वेळेवर करा रब्बी सूर्यफुलाची लागवड Agrowon
ॲग्रो गाईड

Sunflower Cultivation : वेळेवर करा रब्बी सूर्यफुलाची लागवड

डॉ. ए. एम. मिसाळ, डॉ. एम. के. घोडके, एस. बी. सूर्यवंशी

राज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत सूर्यफुलाची लागवड होते. हे पीक हवामानासाठी काही प्रमाणामध्ये संवेदनशील असल्याने लागवड वेळेवर करणे आवश्यक आहे.

जमीन व हवामान :

  • मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचरा असणारी व जमिनीचा सामू ६.५ - ८.० असणारी जमीन सूर्यफूल लागवडीसाठी निवडावी. पाणथळ किंवा आम्लयुक्त जमीन लागवडीसाठी टाळावी.

  • सूर्यफुलाची चांगली वाढ व उत्पादनासाठी, ५०० मि.मी. पर्जन्यमानाची गरज आहे.

  • सूर्यफूल हे समशीतोष्ण कटिबंधातील पीक असल्याने बियाणे उगवणीसाठी व रोपांची वाढ होण्यासाठी थंड हवामान लागते, तर फूलधारणेपासून पीक येईपर्यंत स्वच्छ प्रकाश व जास्त तापमान आवश्यक आहे.

  • फूलधारणेच्या अवस्थेत पाऊस व धुके पडल्यास, त्याचा विपरीत परिणाम बीजधारणेवर होतो, त्यामुळे फुलोऱ्याची अवस्था पावसात व धुक्यात सापडणार नाही, याची काळजी घेऊनच पेरणीची वेळ ठरवावी.

  • तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी व ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास परागीकरणावर, उत्पादनावर व तेलाच्या प्रमाणावर परिणाम होतो. साधारणतः २५-३० अंश सेल्सिअस तापमानात सूर्यफूल पिकाची वाढ चांगली होते.

पेरणीची वेळ : रब्बी हंगामात ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी. यासाठी हेक्टरी ५ किलो बियाणे वापरावे. पाभरीद्वारे पेरणीसाठी हेक्टरी ८-१० कि.ग्रॅ. बियाणे लागते.

पूर्वमशागत : वखराच्या दोन पाळ्या देऊन शेत तयार करावे. शेवटच्या वखर पाळीअगोदर हेक्टरी ५-१० टन कुजलेले शेणखत मिसळावे.

बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे. बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी : कार्बेन्डाझीम ३ ग्रॅम नत्र व स्फुरदाची उपलब्धता ः अॅझेटोबॅक्टर, पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम.

बियाणे व लागवड पद्धत :

पेरणीचे अंतर : भारी जमिनीत ६० x ३० सें.मी. व मध्यम जमिनीत ४५ x ३० सें.मी अंतरावर लागवड करावी.

पेरणीची पद्धत : पेरणी टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी दोन बिया टोकण कराव्यात. पेरणी पाभरीने केल्यास ६० सें.मी. पाभरीचा वापर करून ८-१० किलो बियाणे प्रतिहेक्टरी पेरण्यास वापरावे.

पीकपद्धती : क्रमिक पीक : कोरडवाहू क्षेत्रात : सोयाबीन- सूर्यफूल, मूग, उडीद- सूर्यफूल, सूर्यफूल- हरभरा बागायती क्षेत्रात : भुईमूग- सूर्यफूल- तीळ, कापूस- सूर्यफूल, तूर- सूर्यफूल व ज्वारी- सूर्यफूल.

वेळेवर करा रब्बी सूर्यफुलाची लागवड
वेळेवर करा रब्बी सूर्यफुलाची लागवड
वेळेवर करा रब्बी सूर्यफुलाची लागवड

सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन :

  • २५ किलो गंधक प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळेस दिल्यास बियाण्यात १.५-२.५ टक्के तेलाचे प्रमाण वाढते.

  • पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर २०, ४० व ५० दिवसांनी १५ ग्रॅम युरिया + ५ ग्रॅम डी.ए.पी. खत प्रतिलिटर पाणी फवारणीद्वारे द्यावे.

  • माती परीक्षणानुसार कमतरता असल्यास, झिंक सल्फेट १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १०-२० किलो व बोरॅक्स ५ किलो प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी द्यावे.

आंतरमशागत :

  • सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी रोपांची संख्या ५५ हजार ठेवणे महत्त्वाचे आहे. शेतकरी सूर्यफुलाची पेरणी बहुतेक वेळी तिफणीने करतात, त्यामुळे हेक्टरी रोपांची संख्या ही कमी किंवा अधिक होऊन, त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.

  • पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. एका ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवावे. दोन रोपांमधील अंतर ३० सें.मी. राहील असे पाहावे.

  • सूर्यफूल पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. यासाठी २-३ वेळा कोळपणी व खुरपणी करावी.

वेळेवर करा रब्बी सूर्यफुलाची लागवड

पाणी व्यवस्थापन :

  • सूर्यफूल पिकास जमिनीचा प्रकार, हवामान व पिकाच्या कालावधीनुसार ६००-१००० मि.मी. पाणी लागते.

  • पीकवाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • कळी धरणे (३०-४० दिवस).

  • फूल उमलणे (५५-६५ दिवस)

  • दाणे भरणे (६५-७० दिवस)

हस्त परागीकरण :

  • सूर्यफुलात परागीकरणासाठी मधमाश्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रतिहेक्टरी मधमाश्यांच्या ५ पेट्या ठेवाव्यात. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते.

  • मधमाश्यांचे प्रमाण कमी असल्यास, योग्य परागीकरणासाठी व बी भरण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सूर्यफुलाचे पीक फुलोऱ्यात असताना एक दिवसाआड सकाळी ८-११ या वेळेत एक आठवडा फुलावर मऊ कापडाने हात फिरवावा, त्यामुळे बी भरण्याच्या प्रमाणात २५-३० टक्के वाढ दिसून आली आहे.

  • पीक फुलोऱ्यात असताना शक्यतो कोणतेही कीडनाशक फवारू नये.

संपर्क : डॉ. ए. एम. मिसाळ, ०७५८८६१२९४३ संपर्क ः डॉ. एम. के. घोडके, ०९४२३७७७५८५ (गळीत धान्ये संशोधन केंद्र, लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT