‘‘चाललं आयावडे.’’ असं म्हणून मी घरासमोरच्या झाडावरली डोळे उघडलेली सीताफळं वर चढून तोडून भुशात पिकाया घातली. चार-पाच दिवसांत ती चांगली पिकतील व मग बाजारात नेऊन विकता येतील ह्या विचारानं मी आनंदलो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून मला शाईची दऊत घेता येणार होती कारण चौथीत असताना वक्तृत्व स्पर्धेत मला एक शाईपेन मिळाला होता.
त्याच्या पोटाला पोटभर शाई मात्र मिळाली नव्हती. दुसऱ्याकडून चार थेंब शाई घेऊन अक्षर कसं येतं एवढंच पाहून तो पेन मी देवळीत ठेवून दिला होता. त्यासाठी हा बाजार महत्त्वाचा होता. एक दिवस तर माझ्या स्वप्नात दऊत येऊनही गेली होती. मी अधीर होतो. त्यामुळे फक्त रविवारची वाट पाहत होतो.
शनिवारी रात्री सगळी सीताफळं चाचपून पाहिली. १२ सीताफळं पिकली होती. आईनं मला बजावलं, ‘‘ह्ये पघ, याक सीताफळं एक रुपयाच्या खाली इकायचं नाहयी, दुपारपतूर जर खपली नाहयीत तर मंग पन्नास पैशाला इकून मोकळं व्हायचं.’’ ‘‘व्हय आई, तू म्हनशीन तसंच करीन मी.’’
दुसऱ्या दिवशी टोपल्यात सीताफळं घेऊन अळकुटीला चालत निघालो. मी पाचवीला होतो. साडेचार किलोमीटर खडीच्या रस्त्यानं चालून पाय हुळहुळे झाले होते. बाजारात पोहोचलो. एका बाजूला पटकूरं टाकून त्याच्यावर सीताफळं विकू लागलो. लोकं येत होती पाहत होती व पुढं निघून जात होती.
तीन रुपये घेतले व दऊत घ्यायला दुकानात गेलो. पण तिची किंमत पाच रुपये होती. त्यामुळे ती न घेता निराश मनानं पुन्हा पायीपायी घरी आलो. आईला सगळं सांगितलं. आई म्हणाली, ‘‘आरं, याक सीताफळ हे चारान्यालाच जानार व्हतं,
मला फकस्त बघायचं व्हतं तू तपलं डॉकं वापरितोय का नाहय.’’ एवढं बोलून आईनं मला कंबरेच्या पिशवीतून दोन रुपये दिले. मग मी दऊत घेतली. पेनाच्या पोटाला पोटभर शाई मिळाली अन् दुसऱ्या बाजूला अशिक्षित असूनही मला व्यवहारी ज्ञान देणारी आई समजली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.