Sugarcane Cultivatation : सध्या बरेच शेतकरी पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यात व्यस्त आहेत. सुरुवातीच्या काळात उसाची वाढ हळू - हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी पुरेशी मोकळी जागा असते.
या मोकळ्या जागेत बटाटा लागवड फायदेशिर ठरते. उसामध्ये आंतरपीक म्हणून बटाटा लागवड कशी करायची आणि बटाटा लागवडीचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
ऊस लावल्यानंतर उगवण पूर्ण होण्यास ३ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर फुटवे फुटण्यास सुरुवात होते. फुटव्यांची पूर्ण वाढ होण्यासाठी आणि संपूर्ण रिकामे क्षेत्र झाकण्यासाठी ३ ते ४ महिने लागतात. फुटव्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोन सरींतील जागा रिकामी राहाते.
आंतरपिकासाठी ऊस लागवड ५ फुटांपेक्षा जास्त अंतरावर केल्यास मधल्या रिकाम्या जागेत आंतरपीक घेण फायदेशीर आहे. दोन सऱ्यांमध्ये असलेली ७० टक्के रिकामी जागा, जमिनीतील ओलावा आणि दीर्घकाळ मिळणारा सूर्यप्रकाश या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ घेण्यासाठी आंतरपीक घेण शक्य आहे.
आंतरपीक म्हणून बटाट्याची लागवड कशी करावी?
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. पूर्वहंगामी उसाचा कालावधी १५ महिन्यांचा असतो. उसाची लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात केली असल्यास बटाट्याची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
बटाट्याचे हेक्टरी २० क्विंटल बेणे लागत. उसाच्या सरीतील अंतर साडेचार ते पाच फूट आणि बटाट्याच्या दोन डोळ्यांतील अंतर १५ सेंटीमीटर ठेवावे.
लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी ६ ते ७ आठवडे लागतात. उसामध्ये बटाटा घेताना एकास एक या प्रमाणात घ्यावा. सुरुवातीच्या काळात उसाची वाढ हळू - हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी पुरेशी मोकळी जागा असते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च बटाटा आंतरपिकाच्या माध्यमातून निघून जातो. आंतरपीक घेतल्याने तणांचा नैसर्गिक बंदोबस्त होऊन प्रमाण कमी होत.
या पद्धतीमध्ये पहिल्यांदा तिफणीने १५० सेंटीमीटर अंतरावर उथळ सऱ्या पाडाव्यात. यामध्ये खते टाकून बटाटा बेण्याची लागवड करावी किंवा बटाटा पेरणी यंत्राने लागवड करावी. नंतर त्यामधील अंतरात उसासाठी सरी पाडावी म्हणजे बटाटा बेणे आपोआप झाकले जाईल. पडलेल्या सरीमध्ये उसासाठी खते देऊन कोरडी लागण करून पाणी द्यावे. अशाप्रकारे बटाट्याचे आंतरपीक घेता येईल.
बटाटा काढणीनंतरचे व्यवस्थापन
लागवडीपासून तीन महिन्यांमध्ये बटाटा काढणीस तयार होतो. एक महिन्यानंतर उसाला मातीची भर द्यावी लागते. त्यापुर्वी रासायनिक खतांची राहिलेली मात्रा सरीत द्यावी. त्यानंतर वरंब्यातून बैलचलीत नांगर किंवा छोट्या ट्रॅक्टरचा रिजर चालवावा. अशाने बटाटा पिकाची काढणी होऊन उसाला मातीची भर दिली जाते.
रिजर चालविताना जमिनीतून बाहेर पडलेले बटाटे वेचून घ्यावेत. उसाकरिता चांगली सरी तयार होण्याकरिता पुन्हा एकदा त्याच सरीतून रिजर चालवावा म्हणजे जमिनीत शिल्लक राहिलेले बटाटेही निघून येतील. उसाला भरपूर भर लागेल. उसाची बांधणी करून लगेच पाणी द्यावे.
बटाटा लागवडीचे फायदे
बटाटा हे आंतरपीक पूर्वहंगामी उसात घेतल्यान फुटव्यांची जोमदार वाढ होते. बटाटा पिकाला जास्त पाणी मानवत नाही. उसाला पाणी देताना आपोआप भिजलेल्या वरंब्यावर तीन महिने इतक्या कमी दिवसात बटाट्याचे आंतरपीक भरघोस उत्पादन देत.
तणांची वाढ रोखली जाते आणि तणांच प्रमाणही कमी होत. जमिनीची सुपीकता वाढते याशिवाय सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात वाढ होते. आंतरपिकामुळे जमीन, पाणी, खते व सूर्यप्रकाशाचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो. साखर उताराही वाढतो.
माहिती आणि संशोधन - मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.