Ferrocrete Barrage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : जलक्षेत्रात फेरोक्रिट तंत्रज्ञानाचा व्यापक वापर

Ferrocrete Barrage : मागील दोन भागांमध्ये फेरोक्रिट तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात आपण माहिती घेत आहोत. या भागामध्ये जलक्षेत्रामध्ये त्याचा व्यापक वापर कशा प्रकारे होऊ शकतो, याची माहिती घेऊ.

Team Agrowon

सतीश खाडे

मागील दोन भागांमध्ये फेरोक्रिट तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात आपण माहिती घेत आहोत. या भागामध्ये जलक्षेत्रामध्ये त्याचा व्यापक वापर कशा प्रकारे होऊ शकतो, याची माहिती घेऊ.

गळणाऱ्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी फेरोक्रिट

सदोष बांधकामामुळे बंधाऱ्यांच्या भिंतींना तडे जाऊन पाणी गळती होते. पाणी वाहून जाण्यासोबतच बंधाऱ्याच्या फुटीच्या शक्यता वाढतात. अशा स्थितीमध्ये फेरोक्रिटच्या अगदी छोट्या जाडीच्या भिंतीद्वारे ही गळती थांबवता येते. त्यासाठी बंधाऱ्याच्या भिंतीस पूर्ण लांबीपर्यंत बारीक जाळी (चिकन मेश) लावली जाते.

त्यावर सिमेंट माॅर्टर थापून, त्याची ३ ते ४ इंच जाडीची पडदी वजा भिंत उभी केली जाते. ही भिंत मूळ बंधाऱ्यांच्या भिंतीला अभेद्य बनवते. त्यातून पाणी गळती थांबवता येते. ‘फेरो सिमेंट सोसायटी’ च्या डाॅ. बाळकृष्ण दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘काबऱ्याखडक’ (ता. साक्री, जि. धुळे) गावातील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या दगडी भिंतीवर अशा प्रकारच्या फेरोक्रिट भिंतीची उभारणी केली आहे. त्यामुळे गळतीद्वारे वाया जाणारे कोट्यवधी लिटर वाचवले आहे. याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आठ वर्षांपूर्वी खोपेवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील दगडी बंधाऱ्याची गळती थांबवली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुरुस्तीचे काम अतिशय वेगात आणि कमी खर्चात होते.

जगभरात अनेक देशामध्ये मोठ्या धरणाच्या भिंती ही फेरोक्रीट तंत्रज्ञानाने बांधलेल्या आहेत. अनेक धरणांच्या भिंतींना आधार देणाऱ्या तिरप्या भिंतींना (बट्रेसेस) चारही बाजूंनी फेरोक्रिटचे आवरण दिलेले आहे. त्यामुळे त्यांची व पर्यायाने मूळ धरणाच्या भिंतीची ताकद वाढविण्यास मदत मिळते. या तंत्रज्ञानामुळे धरणाचे आयुष्य कमी खर्चात वाढते.

शहरी किंवा ग्रामीण भागातील दुर्गम ठिकाणी पिण्याच्या किंवा सांडपाण्याच्या वहनासाठी पाइपलाइन टाकणे अनेक कारणांमुळे शक्य होत नाही. अशा ठिकाणी फेरोक्रिटचे अर्ध गोलाकार (पॅराबोलिक) किंवा गरजेनुसार वेगवेगळ्या आकाराचे आणि हव्या तेवढ्या लांबीचे पाइपसदृश बांधकाम करणे या फेरोक्रिट तंत्रज्ञानाने शक्य आहे. हा पर्याय खूप सोयीचा व कमी खर्चिक ठरतो.

कालव्यांचे अस्तरीकरण (कॅनाॅल लायनिंग) ः धरणाच्या कालव्यांची गळती किंवा झिरपा ही बाजूच्या शेतकऱ्यांसाठी फार मोठी समस्या आहे. त्यांची शेतीच कायमस्वरूपी खराब होण्याचा धोका असतो. ही कालव्यांची गळती थांबविण्यासाठी कालव्यांचे अस्तरीकरण फेरोक्रिटचे करता येते. त्यासाठी कमीत कमी मटेरिअल आणि साचे करण्याची गरज नसल्यामुळे बांधकामाचा खर्च तुलनेत खूप कमी राहतो.

पाणी साठवण्यासाठी छोट्या टाक्यांपासून कोट्यवधी लिटरची साठवण क्षमता असणाऱ्या टाक्या फेरोक्रिट तंत्रज्ञानाने बांधता येतात. सेप्टिक टॅंक, डायजेस्टर्सपासून ते मैला व सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोठ्या टाक्याही फेरोक्रिटच्या बनवल्या जातात.

फेरोक्रिटद्वारे जलमंदिरे बांधणारी ‘जलवर्धिनी’

स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मोठ्या धरणांना भारताची आधुनिक तीर्थक्षेत्रे म्हटले होते. पण लहान लहान गावात बांधकामाद्वारे केल्या गेलेल्या जलसाठ्यांना ‘जलमंदिरे’ म्हणता येईल, असे मत उल्हास परांजपे मांडतात. उल्हास परांजपे हे १९७१ ला स्थापत्य अभियंता झाल्यानंतर दहा वर्षे प्राध्यापकी करणारे गृहस्थ. पुढे मुंबईतच बांधकाम व्यवसायात यश मिळवले. वयाच्या ५५ व्या वर्षी स्वतःच्या बांधकाम व्यवसायातून निवृत्ती घेऊन त्यांनी जलसेवेचे व्रत घेतले आहे. या कामाला संस्थात्मक रूप देताना २००३ मध्ये त्यांनी जलवर्धिनी ट्रस्ट स्थापन केला.

