Agricultural Market Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Market : शेतीमाल वायदे बाजाराचे सरकारला वावडे का?

Future Trading : तीन वर्षांपूर्वी सात शेतीमालांच्या वायद्यांवर घातलेल्या बंदीची मुदत २० डिसेंबरला संपणार होती. पण त्याधीच सरकारने ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम ठेवण्याची अधिसूचना काढली. सोयाबीनसह बहुतांशी शेतीमालाचे भाव पडले आहेत.

Team Agrowon

Pune News : तीन वर्षांपूर्वी सात शेतीमालांच्या वायद्यांवर घातलेल्या बंदीची मुदत २० डिसेंबरला संपणार होती. पण त्याधीच सरकारने ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम ठेवण्याची अधिसूचना काढली. सोयाबीनसह बहुतांशी शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे वायदे सुरू करण्याची गरज आहे. सरकार एकीकडे मात्र बाजार सुधारणांच्या गप्पा करते आणि दुसरीकडे वायदे बाजार चालू देत नाही, अशी टीका शेतकरी करीत आहेत.

सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये सात शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली होती. यात सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, मोहरीसह मोहरीतेल आणि मोहरीपेंड, कच्चे पाम तेल, हरभरा, गहू, बिगर बासमती तांदूळ तसेच मुगाचा समावेश होता. सरकारने यापूर्वी २ वेळा मुदतवाढ दिल्यानंतर २० डिसेंबरला वायदेबंदीची मुदत संपत होती.

विशेष म्हणजे, वायद्यांमुळे शेतीमालाच्या भावात अवास्तव भाववाढ होते, असे कारण देत सरकारने वायदेबंदी केली होती. पण मागील तीन वर्षांत वायदेबंदी असतानाही अनेक शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेही आणि पडलेही. सध्या सोयाबीन, हरभरा, मूग, मोहरी या शेतीमालांचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सरकार २० डिसेंबरला या शेतीमालाचे वायदे सुरू करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सेक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने बुधवारी (ता.१८) रात्री अधिसूचना काढत या शेतीमालाच्या वायद्यांवरील बंदी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत कायम ठेवली आहे.

शेतकऱ्यांना बाजारातील संधी मिळाव्यात, सर्व बाजार प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, शेतीमाल बाजारात पारदर्शकता असावी आणि शेतकऱ्यांना किमतीची माहिती मिळावी, यासाठी सरकार बाजार सुधारणांचा घाट घालत आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या वायदे बाजारातून शेतीमाल बाहेर ठेवत आहे. वायदे बाजारामुळे व्यवहारात पारदर्शकता, किमतीची माहिती आणि जोखीम व्यवस्थापन शक्य होते. पण सरकार या बाजारावर गदा आणत आहे, अशी टीका शेतकरी करत आहेत.

बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी कायद्याने हमीभावाची मागणी करत आहेत. सरकार त्यावर बाजार सुधारणांचा उतारा देत आहे. पण दुसरीकडे सरकार वायदेबाजारापासून शेतीमालाला दूर ठेवण्याचा घाट घालते. यातूनच केंद्र सरकार शेतकरी आणि शेतीविषयी काय मानसिकता बाळगून आहे हे स्पष्ट होते. सरकारने आधी वायदेबंदी तातडीने मागे घ्यावी आणि चीनप्रमाणे सर्व शेतीमालाचे वायदे सुरू करावेत आणि नंतरच बाजार सुधारणांच्या गप्पा माराव्यात.
रविकांत तुपकर, शेतकरी नेते
वायदेबंदी शेती आणि व्यापाराला नुकसानकारक आहे. आज वायदे बाजार सुरू झाले असते हरभरा उत्पादकांना फायदा झाला असता. शेतीमाल वायदे बाजारबाबत सरकारने दीर्घकालीन धोरण जाहीर करणे आवश्यक आहे. धरसोडीचे धोरण देशाला हानिकारक ठरते आहे. सेबीची जबाबदारी वायदेबाजाराला प्रोत्साहन देण्याची आहे, मात्र सेबी त्याच्या विरुद्ध वागत आहे. सेबी ही स्वायत्त संस्था नसून सरकारच्या हातचे बाहुले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांचे भले व्हावे यासाठी घेत आहोत, असे सरकार सांगते. आताही सर्व वायदेबंदीची मुदत यासाठीच वाढवली असेल तर मागील ३ वर्षांत वायदेबंदीमुळे शेतकऱ्यांना किती फायदा झाला, हे सरकारने सांगावे. सरकार केवळ शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे.
अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा
वायदा बाजार शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनी यासाठी खूप आवश्यक आहे, जसे की भविष्यातील किमतीचा वेध आणि सध्याच्या बाजाराचा किमतीचा रोख समजण्यासाठी तसेच धान्य विकण्यासाठी आवश्यक असलेली स्पर्धा यातून निर्माण होते आणि शेतकऱ्यांना योग्य भाव भेटतो. वायदा बाजारातील पूट ऑप्शनमुळे मालाच्या भविष्यातील किमतीची हमी भेटते.
चंद्रशेखर माने, संचालक, मन्याड रिव्हर अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत

Tuti Cultivation: सांगली जिल्ह्यात ‘महारेशीम’ची ९७ एकरांवर तुती लागवड

Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम 

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

SCROLL FOR NEXT