veneer grafting
veneer grafting 
ॲग्रो गाईड

फळपिकांसाठी अभिवृद्धीच्या सुधारित पद्धती

डॉ. राजन खांडेकर, सुमेध थोरात, महेश कुळकर्णी

फळझाडांची अभिवृद्धी बिया तसेच शाखीय पद्धतीने केली जाते. फळझाडांची कलमे करण्याच्या विविध पद्धती आहेत. 

गुटी कलम

  • या पद्धतीने पेरू, जाम, चेरी, दालचिनी, लिंबू करवंद इ. फळझाडांची अभिवृद्धी केली जाते. या पद्धतीत ७० ते ८० टक्के यश मिळते 
  • गुटी कलमासाठी सुमारे ४० ते ५० सें.मी. लांब वाढलेल्या फांदीवर टोकापासून ३० ते ४५ सें.मी. अंतरावर १.५ सें.मी. रुंदीची पूर्ण साल काढावी.
  • लवकर व अधिक प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी आय.बी.ए. व एन. ए.ए. ही संजीवके०.२-०.५ टक्के  वापरावे. तेथे ओले शेवाळ लाऊन प्लॅस्टिक कापडाने गुंडाळून दोन्ही टोकाकडे सुतळीने बांधून घ्यावे.  पावसाळ्यात गुट्या चांगल्याप्रकारे होतात. 
  • सुमारे अडीच ते तीन महिन्यात या गुट्यांमधून मुळे बाहेर दिसू लागतात.  चांगली मुळे फुटल्यानंतर गुट्या झाडापासून कापून प्लॅस्टिक पिशव्यात लावून सावलीत ठेवाव्यात. गुटी वरील ५० टक्के पाने कमी करावीत.   
  • कोय कलम 

  • आंब्याच्या अभिवृद्धीसाठी ही साधी व सोपी पद्धत वापरून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे करता येतात. या पद्धतीत सुमारे ७० ते ८० टक्के यश मिळते.  यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. 
  • या पद्धतीत गादीवाफ्यावर कोयी रुजवून १५ ते २० दिवसांचे, पाने व देठाचा रंग तांबडा असलेले रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. रोपाचा खालचा ७ ते ९ सें.मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून मधोमध सुमारे ४ ते ६ सें.मी. लांबीचा उभा काप घ्यावा. 
  •  ३ ते ४ महिने वयाची, जून, निरोगी आणि फुगीर डोळ्याची , १० ते १५ सें.मी लांबीची काडी घ्यावी. त्या काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत. काडीच्या खालून ४ ते ६ सें.मी. लांबीचा पाचरीसारखा काप घेऊन आकार द्यावा. ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. जाड काडीसाठी एक बाजू रोपाच्या सालीस जुळवून घ्यावी. 
  • कलमाचा जोड २ सें.मी. रुंद व २० सें.मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. बांधलेली कलमे १४ बाय २० सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड २ ते ५ सें.मी. मातीच्यावर राहील याची काळजी घ्यावी. 
  • कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे, मात्र पाणी कलमांच्या जोडात जाणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • कलमाच्या फुटीवरील पाने गर्द हिरवी झाल्यावर कलमे हळूहळू मोकळ्या जागी उघड्यावर आणावीत. 
  • कलमाच्या जोमदार वाढीसाठी ८ दिवसांपर्यंत साठविलेल्या ५० टक्के गोमुत्राची फवारणी (२० मि.लि.) व ५० टक्के गोमुत्राची (१०० मि.लि.) प्रति पिशवीत भिजवण महिन्यातून एकदा अशी तीन महिने करावी.
  • बगल कलम 

  •  या पद्धतीमध्ये दीड ते अडीच वर्षे फळझाडांची रोपे खुंट म्हणून वापरतात. या पद्धतीत सुमारे ६० टक्के यश मिळते. 
  • आंब्यामध्ये या पद्धतीने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कलमे करावीत.  
  • व्हिनिअर कलम 

