फुलकिडीला खाताना लाल कोळी
परजीवी कीटकांचे स्थलांतर खूप कमी अंतरापर्यंतच होते. त्यामुळे शेताच्या फक्त एका भागात सोडून त्यांचा पूर्ण शेतात प्रसार होत नाही. तर पूर्ण शेतात फिरून वेगवेगळ्या ठिकाणी ते सोडणे फायद्याचे ठरते.
जैविक नियंत्रक एका विशिष्ट कीड वा रोगापुरताच प्रभावी असतो. उदा. ट्रायकोग्रामा हा परजीवी कीटक त्याच्या यजमान किडीच्या फक्त अंडी अवस्थेतच परजीवीकरण करतो.एनपीव्ही विषाणू हेलीकोव्हर्पा (बोंडअळी घाटेअळी) किडीतच रोग उत्पन्न करतो. बीटी(बॅसिलस थुरिनजेन्सीस)चा उपयोग पतंग व पूर्ण विकसित अळ्यांच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात होतो. ट्रायकोग्रामा परजीवी कीटकांचा उपयोग पिकांमध्ये यजमान किडीची अंडी अवस्था आढळून आल्यावरच करणे हितावह ठरते. अंशत: शक्य झाल्यास किडींचे लिंगाकर्षण सापळे वापरून त्यामध्ये किडींची उपस्थिती व हालचालींना अनुसरून ट्रायकोग्रामा परजीवी कीटक शेतात सोडण्याचे नियोजन करावे. परजीवी कीटकांचे स्थलांतर खूप कमी अंतरापर्यंतच होते. ही त्यांची मर्यादा आहे. त्यामुळे शेताच्या फक्त एका भागात सोडून त्यांचा पूर्ण शेतात प्रसार होत नाही. तर पूर्ण शेतात फिरून वेगवेगळ्या ठिकाणी ते सोडावेत.क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग) या परभक्षी कीटकासाठी मावा, तुडतुडे, फूलकिडे, पिठ्या ढेकूण आदींची उपलब्धता जरूरीची असते. जास्त तापमानात जैविक घटक सक्रिय होत नाहीत. त्यांना २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. ट्रायकोग्रामा कीटकाला सायंकाळच्या वेळेस शेतात सोडण्याची शिफारस करण्यात येते. जेणे करून ते रात्रीच्या वेळेस यजमान किडीची अंडी शोधून त्यावर परजीवीकरण करू शकतात. जास्त तापमान, हवा किंवा पावसाच्या वातावरणात परजीवी किंवा परभक्षी कीटक शेतात सोडू नयेत. सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांचा एनपीन्ही विषाणूवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांची फवारणी सायंकाळच्या थंड वातावरणात करावी.बाजारातील बुरशीजन्य कीटकनाशकांत बीजाणू असतात. जेव्हा शिफारशीप्रमाणे पाण्यात मिश्रण करून ते फवारण्यात येतात तेव्हा हे बीजाणू झाडाच्या विविध भागांवर स्थिरावतात. त्यांचे स्थिरीकरण व वाढीसाठी वातावरणात योग्य प्रमाणात आर्द्रता (७० टक्क्यांपेक्षा जास्त) असणे जरुरीचे असते. असे वातावरण किमान एक आठवड्यासाठी असणे आवश्यक असते. तापमानही २५ ते ३० अंश सेल्सिअस असावे लागते.किडीच्या प्रथमावस्थेत उपयोग केल्यास योग्य परिणाम मिळतात.बुरशीजन्य जैविक कीटकनाशकांच्या फवारणीच्या अगोदर व फवारणीनंतर किमान एक आठवड्यापर्यंत अन्य रासायनिक कीटकनाशके फवारणे टाळावे. परजीवी किंवा परभक्षी कीटक शेतात सोडल्यानंतर अन्य कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी टाळावी. जरुर पडल्यास वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा उपयोग करावा. जीवाणू (बीटी) व विषाणू (एनपीव्ही) आधारीत कीटकनाशके म्हणजे एक प्रकारचे जठरवीष असते. त्यामुळे त्यांचा प्रवेश किडीच्या आतड्यामध्ये होणे जरुरी असते. मूळकूज व जमिनीतून होणाऱ्या अन्य रोगांच्या जैविक नियंत्रणासाठी ‘ट्रायकोडर्मा’ हे जैविक बुरशीनाशक वापरताना जमिनीत योग्य प्रमाणात पोषण तत्त्वे व आर्द्रता असणे महत्त्वाचे असते. जैविक नियंत्रणामध्ये जैविक घटकांच्या स्थानिक प्रजाती असणे योग्य असते. आयात केलेल्या प्रजातींना नव्या विस्तारात स्थापन होण्यासाठी थोडा कालावधी लागतो.ट्रायकोकार्डवरील अंड्यांतून परजीवी कीटक बाहेर निघून येतात. त्यासाठी ट्रायकोकार्डसची खरेदी केल्यानंतर ते कमी तापमानात फ्रिजमध्ये साठवल्यास सुमारे एक आठवड्यापर्यंत अंड्यामधून निघण्यापासून त्यांना रोखता येते.मित्र जीवाणू, बुरशी, विषाणू किंवा सूत्रकृमी आधारीत जैविक घटक कायम थंड व कोरड्या जागेवर साठवल्यास त्यांची गुणवत्ता टिकून राहते. जैविक घटकांवर उत्पादनाची व वापरण्याची तारीख दर्शवलेली असते. या कालावधीनंतर त्यांचा उपयोग केल्यास त्यांचा प्रभाव कमी होतो. - डॉ. मिलिंद जोशी,९९७५९३२७१७ (विषय विशेषज्ञ,कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)