आज वयाच्या ७७ व्या वर्षीही सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी फेरोक्रिट तंत्रज्ञानावर आधारीत पाण्याची टाकी (त्यांच्या भाषेत - जलमंदिर) बांधण्यासाठी धडपड सुरू असते. गावातील लोकांना महत्त्व समजावण्यापासून बांधकामासंदर्भात मार्गदर्शन करताना आजही ते मैलोन् मैल चालतात, गावातील एखाद्या मंदिरातच मुक्काम ठोकतात.

महिलांच्या डोक्यावरील हंडा आणि मैलोन् मैल चालणे थांबविण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू असते. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील ४५ तालुके, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये ४५० पेक्षा अधिक फेरोक्रिटच्या पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत. गरजू आणि गरीब वाड्या वस्त्यांसाठी केवळ तांत्रिक ज्ञान देण्यावरच ते थांबत नाहीत, तर विविध संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.

फेरोक्रिट टाकी बांधकामाबाबत मार्गदर्शनाच्या उद्देशाने त्यांनी कर्जत (जि. रायगड), कशेळे, वांगणी, पनवेल, दापोली व रत्नागिरी येथे दिशादर्शन केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्राद्वारे फेरो सिमेंट तंत्रज्ञान व नैसर्गिक धागे वापर करून पाणी साठवणक्षमता निर्माण करण्याचे तंत्रज्ञान साधे अडाणी गवंडी, आयटीआयचे विद्यार्थ्यांपासून सर्व समाजघटकांना शिकवण्याचे काम केले जाते. कारण महाराष्ट्रांतील भूपृष्ठ स्थितीमुळे पावसाळ्यानंतर ३ ते ६ महिन्यांमध्ये पाण्याची कमतरता भासते.

पावसाळ्यातील पाणी साठवण करून त्याचा वापर पिण्यासाठी, घरकामासाठी, जनावरांसाठी व शेतीसाठी कसा करता येईल, यावर त्यांची जलवर्धिनी संस्था प्रयत्न करते. त्यांनी नैसर्गिक धाग्यांच्या वापरातून जमिनीखाली पाणी साठवण टाकी बांधणीचे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत.

या टाक्यांची मजबुतीवर आय. आय. टी. पवई (मुंबई) येथे संशोधन पूर्ण झाले आहे. फेरोक्रिटमधील चिकनमेश ऐवजी नारळाचा काथ्या, किंवा केळीचे धागे वा अंबाडीचे धागे, ज्यूटचे धागे, कुमिया, केवण धागे यांच्या नैसर्गिक धाग्यांच्या वापरातूनही टाक्या बांधणे शक्य असल्याचे ते दाखवून देतात. यातून खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. पण त्यांच्या मजबुती आणि टिकाऊपणाबाबत संशोधन केले जात आहे.

या संस्थेने आजवर ३० पेक्षा अधिक सामाजिक संस्थांपर्यंत तंत्रज्ञान पुरवले आहे. विविध संस्था व ग्रामस्थ यांना तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापन या संदर्भात माहिती देण्यासाठी १०० आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० पेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत.

त्यातील खालील संस्थांनी या प्रशिक्षणानंतर अनेक जलमंदिरे उभारण्याचे काम जोमाने पुढे नेत आहेत.

अ) सेवा सहयोग, मुंबई (आजपर्यंत १०२)

ब) ज्ञान प्रबोधिनी, पुणे (आजपर्यंत ४०)

क) भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान, (भरपूर टाक्या, पण संख्या उपलब्ध नाही.)

ड) वयम् (५० पेक्षा जास्त)

इ) रोटरी क्लब ऑफ भोर (४५ पेक्षा जास्त)

ई) रिलायन्स फाउंडेशन या संस्थेच्या जकोट, भरूच, मध्य प्रदेश आणि रुद्रप्रयाग येथील शाखांना हे तंत्रज्ञान शिकवले. त्यानंतर त्यांनी राजकोट व उत्तराखंड येथे १०० पेक्षा जास्त जलकुंभ बांधले गेले आहेत.

फ) दीनदयाळ संस्थेच्या कृषी संशोधन केंद्र, अंबाजोगाई यांनी १० पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत.

फेरोक्रिट तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यरत महारथी

प्रा. डॉ. बाळकृष्ण दिवेकर हे फेरोक्रिट तंत्रज्ञानाचा सर्वांगीण वापरासाठी प्रसिद्धच आहे. या विषयामध्ये काम करणारे देशोदेशीच्या फेरोक्रिट तंत्रज्ञानाचे ‘पितामह’ मानतात. वेगवेगळ्या कामे किंवा अडचणीसंदर्भात हक्काने सल्ला घेतात. कारण त्यांनी या तंत्रज्ञानावर काही पुस्तके लिहिली आहेत. तसेच ‘फेरोक्रिट स्ट्रक्चरल डिझाइन’ बाबत नवनवीन सूत्रे विकसित केली आहेत.

त्यांच्या नेतृत्वात फेरोसिमेंट सोसायटीने महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागासाठी तयार केलेले ‘मॅन्युअल’ हे जलसंपदा खात्यातील अनेक प्रकारच्या बांधकामासाठी अतिशय उपयुक्त दस्तऐवज ठरत आहे.

डाॅ. दिवेकर हे पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यापासूनच फेरोक्रिटसंबंधी अभ्यास व संशोधन सुरू केले होते. गेली साठ वर्षे या विषयात काम करताना त्यांनी भरपूर प्रयोग, संशोधन केले आहे. अगदी अशक्य वाटतील अशा रचनेच्या इमारती किंवा बांधकामे, बंधारे फेरो सिमेंट प्रत्यक्षात आणल्या आहेत. ही त्यांच्या आरेखनाचीच कमाल आहे.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT