अंजीर फळ पिकावर अन्य फळझाडांच्या तुलनेत कमी प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. मात्र तांबेरा या नुकसानकारक रोगामुळे अंजीर उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होऊ शकते. त्यामुळे त्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर द्यावा. रोगकारक बुरशी सिरोटीलीय फिकी. ही बुरशी फक्त अंजिराच्या सजीव वनस्पतीवरच वाढते. लक्षणे
सुरुवातीला पानाच्या खालील बाजूस तपकिरी रंगाचे लहान, किंचित लांबट उंचवटे किंवा पुटकुळ्या सदृश्य असंख्य फोड दिसतात. या फोडांमधूनच पिवळसर, तपकिरी रंगाची बुरशीची भुकटी म्हणजेच बुरशीचे बीजाणू बाहेर पडतात. हे बीजाणू हवेमार्फत कित्येक किलोमीटरपर्यंत दूर जाऊ शकतात. त्यातून रोगाचा प्रसार वाढतो. झाडाच्या मुळाशी, खोडाजवळ पाणी भरून दिल्यास रोगाचे प्रमाण जास्त राहते.रोगाच्या अधिक प्रादुर्भावामध्ये झाडाची पाने पिवळी पडून गळतात. तीव्र प्रादुर्भाव असलेल्या स्थितीत फळे आणि फांद्या शिल्लक राहून पूर्ण पानगळ होते.अशा पानगळ झालेल्या बागेत फळांची योग्य वाढ होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या फळांवर लहान काळपट असंख्य डाग पडतात. अशी फळे चांगली पिकत नाहीत, कडक होतात किंवा पिकल्यानंतर ताबडतोब खराब होतात. बऱ्याच वेळा तांबेराग्रस्त पानावर अल्टरनेरिया रोगसुद्धा येतो. पाने डागाळलेली दिसतात. रोगाची प्रादुर्भाव, प्रसार
बागेतील रोगग्रस्त पाने, फांद्या यांच्यामार्फत रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव होण्यास मदत होते.रोगाचे बीजाणू (युरेडोस्पोर) हवेमार्फत रोगाचा दुय्यम प्रसार करतात.कमी तापमान (१५ ते २५ अंश से.)हवेतील आर्द्रता ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिकवातावरण पडणारे दवपावसाळ्यापेक्षा थंडीच्या दिवसांत हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो.सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.दरवर्षी बहर धरण्यापूर्वी बागेची हलकी छाटणी करावी. यामुळे रोगग्रस्त फांद्यांची संख्या कमी होते. नवीन फूट जोमाने येते. नव्या फुटीवर रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असतो.छाटणी केल्यानंतर सर्वप्रथम झाडाखाली व आजूबाजूला पडलेली सर्व रोगग्रस्त पाने व फांद्या गोळा करून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.बागेत हवा चांगली खेळती राहील, याची दक्षता घ्यावी. बागेस गरजेनुसार पाणी द्यावे.बागेची छाटणी झाल्यावर ताबडतोब व संपूर्ण झाडावर, झाडाखाली, जमिनीवर गंधक (३०० मेश) २० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे धुरळणी करावी. किंवा गंधक (पाण्यात मिसळणारे) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.अंजिराला कोवळी पाने फुटल्यानंतर साधारणत: छाटणीनंतर २० दिवसांपासून पुढे १५ दिवसांच्या अंतराने पुढीलप्रमाणे आलटून पालटून फवारणीचे नियोजन करावे. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)क्लोरोथॅलोनील २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम (टॅंक मिक्स) किंवाकार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम (टॅंक मिक्स) (टीप : अंजीर काढणी आधी एक महिना फवारणी बंद करावी.) - डॉ. युवराज बालगुडे, ९८९०३८०६५४ (सहायक प्राध्यापक -वनस्पती रोगशास्त्र,अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)