Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

वातावरणातील बदलाला सामोरे जाताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर सातत्याने उत्पन्नाची हमी देणाऱ्या, कमी जोखमीच्या एकात्मिक शेती पद्धतीचा प्रसार व्हायला हवा.

सुरेश पाटील 

वातावरणातील बदलाला सामोरे जाताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना (Small Landholder Farmers) वर्षभर सातत्याने उत्पन्नाची हमी देणाऱ्या, कमी जोखमीच्या एकात्मिक शेती पद्धतीचा (Integral Farming Methodology) प्रसार व्हायला हवा. वर्षभर शेतात राब राब राबायचे, काम करायचे आणि ऐन पीक हातात यायच्या वेळी निसर्गाचा एखादा फटका जसा की पूर, गारपीट, अवकाळी पाऊस, (Heavy Rainfall) वादळ, दुष्काळ इत्यादी कारणाने बसला की सगळेच्या सगळे हातातून निघून जायचं, अशी अवस्था एकाच पीक पद्धतीत होते आहे. बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक गटातील आहेत.

त्यांच्या उदरनिर्वाहचं मुख्य साधन शेती हेच आहे. त्यामुळे वर्षभर एकाच पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून राहिल्याने आर्थिक गणित वर्षाच्या अखेरीस कोरचं असतं. बदलत्या जीवनशैलीत शेतकऱ्यांच्या गरजाही बदलत आहेत, वाढत आहेत जसे की फोनचा रिचार्ज, दळणवळण करण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांचे इंधन, घरात मनोरंजनासाठी टीव्हीचा रिचार्ज, मुलांचे शिक्षण आणि घरातील थोरामोठ्यांच्या आरोग्यावर,

आजारपणावर होणारा खर्च आणि इतरही कार्यक्रमासाठी सातत्याने पैसे खर्च होत असतात. मग अशा खर्चासाठी आपल्याला दर दिवशी, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी आणि वर्षाकाठी हमखास उत्पन्न मिळणे आवश्यक आहे. अशा उत्पन्नासाठी आपणाला ‘एकात्मिक शेती पद्धती’च अवलंब करावा लागेल.

एकात्मिक शेती पद्धती म्हणजे मुख्य शेतीबरोबर इतर सलग्न व्यवसाय, पूरक व्यवसाय करता येतील. मुख्य शेतीतून वाया जाणारे अवशेष हे दुसऱ्या व्यवसायाचा कच्चामाल असतील आणि कमी भांडवली गुंतवणूक, कमी जोखीम आणि कमी खर्चाची शेती पद्धती होय. अन्नधान्याच्या मुख्य पिकांचे वाया जाणारे अवशेष कडबा, पिंजर, गव्हाचे तुरीचे इतर कडधान्याचे जे काड आहेत त्याचा आपल्याला जनावरांचा चारा म्हणून वापर करता येईल, खाद्य म्हणून वापर करता येईल.

जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन, कोंबड्यापालन करता येईल. गाई-म्हशीपालनापासून दूध उत्पादन, शेळ्यांपासून दूध-मांस उत्पादन तसेच कोंबडीपासून मिळणारी अंडी-मांस यापासून शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागतील. पशुपालनातून दुधाबरोबरच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती अशी उपपदार्थाची निर्मितीची साखळीही तयार करता येईल.

पशुधनापासून दुसरा घटक म्हणजे शेण, मूत्र यांचा वापर शेतीबरोबर गोबर गॅसमध्ये गॅसची निर्मिती करून इंधनासाठी त्याचा वापर करता येईल. वर्षभर लागणाऱ्या इंधनाची गरज यातून भागवता येईल. शिवाय शेण-गोमूत्रापासून गांडूळ खत, व्हर्मिवॉश, पंचगव्य अशी उत्पादने घेता येतील आणि वर्षभर सातत्याने विकता येतील. पावसाचे पाणी शेततळ्यात साठवून मत्स्यपालन करता येईल.

रोज हातात ताजा पैसा येण्यासाठी दररोज दूध आणि भाजीपाला विक्री करता येते. दुग्धजन्य पदार्थ आठवड्यातून विक्री, गांडूळ खत दोन ते तीन महिन्यांनी शिवाय घरच्या शेतात लागणारे शेणखत सोडून वर्षाकाठी शेणखतही विकता येईल. आपल्या मुख्य शेतीची चार वेगवेगळ्या भागात विभागणी करून एका भागात नगदी पिके, दुसऱ्या भागात भाजीपाला, फळझाडे, तिसरा भाग चारा पिकासाठी आणि चौथ्या भागात कडधान्य, गळीत धान्य अशी पिके घेता येतील. भाजीपाला पिकांत मधमाश्यांच्या पेट्या ठेवून मधाचं उत्पादनही शक्य आहे. मधमाश्यांद्वारे परपरागीभवनातून इतर शेती पिकांचे उत्पादनसुद्धा वाढते.

समजा दुर्दैवाने खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये एखाद्या पिकाला फटका बसला तर उत्पन्नाच्या दुसऱ्या स्रोतांतून त्या वेळी वेळ मारून नेता येईल. सातत्याने लागणाऱ्या खर्चाला पैसे उपलब्ध होतील. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळेल. एकात्मिक शेती पद्धतीत विविधता आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक साह्य तर मिळेलच शिवाय मानसिक समाधानही मिळेल. तो आत्महत्येसारख्या विचारापासून परावृत्त होईल. देश पातळीवर एकात्मिक शेतीला चालना देण्यासाठी एकात्मिक शेतीची यशस्वी मॉडेल शेतकऱ्यांना दाखवून त्यांना प्रेरित करतात येईल.

- कृषिपंडित सुरेश पाटील, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, बुदिहाळ, ता. निपाणी. जि. बेळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT