Maize Market Agrowon
ॲग्रो विशेष

India Maize Market: यंदा मक्यात तेजी टिकून राहणार का?

Maize Prices India: देशातील बाजारात सध्या मक्याला प्रति क्विंटल २ हजार ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्याचा भाव नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहे. देशातील बाजारात रब्बीच्या मक्याची आवकही कमी झाली.

Anil Jadhao 

Indian Agriculture: देशातील बाजारात सध्या मक्याला प्रति क्विंटल २ हजार ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्याचा भाव नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहे. देशातील बाजारात रब्बीच्या मक्याची आवकही कमी झाली. देशात यंदा इथेनाॅलसाठी मक्याचा वापर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. मात्र तरीही वाढते उत्पादन, आयात, स्टाॅकिस्टची सक्रियता हे घटक दरावर परिणाम करतील, असे सध्याचे चित्र आहे.

मागील दोन वर्षांपासून इथेनाॅलसाठी मक्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे मक्याला मागणीही वाढत गेली. मागणी वाढल्याने मागील दोन वर्षांत मक्याचे दरही चांगले राहिले. एकीकडे कापूस, सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांचे भाव कमी होत असताना दुसरीकडे मक्याचे दर तेजीत राहिले. त्यामुळे देशातील मक्याची लागवड वाढून उत्पादनही वाढत गेले. यंदा देशातील मक्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले. आयातही वाढत आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. चालू हंगामातही शेतकरी मक्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

मक्याचा वापर

देशात मक्याचा वापर प्रामुख्याने इथेनाॅल, पोल्ट्री, पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगात होतो. देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल ६० टक्के मका पोल्ट्री आणि पशुखाद्यासाठी वापरला जातो. पोल्ट्री उद्योगात वर्षाकाठी मक्याचा वापर १६० ते १८० लाख टनांच्या घरात आहे. पशुखाद्यासाठी ५० ते ७० लाख टन मका जातो. स्टार्च उद्योगाचाही मका वापर ५० ते ७० टनांच्या दरम्यान असतो. अन्न प्रक्रिया उद्योगात ३० ते ४० लाख टन मका वापरला जातो. इतर क्षेत्रांतही ५० ते ६० लाख टनांच्या घरात मक्याचा वापर होतो. पण इथेनाॅलसाठी मागील वर्षापासून मक्याचा वापर वाढत आहे.

इथेनाॅलची मागणी

२०२३-२४ च्या हंगामात इथेनाॅलसाठी ७५ लाख टनांच्या दरम्यान मक्याचा वापर झाला. तेल मार्केटिंग कंपन्यांनी २०२४-२५ च्या हंगामात ८३७ कोटी लिटर इथेनाॅलची मागणी केली. यापैकी मक्यापासून निर्मित इथेनाॅलची मागणी तब्बल ४३१ कोटी लिटर इतकी आहे. एकूण मागणीच्या ती तब्बल ५१.५ टक्के भरते. ती पूर्ण करण्यासाठी १०७ लाख टन मका लागेल.

उसाच्या रसापासून निर्मित इथेनाॅलची मागणी १८८ कोटी लिटर, बी हेवी मोलॅसिस जवळपास ११४ कोटी लिटर, खराब धान्यापासून ९३.८ कोटी लिटर आणि सी हेवी मोलॅसिसपासून निर्मित ९.१५ कोटी लिटर इथेनॉलची मागणी नोंदविली गेली आहे.

इथेनाॅल उताऱ्याचा विचार केला तर एक टन मक्यापासून साधारणतः ३७० ते ३८० लिटर इथेनाॅल मिळते. सध्या सर्व प्रकारच्या इथेनाॅलमध्ये मक्यापासून निर्मित इथेनाॅलची किंमत सर्वाधिक आहे. सरकारने ६ जानेवारी २०२४ रोजी मक्यापासून निर्मित इथेनाॅलची किंमत वाढवून ७१.८६ रुपये केली. तर इतर खराब धान्यापासून निर्मित इथेनाॅलची किंमत ६४ रुपये प्रतिलिटर आहे. थेट उसाच्या रसापासून निर्मित इथेनाॅलची किंमत ६५.६१ रुपये आहे. बी हेव्ही मोलॅसिसपासून निर्मित इथेनाॅलची किंमत ६०.७३ रुपये प्रतिलिटर, तर सी हेव्ही मोलॅसिसपासून तयार झालेल्या इथेनाॅलची किंमत ५७.९७ रुपये प्रतिलिटर आहे.

इथेनाॅलसाठी इतर पर्याय

२०२३ मधील दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे धान्य उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे तांदूळ व इतर धान्यांपासून इथेनाॅल निर्मिती झाली नाही. पण यंदा सरकारने तांदळापासून इथेनाॅल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. तसेच थेट उसाचा रस आणि मोलॅसिसपासूनही इथेनाॅल निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. यंदा उसाचे उत्पादनच कमी असल्याने इथेनाॅलसाठी उसाचा रस आणि मोलॅसिस कमी जाईल. सध्या बाजारावर या घटकाचाही परिणाम दिसत आहे.

वाढती आयात

भारतात मक्याची मागणी वाढून दर वाढल्यामुळे देशात आयातही वाढली आहे. मागील वर्षापर्यंत भारत मक्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करत होता. २०२३-२४ मध्ये भारतातून २ लाख ९५ हजार टन निर्यात झाली होती. तर आयात १ लाख २६ हजार टन होती. मात्र २०२४-२५ च्या हंगामात निर्यात केवळ ९० हजार टन झाली. तर आयात ९ लाख ५५ हजार टन झाली होती. भारतात मक्याचा वापर वाढत असल्याने दर वाढले होते. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात नाॅन जीएम मक्याचे दर कमी होते. परिणामी, देशात मक्याची आयात वाढली. प्रामुख्याने म्यानमार आणि युक्रेन या दोन देशांमधून मक्याचा पुरवठा वाढला. मात्र जानेवारीनंतर देशातील भाव कमी झाले. त्यामुळे आयात जवळपास थंडावल्याची स्थिती आहे. मात्र पुढील काळात दर वाढले तर आयातही पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

पुढची दिशा

रब्बीतील पीक बाजारात दाखल होण्याच्या तोंडावर दर दबावात आले होते. पण मागील तीन आठवड्यांपासून दरात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. तरीही बहुतांश बाजारात हमीभावापेक्षा कमी दर आहेत. बाजारातील आवक कमी असली तरी मका बाजारात स्टाॅकिस्ट सक्रिय असल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बाजारावर स्टाॅकिस्टची बऱ्यापैकी पकड असल्याचे काही पोल्ट्री उद्योजकांनी सांगितले.

देशातील बाजारात सध्या मक्याला प्रति क्विंटल २ हजार ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्याचा भाव नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहे. बहुतांशी बाजारात दोन हजारांच्या दरम्यान दर आहे. या दरात आयात पडतळ बसत नाही. पण दर वाढल्यानंतर आयात पडतळ बसेल आणि आयात सुरू होऊ शकते. त्यामुळे आयातीचाही दबाव दरावर असेल, असे काही आयातदारांनी सांगितले. पण सध्याच्या दरात फार घट होण्याची शक्यता कमीच आहे. दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात. पुढच्या काळात बाजारातील आवक कमी होईल.

तसेच मागणीही चांगली राहील. त्यामुळे दरात सुधारणा अपेक्षित आहे. पण दर २५०० रुपयांच्या पुढे पोहोचल्यानंतर पुन्हा आयात सुरू होण्याची चिन्हे आहेत, असे अभ्यासकांनी सांगितले. तसेच यंदाच्या खरिपात शेतकरी मक्याची लागवड वाढविण्याची शक्यता आहे. लागवड वाढल्यानंतर पुढे उत्पादन वाढीची शक्यता असल्यास त्याचाही परिणाम दरावर दिसू शकतो. त्यामुळे भावपातळी दीर्घकाळात पुन्हा २३०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावू शकते. काही काळ बाजार २५०० रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, मात्र त्या पातळीवर तो जास्त काळ टिकणार नाही, असा प्राथमिक अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या व्यापार कराराविषयी चर्चा सुरू आहे. भारताने अमेरिकेच्या इथेनाॅल आयातीला परवानगी द्यावी, यासाठी अमेरिका दबाव वाढवत आहे. यासोबतच जीएम सोयाबीन, मका आणि गहू आयातीसाठी अमेरिका आग्रही आहे. पण भारत जीएम पिकांच्या आणि अमेरिकेच्या स्वस्त शेतीमालाच्या आयातीला परवानगी देण्यास विरोध करत आहे. मात्र इथेनाॅलविषयी काही तडजोड होऊ शकते, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास नेमका करार काय होतो, किती इथेनाॅल आयात होणार, दर काय असणार या मुद्यांचा परिणाम मक्याच्या दरावर होऊ शकतो, असे अभ्यासकांनी सांगितले.

देशातील मका उत्पादन

यंदा देशात जवळपास ४२३ लाख टन मका उत्पादन झाले. मागील हंगामातील उत्पादन ३७६ लाख टन होते. २०२२-२३ मधील उत्पादन ३८० लाख टन आणि २०२१-२२ मधील उत्पादन ३३७ लाख टन होते. इतर महत्त्वाच्या पिकांच्या तुलनेत मक्यातून चांगला परतावा मिळत असल्याने शेतकरी मक्याकडे वळत आहेत. देशात मक्याचा वापर वाढत असताना उत्पादनही वाढत आहे. यंदा दरावर परिणाम करणारा हाही एक घटक आहे.

राज्यनिहाय उत्पादन

मध्य प्रदेश - ६७ लाख टन

कर्नाटक - ६१.६३ लाख टन

बिहार - ४९ लाख टन

महाराष्ट्र - ४९ लाख टन

(लेखक ॲग्रोवन डिजिटलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर- मार्केट इन्टेलिजन्स आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

SCROLL FOR NEXT