Water Conservation : सह्याद्रीतील महिलांचे कष्ट कमी करणारे ‘कुंड प्रकल्प’

Agriculture Irrigation : जलसंधारणाच्या कामांमध्ये बांधल्या जाणाऱ्या सिमेंट बंधाऱ्याच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात फेरोक्रिट बंधारा बांधता येतो. त्याचेही अन्य फायदेही बरेच आहेत. अशा स्थितीमध्ये आपण फेरोक्रिट बंधाऱ्याकडे वळण्याची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
Water Tank
Water TankAgrowon
Published on
Updated on

Water Conservation Project : सह्याद्री पर्वत रांगेत अडीच हजार ते तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्या पावसावर महाराष्ट्रातील २३ मोठी धरणे आणि अगणित छोटे मोठे तलावही भरतात. या सर्व पाणीसाठ्यावर सात आठ जिल्ह्यातील जमिनी बारमाही भिजतात. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना पुरवला जाणारा ६० ते ७० टक्के ऊस याच पाण्यावर पिकवला जातो.

अनेक लहान-मोठ्या गावांची, शहरांची पिण्याची व वापराच्या पाण्याची गरज याच पाणीसाठ्यातून भागवली जाते. महाराष्ट्रातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक कारखान्यांना हेच पाणी मिळते. म्हणजेच सह्याद्रीतून उगम पावलेल्या नद्या महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारताची शेती, कारखानदारी आणि सर्वच अर्थकारण समृद्ध करतात.

त्यामुळे या नद्यांना आर्थिक रक्तवाहिन्या म्हटले जाते. हे सारे खरे असले तरी प्रत्यक्षात जिथे हा पाऊस पडतो, त्या सर्व सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या गावांमध्ये डिसेंबर - जानेवारीपासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष सुरू होते. याचे कारण म्हणजे सह्याद्रीचा खडक! तो सगळा ‘कॉम्पॅक्ट बेसॉल्ट’ या नावाने ओळखला जाणारा घट्ट कातळ आहे.

त्यात सच्छिद्रता आणि भेगा नाहीत. परिणामी, इतका मोठा पाऊस पडूनही सगळा वाहून जातो. खडकात त्याला जिरण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे खरीपानंतर रब्बी पीक सोडाच, पण चक्क पिण्याच्या पाण्याचेही हाल सुरू होतात. आपण विकासाच्या कितीही गप्पा मारत असलो तरी आजही या महिलांना पाण्यासाठी सहा ते सात महीने पायपीट करावी लागते.

Water Tank
Water Conservation : जलसंधारणातून समृद्धीकडे वाटचाल

डोंगराच्या चढावर किंवा दऱ्यांमध्ये असलेले पाण्याचे लहानसे झरे धुंडाळत पाणी भरावे लागते. असे झरे कमी अधिक बाराही महिने वाहत असतात. त्यामुळे त्या वाडी, वस्तीसाठी पाण्याचा तो शाश्‍वत स्रोत ठरतो. हे झरे म्हणजे खरेतर जलधराचा (Aquifer) डिस्चार्ज झोन किंवा पाॅइंट. त्याला येणारी पाण्याची बारीकशी धार वाटी, ग्लास, तांब्याने हंड्यामध्ये भरायची. असे वाटी वाटीने पाणी भरायला किती वेळ लागेल, याचा अंदाज कुणाला घेता येईल.

पुन्हा हे झरे गावापासून किंवा घरापासून सरासरी अर्धा ते चार किलोमीटर अंतरावर एकतर चढावर किंवा दरीत असल्याने तिथपर्यंत जाणे - येणे कष्टदायक आणि वेळखाऊ असते. म्हणजे एखादा हंडा भरण्यासाठी या महिलांचा तीन ते चार तासांचा वेळ वाया जातो. वर वर साधी दिसणारी ही समस्या अनेक गंभीर सामाजिक प्रश्‍नांना जन्म देते.