  • या पद्धतीत ८ ते १० महिने वयाची रोपे खुंट म्हणून निवडावीत. या खुंटावर एका बाजूस सुमारे १५ सें.मी. वर ५ ते ७ सें.मी लांबीचा तिरकस उभा काप घ्यावा. कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावी. कापाच्या खालच्या टोकास थोडासा आडवा व तिरकस काप घेऊन साल व आतील भाग काढून घ्यावा. 
  • मातृवृक्षाच्या काडीवर ५ ते ७ सें.मी आकाराचा तिरकस काप घेऊन ही फांदी खुंटावर दिलेल्या कापावर व्यवस्थित बसवून घ्यावी. जोड पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. 
  • सुमारे वीस दिवसात काडीला नवीन फूट येते, ही फूट ५ ते ७ सें.मी. वाढल्यानंतर खुंटाचा शेंडा कापून टाकावा. 
  • आंब्यामध्ये व्हिनीयर कलमे फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात केल्यास सुमारे ६० टक्के यश मिळते. 
  •    मृदुकाष्ठ कलम  

  • या पद्धतीने आंबा, काजू, फणस, चिकू, कोकम, जांभूळ, आवळा, जायफळ इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी करता येते. 
  • कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये तेथे लावलेल्या कलमांची मोठ्या प्रमाणावर मर होते, अशा ठिकाणी या पद्धतीने कलमे करावीत. 
  • या पद्धतीत खुंट म्हणून वापरले जाणारे रोप उंच वाढलेले आणि आंब्यामध्ये ३ महिने वयाचे तर काजूमध्ये ४५ ते ६० दिवसांचे असावे. या रोपावर येणाऱ्या नवीन शेंड्यावरील कोवळ्या फुटीवर कलम करावे. 
  • कलमे करण्यासाठी आंब्यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ योग्य आहे.  काजूमध्ये थंडीचा हंगाम वगळता वर्षात केव्हाही कलमे करता येतात. पद्धतीत सुमारे ८५ टक्के यश मिळते.
  • कोपाइस कलम 

  • या पद्धतीने आंबा, काजू, आवळा, इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी करता येते. 
  • बियांपासून केलेल्या काजूच्या/आंब्याच्या जुन्या, कमी उत्पन्न देणाऱ्या आणि कमी गुणवत्तेच्या झाडाचे चांगल्या, जातिवंत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या  झाडांमध्ये रूपांतर करण्यासाठी  कलम पद्धत वापरावी. 
  • या पद्धतीत १५ वर्षे वयापर्यंतची झाडे जमिनीपासून सुमारे ७५ सें.मी. ते १ मीटर उंचीचे खोड ठेवून करवतीने छाटून टाकावी. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत झाडांची छाटणी करावी. 
  • छाटलेल्या खोडापासून २५ ते ३० नवीन फुटवे येतात, त्यापैकी खोडाच्या वरील ३० ते ४५ सें.मी. भागातून निघणारे चार ते पाच जोमदार निरोगी फुटवे निवडून त्यावर मृदुकाष्ठ पद्धतीने फेब्रुवारी ते एप्रिल या हंगामात कलम बांधावे. छाटलेल्या खोडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २ मिलि प्रती  लिटर पाण्यातून फवारावे आणि रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डोपेस्टचा दरवर्षी जून-जुलैमध्ये लेप द्यावा. 
  • उन्हामध्ये संपूर्ण उघड्या पडलेल्या खोडांना सावली करावी. कलमांच्या फुटीला आधार द्यावा. किडी आणि वाऱ्यापासून संरक्षण करावे. 
  • - डॉ. राजन खांडेकर  ८२७५४५४९७९,

    सुमेध थोरात  ७५८८६९६५६९,   महेश कुळकर्णी  ८२७५३९२३१५

    (उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली,जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT