Soybean Meal Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Meal Export Subsidy : सोया पेंड निर्यात अनुदानातून सोयाबीनला मिळेल का ‘बूस्ट’?

Soybean Update : सोयाबीन दरवाढीसाठी सोया पेंडला निर्यात अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र उपचारानंतर सोयाबीन दर वाढतील याची हमी कोण घेणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्क वाढीचा उपाय निष्फळ ठरला. यातून केवळ प्रक्रिया उद्योजकांचे हित जपले गेले. आता पुन्हा सोयाबीन दरवाढीसाठी सोया पेंडला निर्यात अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र उपचारानंतर सोयाबीन दर वाढतील याची हमी कोण घेणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

वाढता उत्पादकता खर्च लक्षात घेता राज्य कृषी मूल्य आयोगाने प्रति क्‍विंटल ६०३९ रुपये तर प्रति एकर हा खर्च २४,१५६ असल्याचे केंद्र सरकारला कळविले होते. त्यानुसार ६९४५ रुपये प्रति क्‍विंटल इतक्‍या हमीभावाची शिफारस करण्यात आली होती. केंद्र सरकारने त्याऐवजी अवघा ४८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. त्याच वेळी हंगामात सोयाबीन बाजारात येताच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी हमी ऐवजी कमी भावाने व्यापारी करीत आहेत.

अमरावती बाजारात रोज १५ हजार क्‍विंटल इतकी आवक होत ३८०० ते ४००१ रुपये असा अत्यल्प दर मिळत आहे. दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये वाढता रोष लक्षात घेता केंद्र सरकारने उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला. सोयाबीन प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील विविध भागधारकांशी चर्चा करण्यात आली. त्यात खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविल्यास दर वाढतील असे सांगण्यात आले.

त्यानुसार केंद्र सरकारने १४ सप्टेंबर रोजीच्या अधिसूचनेनुसार खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्‍के वाढ केली. आयात शुल्कात वाढीनंतर सोयाबीन दर वाढणे अपेक्षित असताना झाले उलटच प्रक्रिया उद्योजकांनी खाद्यतेलाच्या दरात वाढ केली. सोयाबीन मात्र ३५०० ते ४००० रुपयांवरच कायम राहिले. खाद्यतेल आयात शुल्कात वाढीचा उपाय निष्फळ ठरला. परिणामी, आता अतिरिक्‍त सोया पेंड निर्यातीवर उद्योजकांना अनुदान देण्याची मागणी होत आहे.

देशात ६० लाख टन पोल्ट्री उद्योग तर १० लाख टन इतर उद्योगाची सोया पेंड मागणी आहे. सध्या ७० लाख टन सोया पेंडचा साठा असून तांदूळ आणि मका पेंड २० लाख टन आहे. त्यामुळे ९० लाख टन पेंड साठ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन प्रक्रिया उद्योगासमोर आहे. हा साठा संपल्याशिवाय पुढे प्रक्रिया शक्‍य नाही; असे कारण सांगत सोयाबीन कमी भावात खरेदीवर भर दिला जात आहे. मक्‍यात ५४ ते ५६, सोयाबीनमध्ये ४६ टक्‍के प्रोटीन आहे.

म्हणून हवे अनुदान

अर्जेंटिनाची पेंड ३२ रुपये किलो आहे, तर आपली ४२ रुपये आहे. परंतु नॉनजीएम असल्याने भारतीय पेंडला मागणी असली, तरी दरातील विरोधाभासामुळे खरेदीदार पुढे येत नाहीत. परिणामी निर्यातीवर प्रति किलो दहा रुपयांचे अनुदान दिल्यास सोया पेंडची विल्हेवाट लागत सोयाबीनचे दर वाढतील, असा दावा केला जात आहे. सोया पेंड निर्यात अनुदान, नाफेड खरेदी केंद्र वाढविणे, आर्द्रता १२ वरून १५ टक्‍क्यांपर्यंत गृहीत धरावी, खाद्यतेलावर आयात शुल्क ३५ टक्‍के करावे या उपाययोजना देखील शिफारशीत आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही सांगण्यात आले.

पेंड निर्यातीनंतरही दर वाढीची गॅरंटी काय?

एक क्‍विंटल सोयाबीनपासून १८ किलो तेल, ८२ किलो पेंड मिळते. त्यामुळे पेंड विल्हेवाटीचा प्रश्‍न मोठा आहे. सोया पेंड पडून असल्याने प्रक्रिया उद्योजकांकडून क्रशींग केली जात नाही. देशातील ५५० उद्योजकांकडून एकूण क्षमतेच्या केवळ ४० टक्‍केच क्रशिंग होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पेंड निर्यात झाली तरी दर वाढतील याची गॅरेंटी कोण घेणार असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

...असे आहे दर

मका पेंड : १४ रुपये किलो

तांदूळ पेंड : २२ रुपये किलो

सोयाबीन पेंड : ४२ रुपये किलो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Warehouse Construction : गोदाम उभारणीमध्ये वजन काटा महत्त्वाचा...

Climate Change Organizations : हवामान बदलात महिलांचीच होरपळ अधिक

Silk Farming : सर्वत्र विणले जावे रेशीम जाळे

Agricultural Electricity : सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू : अजित पवार

SCROLL FOR NEXT