पेरू फळ पीक कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे पीक असून, योग्य प्रकारे नियोजन केल्यास हमखास उत्पादन मिळते. पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेमध्ये छाटणी तंत्राचा अवलंब करून सघन लागवड केल्यास अधिक फायदा मिळू शकतो .
पेरूच्या सघन लागवडीमध्ये चार पद्धतीने लागवड करता येते. त्याचे दोन ओळींतील आणि दोन रोपांतील अंतर साधारणपणे पुढील प्रमाणे असावे.
६ × ३.५ फूट. ६ × ४ फूट. ८ × ६ फूट. १० × ८ फूट. कमी अंतरावर लागवड केल्यास झाडांची संख्या अधिक राहत असली तरी त्यातील छाटण्यांचे प्रमाण वाढते. उदा. आपण ६ × ३.५ फूट अंतरावर लागवड केल्यास वर्षातून तीन छाटण्या कराव्या लागतात. यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता अधिक राहते. याचा विचार करता ६ × ४ फूट, ८ × ६ फूट व १० × ८ फूट अंतरावरील लागवड पुढील देखभालीच्या दृष्टीने कमी खर्चिक ठरते. लागवडीचे तंत्रज्ञान
पेरूची लागवड ६ × ४ फूट अंतरावर केल्यास एकरी पेरूची १८०० झाडे बसतात. ८ × ६ फुटांवर लागवडीमध्ये ९०० झाडे बसतात. तर १० × ८ फूट अंतरावरील लागवडीमध्ये ५५० झाडे बसतात. अशा पद्धतीने एकरी १४ ते १७ टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. योग्य व्यवस्थापन केल्यास पेरूचा दर्जाही चांगला राहतो. सघन पद्धतीने लागवड केल्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करता येतो. पिकाला गरजेनुसार पाणी देता येते. जमिनीत सतत वाफसा परिस्थिती राहिल्यामुळे उत्पादनात वाढ होते. मे महिन्यात एकदाच छाटणी केल्यास पेरूचे चांगले उत्पादन मिळते. पेरूच्या झाडाची जास्त वाढ होत असेल तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत वाढणारा शेंडा हाताच्या साह्याने एकदाच काढला तर पुढील वाढ थांबते. त्यामुळे फांदीवर फुलांची संख्या वाढते. पेरूची सर्व फळे जाड फांदी व खोडावर येत असल्यामुळे त्याचा आकार व प्रतही चांगले मिळते. झाडाची मे महिन्यात छाटणी करताना जाड फांद्या ठेवून बाकीच्या सर्व बारीक काड्या छाटाव्यात. झाडाच्या मुख्य खोडापासून आलेल्या चार ते पाच उपयुक्त फांद्या आणि त्यानंतर आलेल्या लहान फांद्या अशा प्रकारे झाडांना आकार देण्यात येतो. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर किंवा गरजेप्रमाणे पाणी दिल्यानंतर झाडांना फूट येण्यास सुरुवात होते. पाण्याची उपलब्धता असेल तर लवकर छाटणी करून हंगामापूर्वी फळे बाजारपेठेत पाठविता येतात. पाणी देण्याअगोदर शिफारशीत मात्रेमध्ये शेणखत, रासायनिक खते, आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाच्या खोडाभोवती रिंग करून द्यावीत. विद्राव्य खतांच्या माध्यमातून ठिबकद्वारे खतांचे नियोजन करता येते. झाडाला पालवी आल्यानंतर सुरुवातीला फुले हे झाडाच्या जाड फांद्या आणि खोडावर येतात. या फळाचा आकार, वजन आणि गुणवत्ता चांगली असते. फळांची गोडी चांगली असते. झाडाला भरपूर फूट येऊन पानांची संख्या चांगली मिळते. नंतरचा बहर हा नवीन आलेल्या शेंड्यांना येतो. पेरूच्या पहिल्या फळाची काढणी सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये होते. तर दुसरी फळे फेब्रुवारी-मार्च किंवा यापेक्षा थोडी उशिरा मिळतात. फळाला चांगला बाजारभाव मिळतो. फळांच्या उत्पादनानुसार झाडांजवळ मातीमध्ये दोनदा चाळणी करावी लागते. झाडांच्या जुन्या मुळ्या तुटून नवीन पांढरी मुळे येण्यासाठी त्याचा फायदा होतो. पांढऱ्या मुळ्या भरपूर येण्यासाठी शेत भुसभुशीत ठेवावे. आंतरमशागतीसाठी पॉवर टिलरचा वापर केल्यास खर्चात बचत होते. मिडो ऑर्चर्ड तंत्रज्ञान या पद्धतीमध्ये पेरूची लागवड ६ × ३.५ फूट अंतरावर केली जाते. एकरी २ हजार झाडे बसतात. मात्र या पद्धतीने लागवड करण्यासाठी छाटणी शास्त्रीय तंत्र शिकून घ्यावे. आपल्याला छाटणी तंत्र समजले तरच उत्तम प्रतीचे उत्पादन घेणे शक्य होते. अन्यथा, फळांचा आकार व दर्जा घटतो. छाटणी व अन्य कामांसाठी मजुरांची कमतरता असल्यास पुढील लागवड अंतरांना प्राधान्य द्यावे.
६ × ४ फूट- एकरी रोपे १८००. ८ × ६ फूट- एकरी रोपे ९००. १० × ८ फूट- एकरी रोपे ५५०.लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी जमिनीपासून ५०-६० सें.मी. खोड ठेवून छाटणी करावी.सुरुवातीला आकार देताना चार दिशेच्या चार फांद्या फक्त ठेवाव्यात. म्हणजे झाडाला आकार येतो.पहिल्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी पुन्हा एकदा फांद्यांची छाटणी करावी. यामध्ये एकूण फांद्यांच्या ५० टक्के (अर्ध्या फांद्या) छाटणी करावी. फक्त तांबड्या रंगाच्या परिपक्व फांदीचा खालचा भाग आहे तसाच ठेवावा.दुसऱ्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी पुन्हा एकदा एकूण नवीन फुटलेल्या फांद्यापैकी ५० टक्के फांद्याची छाटणी करावी. त्यात सुरुवातीच्या ५० टक्के शेंड्यांच्या भागाची छाटणी करावी. सघन लागवडीसाठी विकसित जाती
सरदार (एल-४९) (सफेद) तैवान पिंक (गुलाबी) अलाहाबाद सफेदा (सफेद) ललित (लाल) - बाबासाहेब गायकवाड, ९४२२७२४११३, ८२७५३२४११३ (प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, येवला, जि. नाशिक)