या पाणी समस्येचे सामाजिक परिणाम

पाणी भरण्याचे काम महिलांनाच करावे लागते. दूरपर्यंत डोंगर दऱ्यांच्या खाच खळग्यातून चढावर व उतारावर वजन घेऊन चालावे लागल्यामुळे गुडघे आणि पाय यावर ताण येऊन आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. वयस्कर झाल्यावर तर पाणी भरणेही अशक्य होऊन बसते.

पाणी भरण्यातच दिवसाचा अधिक वेळ खर्च होतो. घरातील, शेतातील कामांचा ताण असतोच. इतरत्र मजुरीवर जाणे शक्य होत नसल्याने रोजगार किंवा अर्थार्जन बुडते. दारिद्र्यात भरच पडत राहते.

आजारपण किंवा कोणत्याही अन्य कारणांमुळे मुख्य स्त्री पाणी भरता आले नाही, तर त्याचा ताण घरातील मुलींवर येतो. अनेक वेळा त्यांना शाळा बुडवावी लागते. या खेड्यापाड्यातील शाळेतील मुलींच्या गळतीमागे हे प्रमुख कारण दिसते. घरात मुलगी नसल्यास हेच काम मुलावर येऊन तीही शाळेपासून वंचित राहतात. शाळा व शिक्षणाविषयी अनास्था निर्माण होत जाते.

Water Tank
Water Conservation : मंत्र छोटा, तंत्र सोपे तरी त्याचे यश मोठे!

गावात पाणी, शेती, रोजगार या सर्वांचाच अभाव होतो. परिणामी, १६-१७ वर्षांपुढील तरुण मंडळी रोजगारासाठी शहराची वाट धरतात. गावात वृद्ध किंवा आजारी लोकांचीच संख्या खूप राहिल्याने गावाचेही एकूणच अर्थकारण बिघडते किंवा केवळ शहरावर अवलंबून राहते.

पाणी भरण्यात मुलीचे आयुष्य जाणार असेल तर कोणताही मुलीचा बाप आपल्या मुलीचे लग्न अशा गावात का लावेल? परिणामी गावातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न उभा राहतो.

अनेक सामाजिक समस्यांच्या मुळाशी असलेल्या आणि सोप्या वाटणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी काय करता येईल. याचा सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांद्वारे विचार सुरू झाला. त्यातून पुढे आला ‘कुंड प्रकल्प’. कुंड म्हणजे पाण्याची टाकी. जिथे डोंगरात नैसर्गिक झरे वाहत असतात, तिथे फेरोसिमेंटची छोटी बंदिस्त टाकी तयार करायची.

ही टाकी आकाराने छोटी चालते. कारण त्यात गोळा होणारे पाणी वस्तीजवळील मोठ्या साठवण टाकीमध्ये पाइपलाइनने आणले जाते. ही लोक वस्तीजवळची टाकी तयार करताना त्या वाडी वस्तीच्या लोकसंख्येला आवश्यक पाण्यापेक्षा जास्त क्षमतेची असावी. पाणी गुरुत्वाकर्षणामुळे मोठ्या टाकीत येत असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र पंप किंवा विजेची गरज लागत नाही. लोकवस्तीजवळच्या टाकीला नळ कोंडाळे जोडले जाते.

रोटरी क्लबने उभे केले ४५ कुंड प्रकल्प

पुणे जिल्ह्यातल्या काही रोटरी क्लबने गेल्या सहा, सात वर्षांपासून ४५ पेक्षा अधिक गावात असे कुंड प्रकल्प उभे केले आहेत. यात रोटरी क्लब फेरोसिमेंट टाक्यासाठी चिकन मेश, सिमेंट, खडी, वाळू व पाइप यासाठी आर्थिक साह्य किंवा वस्तू पुरवतात. टाक्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक सर्व मनुष्यबळ गावातील आबाल वृद्ध श्रमदानातून पुरवतात. टाक्याच्या निर्मितीसाठी आवश्यक ते तांत्रिक साह्य मुंबई येथील जलवर्धिनी संस्थेद्वारे पुरवले जाते.

अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि गावातील लोकांच्या श्रमदानातून उभ्या राहिलेल्या प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात आपोआपच आत्मियता राहते. ते त्याची दीर्घकाळ देखभाल करतात. काळजी घेतात. गावकऱ्यांच्या श्रमदानामुळे मजुरीवरील खर्चात (एकूण प्रकल्प खर्चाच्या साधारण ३५ टक्के इतकी) बचत होते. अशा प्रकारे काम केल्यामुळे एका गावच्या कुंड प्रकल्पाला सरासरी तीन लाख रुपये इतकाच खर्च आला. (यात मजुरीचे एक ते सव्वा लाख रुपये धरलेले नाहीत.)

या प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी गावातच, घराजवळ उपलब्ध होऊ शकले. त्यामुळे केवळ पिण्याचे पाणी भरण्याचीच समस्याच सुटली नाही, तर अनेक संभाव्य गंभीर सामाजिक समस्या दूर राहण्यास मदत होते. याच प्रकारे डोंगराळ व दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे सहज शक्य आहे. केवळ पिण्याचे पाणी भरण्याचा वेळ व कष्ट वाचल्याने व्यक्तिगत व सामूहिक अर्थकारणावरही मोठा फरक पडतो. त्याची साधारण चौकटीत दिली आहे.

पुढाकारासह आर्थिक योगदान : रोटरी क्लब ऑफ पुणे चे अमानोरा, सिंहगड रोड, गांधी भवन, शनिवारवाडा, वेस्ट, एन आय बी.एम., युनिव्हर्सिटी, सारसबाग, बाणेर, भोर राजगड येथील विविध शाखा.

तांत्रिक साह्य ः कुंड प्रकल्पातील सर्व फेरोक्रिट टाक्या उभारणीचे तंत्रज्ञान मुंबई येथील ‘जलवर्धिनी’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उल्हास परांजपे यांनी दिले. बहुतांशी टाक्या त्यांनी स्वतः उभे राहून तयार करून घेतल्या. ही संस्था आणि तिचे संस्थापक उल्हास परांजपे यांच्याविषयी अधिक माहिती लेखात घेऊ.

एकूण अर्थकारण

  • पिण्याचे पाणी घराजवळ उपलब्ध करण्यामुळे व्यक्तिगत, सामाजिक (राष्ट्राच्या) उत्पन्नात पडणारी भर

  • एका गावासाठी (वाडी/ वस्ती) गुंतवणूक : ३.५ लाख रुपये.

  • वस्तीवरील लाभधारक कुटूंब संख्या ५० = घरटी पाच माणसे याप्रमाणे लोकसंख्या २५०

  • एक वेळची गुंतवणूक = रु. १४०० प्रति व्यक्ती.

  • (महिलांना पाणी भरावे लागते म्हणून.)

  • वेळ वाचल्याने मजुरीतून महिलांना मिळू शकणारी रक्कम ः रु. ३००/- प्रति दिन

  • गावातील ५० महिलांची एकूण रक्कम = १५००० प्रति दिन.

  • ५० महिलांची वर्षातील १५० दिवसांची रक्कम धरल्यास = २२ लाख ५० हजार रुपये.

  • एका महिलेची पाणी भरण्यासाठीची पायपीट = सरासरी (जाऊन येऊन) = ३ कि.मी. प्रति दिन

  • फेब्रुवारी ते जूनपर्यंतचे दिवस -१५०

  • एका महिलेची एकूण पायपीट -४५० कि.मी.

  • एका वस्तीतील ५० महिलांची एकूण पायपीट = १५० कि.मी./ दिन

  • ५० महिलांची सहा महिन्यांची पायपीट = २२,५०० कि.मी.

  • रोटरी इंटरनॅशनल च्या पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हे तालुक्यात आजवर ४५ गावांत केलेल्या कुंड प्रकल्पामुळे वाचलेली पायपीट.

  • ४५ वस्तीवरील एकूण महिला - २२५०

  • त्यांची वाचलेली पायपीट = ६७५० कि.मी. प्रति दिन.

  • १५० दिवसांची पायपीट = १० लाख १२ हजार ५०० कि.मी.

  • या काळात त्यांनी केलेल्या कामातून मिळू शकणारी मजुरी

  • १५० दिवसांची मजुरी = १० कोटी १२ लाख रुपये.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com