तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये वेलीवर द्राक्षे सुकवण्याचा एक प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी उपलब्ध वातावरणामध्ये आठ दिवसांमध्ये द्राक्ष सुकली होती.
सध्या मोठ्या क्षेत्रावर काढणीच्या टप्प्यातील द्राक्षबागा आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या वाहतुकीसह अनेक अडचणीमुळे द्राक्ष काढणी शक्य झाली नाही. वेलीवरील घड काढण्यासाठी मजुरांची उपलब्धता शक्य होत नाही, अशी स्थिती आहे. पूर्ण वर्षाची मेहनत वाया जाण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीमध्ये वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची प्रक्रिया फायदेशीर ठरू शकते. सध्या द्राक्षबागेतील उपलब्ध हवामानानुसार ही द्राक्ष सुकण्याची प्रक्रिया व कालावधी अवलंबून असेल, याची नोंद घ्यावी.
द्राक्षवेलीस पाणी कमी करून मण्यामध्ये गोडी वाढवून घ्यावी. फळछाटणी करून पुन्हा खरड छाटणीची वेळ जवळ आली असल्यामुळे तयार द्राक्ष घड लवकर बागेबाहेर काढणे गरजेचे असेल. घडाच्या मागे २ ते ३ डोळे काडी काढून घ्यावी. डिपिंग ऑईलची फवारणी करावी. वेलीस पाण्याचा पुरवठा कमी केल्यामुळे मणी लूज पडल्याप्रमाणे होतील. यानंतर इथाईल ओलिएट (डिपिंग ऑईल) १५ मि.लि. अधिक पोटॅशिअम कार्बोनेट २५ ग्रॅम प्रति लिटर पाणी (टँक मिक्स) या द्रावणाची द्राक्षघडावर फवारणी करावी. ही फवारणी दोन ते तीन वेळा करावी लागते. ज्या बागेमध्ये जीए ३ चा वापर जास्त झालेला आहे, अशा बागेमध्ये परिणाम मिळण्याकरिता तीन फवारण्या कराव्या लागतील. यासोबत द्राक्षे अल्कलाईन होईल,याची काळजी घ्यावी. याकरिता द्रावणाचा सामू हा १० ते ११पर्यंत ठेवावा. या पद्धतीने वेलीवर जवळपास १२ ते १४ दिवसामध्ये ७० टक्क्यांपर्यंत द्राक्ष सुकतील, त्याचा बेदाणा तयार होईल. त्यानंतर हे घड खाली काढून ताडपत्रीवर टाकून सावलीमध्ये सुकवता येईल. काही बागेत पूर्ण काड्या तारेवर बांधलेल्या नसल्यामुळे काडी कापल्यानंतर घड वेलीवर खाली पडू शकतो. अशा परिस्थितीत काड्या तारेवर बांधून घेता येतील. दुसऱ्या परिस्थितीमध्ये काडी कट न करतासुद्धा फवारणी घेता येईल. यावेळी द्राक्ष सुकण्यासाठी अधिक वेळ लागेल. वेलीवर फवारणी केल्यामुळे पानांवर स्कॉर्चिंग येईल. आता आपल्याला पानांची तशीही गरज नसल्यामुळे पानांवर स्कॉर्चिंग आले तरी चालणार आहे. याचा कोणताही विपरीत परिणाम पुढील हंगामात होणार नाही, पाने लवकर सुकायला किंवा गळायला सुरुवात झाल्यास खरड छाटणीनंतर पुन्हा बाग लवकर फुटण्यास मदत होईल. वेलीवर बेदाणा तयार झाल्यानंतर बागेत लगेच पाणी देऊन खरड छाटणी घेता येईल.यावेळी बागेत वेलीस विरळणीची गरज नसेल.टीप ः वर दिलेल्या उपाययोजना या केवळ एका प्रयोगातील निष्कर्षावर आधारीत आहेत, याची नोंद घ्यावी. ही प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलणे आवश्यक असेल. - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)