The situation of oil seeds in India 
ॲग्रो गाईड

भारतातील तेलबियांची परिस्थिती

भारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक पातळीचा विचार करता लागवडही १४-१५ टक्के इतकी आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ ६-७ % इतकाच वाटा आहे.

प्रीतम भुतडा, डॉ. एस. बी. घुगे, डॉ. जे. इ. जहागीरदार,

भारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक पातळीचा विचार करता लागवडही १४-१५ टक्के इतकी आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ ६-७ % इतकाच वाटा आहे. पर्यायाने दरवर्षी खाद्य तेल आयातीचे प्रमाण वाढत असून, त्याचा ताण अर्थव्यवस्थेवर येत आहे. अशा वेळी करडईसारखे कोरडवाहू पीक महत्त्वाचे ठरू शकते. भारतात खाद्यतेलाची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. सुमारे ६०% तेल आयात करावे लागते. सन २०१८-१९ मधील भारताची आयात १४ दशलक्ष टन, त्यासाठी झालेला एकूण खर्च ६९०४ कोटी रुपये इतका आहे. भारतात घरगुती वापरासाठी लागणाऱ्या तेलासाठी ९ तेलबियांचा प्रामुख्याने वापर होतो. मात्र, उत्पादन क्षमता असूनही दरडोई वापरात वाढ झाली आहे. ते दरडोई मागणीच्या वाढीव दराशी जुळत नाही. तेलबिया पीक हे कृषी अर्थव्यवस्थेचे दुसरे सर्वांत महत्त्वाचे निर्धारक आहे. केवळ शेतातील तेल बिया उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त झाली असली तरी खाद्य तेल उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त झालेली नाही. १९९० च्या सुरवातीच्या काळात पिवळी क्रांती (यलो रिव्हॉल्यूशन) च्या माध्यमातून तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली. जागतिक पातळीवर भारत हा पाचव्या क्रमांकाचा तेलबिया उत्पादक देश आहे, तरिही खाद्य तेलाच्या बाबतीत मोठा आयातदार देशही ठरला आहे. कारण जागतिक स्तरावर भारताचा तेलबिया लागवडीत १४-१५% वाटा आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ ६-७ % इतकाच वाटा आहे. अलीकडील काळात खाद्य तेलाच्या वापरात वाढ होत आहे. भारतातील तेलबियांतील विविधता 

  • जागतिक पातळीवर विचार करता भारतात तेलबियांच्या बाबतीत सर्वांत अधिक विविधता असल्याचे दिसून येते. भारतात एकाच वेळी वेगवेगळे हवामान उपलब्ध असल्याचा फायदा वेगवेगळी तेलबिया पिके घेण्यासाठी होतो.
  • भुईमूग, मोहरी, तीळ ही पारंपारिक लागवडीखालील प्रमुख तेलबिया पिके आहेत. अलीकडे सूर्यफूल आणि सोयाबीन या पिकांनाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. देशातील सुमारे तेलबिया उत्पादनांपैकी ८५ टक्के वाटा भुईमूग, सोयाबीन आणि मोहरी यांचा एकत्रितपणे आहे.
  • भारतात खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग, तीळ, एरंडी आणि कारळे, तर रब्बी हंगामात सूर्यफूल, करडई, जवस ही प्रमुख पिके घेतली जातात.
  • खाद्य तेलाची मागणी वाढण्यामागील मुख्य कारणे

  • दरडोई उत्पन्नात वाढ.
  • लोकसंख्या वाढ.
  • अभिरुची आणि पसंतीमध्ये झालेला बदल.
  • घरगुती तेलबिया क्षेत्रातील कमी उत्पादकता.
  • खाद्य तेलाच्या आयातीसंदर्भातील धोरणे.
  • खाद्य तेल आयात व अर्थव्यवस्था  गेल्या दोन दशकांत देशांतर्गत खाद्य तेल वापराची वार्षिक वाढ ६ टक्के झाली आहे. १९९० च्या दशकाच्या सुरवातीच्या काळात ही आयात ५ दशलक्ष टनांवरून अलीकडील काही वर्षांत १२ दशलक्ष टनांपर्यंत वाढली आहे. मागणीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी आगामी काळात आयात आणखी वाढण्याची शक्यता आहे. तेल उत्पादनातील तफावत

    वर्ष मागणी पुरवठा आयात दरडोई वापर (किलो /वर्ष)
    २०१२-२०१३ १९.८२ ९.२३ १०.८१ १५.८०
    २०१३-२०१४ २१.०६ १०.०८ १०.९८ १६.८०
    २०१४-२०१५ २१.७१ ८.९५ १२.७१ १८.३०
    २०१५-२०१६ २४.०४ ९.१९ १४.८५ १९.१०
    २०१६-२०१७ २४.७५ १०.७५ १४.०० १८.७५
    २०१७-२०१८ २५.७४ १०.३८ १५.३६ १९.३०
    २०१८-२०१९ २५.३८ १०.५० १४.८८  १८.५८
    ( स्रोतः  साखर आणि वनस्पती तेल विभाग, व्यापार विभाग, कोलकत्ता)

    तक्त्यामध्ये मागणी आणि पुरवठा यांचा विचार केला असता तेलबिया उत्पादनाच्या तुलनेत खाद्यतेल उत्पादन खूप कमी दिसते. भारताच्या अर्थव्यवस्थेतील काही भाग हा तेल आयात करण्यात जातो. जर ही आयात कमी करायची असेल, तर केवळ सोयाबीन, भुईमूग किंवा मोहरी या पिकांवर अवलंबून राहून चालणार नाही. कोरडवाहू क्षेत्रातही चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या करडईसारख्या पिकाला प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे कोरडवाहू क्षेत्रातही तेलबियांचे उत्पादन शक्य होईल. त्यातून खाद्य तेलाबाबतची स्वयंपूर्णता गाठणे शक्य होईल. करडई पिकाचे महत्त्व

  • करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जातात. ती तीन फुटांपेक्षा जास्त खोलीतील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतात.
  • अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पादन मिळते.
  • या पिकाच्या पानांचा आकार पूर्ण वाढीनंतर कमी होऊन कडेने काटे येतात. परिणामी झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन अवर्षणातही चांगल्या प्रकारे तग धरुन राहते.
  • पानांवर मेणचटपणा असल्यामुळे देखील बाष्पीभवन कमी होते.
  • करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही. अत्यंत पाणी कमतरतेच्या स्थितीत पिकास एक ते दोन पाण्याची आवश्यकता असते.
  • खरीप पिकानंतर रब्बी हंगामात दुसरे पीक घ्यायचे असेल आणि ओलावा ठराविक प्रमाणात असेल तर करडई पीक हा एक उत्तम पर्याय आहे.
  • करडई हे पीक आरोग्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे.
  • संपर्क- प्रीतम भुतडा, ८१६९३२७३२२ (लेखक प्रीतम भुतडा या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सहाय्यक प्राध्यापक -कृषी विद्या असून, डॉ. घुगे. करडई संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी, तर डॉ. जहागीरदार हे वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

    Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

    Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

    Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

    Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

    SCROLL FOR NEXT