये तसेच प्राण्यांमध्ये आजाराचा प्रसार प्रामुख्याने बाधित प्राणी/व्यक्तीच्या लाळेचा संपर्क चाव्यामुळे-खरचटल्यामुळे झालेल्या जखमेशी आल्यास होतो, क्वचित प्रसंगी डोळे/नाकपुड्या/तोंड यातील श्लेष्मल आवरणावर दूषित लाळ पडल्यास रोगाची बाधा होऊ शकते.

रेबीज झालेल्या श्वानातील लक्षणे :

१) श्वानाला ताप येतो, आवाजात बदल होतो, तोंडावाटे सतत लाळ गळते तसेच त्यांच्या वागणुकीतील बदल होतो. त्यानंतर उत्तेजित स्वरूपाची लक्षणे दिसायला लागतात . यामध्ये श्‍वान सैरावैरा धावतो, तोंडावाटे फेस येतो.

२) श्वानाच्या जबड्यातील स्नायूंना लकवा झाल्याने व तीव्र वेदनांमुळे कोणत्याही सजीव-निर्जीव वस्तूंना तो चावतो, ज्याला सर्वसाधारणतः कुत्रा पिसाळला असे म्हटले जाते.

३) मज्जातंतू कमकुवत झाल्याने पायांना लकवा होतो, शरीरावरील नियंत्रण सुटते. अशा अवस्थेत श्वानाचा मृत्यू होतो.

बाधित व्यक्तींमध्ये लक्षणे ः

१) माणसांमध्ये आजाराचा संक्रमण काळ सर्वसाधारणतः २ ते ३ महिन्यांचा असून क्वचित प्रसंगी एक आठवडा ते काही वर्षांपर्यंत दिसू शकतो.

२) आजाराच्या सुरवातीला ताप येणे, झोप न लागणे, चित्र-विचित्र भास होतात.

३) चावा झालेल्या ठिकाणी दुखणे/आग होणे/खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात.

४) विषाणूचा प्रसार आणि बाधा जसजसा मज्जासंस्थेमध्ये होतो, तस-तसे आजाराचे स्वरूप बदलते.

- उत्तेजित प्रकारच्या आजारात कसल्याही संवेदनामुळे होणारी उत्तेजना, वागणुकीतील तीव्र बदल, पाणी किंवा तत्सम पातळ पदार्थ गिळताना जबड्यामध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे बसलेली भीती (हायड्रॉफोबिया), शरीराला बसणारे तीव्र झटके आणि कालांतराने श्वासोश्वास करण्यात होणाऱ्या अडथळ्यामुळे रुग्णाचा मृत्यू संभवतो.

- लकवा प्रकारात शरीरातील सर्व स्नायू हळूहळू शिथिल होतात, रुग्ण बेशुद्धावस्थेत जातो आणि मृत पावतो.

इन्फो :

आजार टाळण्यासाठी महत्त्वाच्या बाबी :

१) श्वानाने किंवा तत्सम प्राण्याने चावा घेतल्यास किंवा बाधित प्राण्याच्या लाळेशी संपर्क आल्यास साबण आणि पाण्याचा वापर करून किमान १५ मिनिटे जखम स्वच्छ धुवावी. हळद, चुना, तंबाखू, झाडपाला इत्यादी पदार्थांचा वापर करू नये. अस्वच्छ रुमाल/फडके वापरून जखम बांधू नये. जखमेवर जंतुनाशक औषध लावावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावा.

२) प्राथमिक आरोग्य केंद्रात/खासगी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केल्यानुसार ०, ३, ७, १४ आणि २८ या दिवशी लसीकरण करावे. शून्य दिवस म्हणजे ज्या दिवशी पहिली लस घेतली तो दिवस पकडून त्याक्रमाने इतर दिवशी लस घ्यावी. शक्यतो ज्या दिवशी श्वान चावला त्याच दिवसापासून लसीकरण सुरु करावे. सदर लस सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये अथवा औषध विक्रेत्यांकडे मिळते. रेबीजपासून पूर्ण संरक्षण मिळविण्यासाठी लसीचा पूर्ण कोर्स करणे आवश्यक आहे, आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर सोडून इतर कोणाच्याही सल्ल्याने लसीकरण अर्धवट सोडू नये.

क्वचित प्रसंगी, श्वानाच्या चाव्यामुळे आलेल्या जखमा जास्त प्रमाणात तसेच जास्त खोलवर असल्यास किंवा लचके तोडलेले असल्यास, लस घेण्याबरोबरच रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचा वापर करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. रेबीज इम्युनोग्लोब्युलिन उपलब्ध असल्यास त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

३) चावलेल्या प्राण्यामध्ये रेबीजची काही लक्षणे दिसतात का ? त्यावर लक्ष ठेवावे जेणेकरून जर तो श्वान बाधित झाला तर इतरांचेसुद्धा रेबीजपासून संरक्षण करणे सोपे होईल. श्वान पाळलेला असेल आणि त्याचे लसीकरण केलेले असेल तर रेबीज होण्याची शक्यता कमी होते परंतु श्वान अनोळखी असेल आणि त्याचे लसीकरण झालेले नसेल तर बाधा होण्याची शक्यता बळावते, त्यामुळे श्वानावर लक्ष ठेवावे.

४) रेबीज हा विषाणूजन्य आजार असून आधुनिक वैद्यकशास्त्रात किंवा भारतात प्रचलित आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा युनानी उपचार पद्धतींमध्ये रेबीजवर उपचार उपलब्ध नाहीत, त्यामुळे मंत्र-तंत्र करणे, उतारा करणे, झाडपाला खाऊ घालणे, विशिष्ट ठिकाणी नेऊन कुत्र्याचे विष उतरविणे, इत्यादी अघोरी उपचारांचा अवलंब न करता पूर्ण लसीकरण करावे.

"रेबीज : एकात्मिक आरोग्य, शून्य मृत्यू"

जागतिक आरोग्य संघटना, जागतिक प्राणी आरोग्य संघटना तसेच जागतिक रेबीज नियंत्रण संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने रेबीजविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर रेबीज निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी तसेच महान वैज्ञानिक, लुईस पाश्चर, ज्यांनी रेबीजची जगातील पहिली लस विकसित केली, त्या महान तज्ज्ञाच्यास्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी "रेबीज : एकात्मिक आरोग्य, शून्य मृत्यू" ही संकल्पना घेऊन २०३० सालापर्यंत रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी रेबीज नियंत्रणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय कार्य योजना- रेबीज निर्मूलन योजना ः

भारत सरकारच्या योजनेअंतर्गत रेबीज नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येत असून नियंत्रण, प्रोत्साहन आणि भागीदारी या तीन मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रणाली विकसित करण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून रेबीजचा समावेश अधिसूचित रोगांच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक, राज्य तसेच केंद्र पातळीवर रेबीज नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये सुसूत्रता आणणे सुलभ होईल.

संपर्क ः

डॉ. विकास वासकर, ९४०३१८४५४१

(पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT