health Benefits of Ricinus
एरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींना एरंडाचे औषधी गुणधर्म हमखास माहिती असतात. एरंड वनस्पतीची पाने, मूळ, बिया, एरंडापासून मिळणारे तेल या सर्वच उपयोगी असतात. ही वनस्पती सहज उपलब्ध होते. पाने विशिष्ट आकाराची म्हणजेच हाताच्या बोटांप्रमाणे भासणारी पण त्रिकोणी आणि दातेरी कडा असलेली असतात.
एरंड प्रामुख्याने वातनाशक असल्याने संधिवात, गुडघेदुखी इत्यादी वातविकारांत उत्तम कार्य करते. सांध्यावर वेदना होत असल्यास, एरंडाची पाने गरम करून त्याजागी बांधावीत. बऱ्याचदा फक्त बाह्योपचार करून वाताच्या तक्रारी, संधिवात यांवर आराम मिळत नाही. अशावेळी एरंड मुळांचा काढा पोटात घेतल्यास उपयोग होतो. एरंड मुळाची भरड पावडर काष्ठौषधीच्या दुकानात उपलब्ध होते.आमवातामध्ये ताप, सांधेदुखी, अपचन या लक्षणांनी रुग्ण त्रस्त असतो. शिवाय सांध्यांवर सूज येते. अशावेळी एरंड मूळ, सुंठ, गुळवेल यांचा काढा करून सेवन केल्यास आराम मिळतो. कारण या काढ्यातील सुंठ पाचक म्हणून, गुळवेल ताप कमी करण्यास आणि एरंड मूळ वातशामक म्हणून उत्तम कार्य करते.अवेळी जेवण, सतत बसून काम करणे, व्यायाम न करणे यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार जाणवते. शिवाय शौचाला खडा होतो. अशावेळी एरंड तेल एक चमचा प्रमाणात रात्री झोपताना घ्यावे. त्यामुळे आतड्यात स्निग्धपणा येऊन वात कमी होतो. आणि पोट साफ होण्यास मदत होते.वातामुळे बऱ्याचदा टाच खूप दुखते. त्यावर एरंड तेल चोळून शेक दिल्यास आराम मिळतो.बाळंतिणीमध्ये स्तनप्रदेशी वेदना होतात. अशावेळी एरंडाच्या पानांनी शेकावे. त्या वेदना दुधामुळे असतील आणि सूज असेल तर नक्की चांगला फायदा होतो.वातूळ पदार्थ, मटकी, पावटा, हरभरा, चण्याचे पीठ, शिळे पदार्थांचे सेवन कमी करावेत.जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात. अवेळी जेवण टाळावे.फरसाण, शेव, वेफर्स, भेळ, चुरमुरे या पदार्थांनी पचन बिघडते. त्यामुळे यांचे वारंवार सेवन करू नये.सांध्यांवर सूज, वेदना, ताप जास्त असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या जरूर कराव्यात.पोटाची तक्रार वारंवार होत असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर उपचार करावेत.एरंड तेल, काढा यांचा उपयोग फार चांगला होत असला तरी योग्य निदान झाल्याशिवाय चिकित्सेला दिशा मिळत नाही. म्हणून काळजी घ्यावी. संपर्क- डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७