Wedding : 'बर का कुणाला सांगू नकु' वाक्य म्हणाल्याशिवाय नामदेव पाव्हण्याची गाडी पुढं धकायची नाही. म्हणजे विषय काही असू देत 'बर का कुणाला सांगू नकु' ते म्हणायचे. नामदेवराव बाईच्या नात्यातला होता. लग्नकार्यात त्याचं नटूनथटून काळा चष्मा डोळ्यावर लावून हजेरी लावणं अज्जिबात चुकायचं नाही.
त्यात त्यांच्या झुपकेदार मिशा आणि दोन्ही भुवयाच्या मधोमध लावलेला अष्टीगंध बघणाऱ्याच्या नजरेत ठळक व्हायचा. शरीरही पिळदार. डोळे जास्तच बारीक. बारीक डोळ्यांचा त्यांना न्यूनगंड असावा म्हणून ते मुद्दाम काळा चष्मा डोळ्यावर चढवून ठेवत असावेत, असं सुन्याला वाटायचं.
त्यांचं लांब आणि रुंद नाक चेहऱ्याकडे पाहिल्यावर लगेच उमटून पडायचं. फिकट गव्हाळ रंग डोळ्यात भरून राहायचा. बडबड करणं कायम सुरू असायचं.
त्यातल्या अर्ध्याहूनधिक गोष्टी तर नुसत्या भपाऱ्या असाव्यात, त्या ऐकणाऱ्याच्या चटकन ध्यानात आल्याशिवाय राहायच्या नाहीत. त्यांच्या बोलण्यातून कायम अहमपणाचा दर्प दरवळत राहायचा. छकुलीच्या लग्नातही ते आलेले.
सुन्या माणसांना मोजपट्टी लावून तोलत राहायचा. नामदेव पाव्हण्याला त्यानं तसंच तोललं होतं. त्यांनी मात्र सुन्याला ओळखलं नव्हतं. त्याच्यापासून दीड हात अंतरावर तो बसलेला होता. आजूबाजूला माणसं गलका करत होती. आता उन्हाच्या झळा मंडपातून चळचळ करत पळत्या होत्या.
त्यात वावटळ उठली की, लग्न मंडपात धुळीचे लोट येऊ लागले. नामदेव पाव्हाण्यानं अक्षतावाल्याला अत्यंत अरेरावीच्या भाषेत ऑर्डर सोडली होती.
"आरं अय अक्षदावाल्या तिकडं कुठं वर थुत्तर घेऊन चाललास. आणेव हिकडं. कव्हाची वाट पाहत बसलं माणूस!" म्हणत हातातला रुमाल मांडीवर ठेवत मानेला हिसका मारला. तसं अक्षतावाल्या पोरानी ताव हाणत नामदेव पाव्हण्याच्या हातात बचकभर अक्षता टाकली. नामदेव पाव्हाण्यानं त्यावर "आरं दमानं! कुत्रं मागं लागल्यागत काऊन करायलास." असं हिणकस वाक्य फेकून झालं.
पोरगा तोवर बचकभर अक्षता हातावर टाकून पुढं निघून गेला. नामदेव पाव्हाण्याच्या शेजारी बसलेला पुरुष थोडासा थकलेला दिसत होता. त्यांच्या ओळखीचा असावा, असा अंदाज त्यांच्या बोलण्यावरून सुन्याला आला. अक्षता वाटणाऱ्या पोरानी सुन्याच्याही हातात अक्षता दिलेली.
त्याला कुंकू घोळसलेलं. कडक झळामुळे हात घामाने ओलसर झाले होते. तांदळाचा लालसर रंग हातावर पसरला. तो रंग पाहून क्षणभर स्वप्नातलं नदीचं लालसर पाणी त्याला आठवलं. एका हातावरून दुसऱ्या हातावर अक्षता घेत त्यानं नामदेव पाव्हण्याच्या बोलण्याकडे लक्ष वळवलं.
नामदेवराव त्या पुरुषाला दबक्या आवाजात बोलत होते. नामदेवरावचं बोलणं खोचक होतं. बोलता बोलता अधूनमधून ते स्वतःच हसत. ते पाहून सुन्या थोडंस पुढं सारून बसला. त्याला आता त्यांचं बोलणं अधिक स्पष्टपणे ऐकायला येऊ लागलं.
नामदेव पाव्हणा त्या पुरुषाला बोलत होता. "पण काई म्हणा, तुम्हच्यात पोरींची लग्न लई पटकन होत्यात. त्येव नाई का धनगराच्या दगडूचा पोरगा. गेला की तुम्हच्यातल्या एकीचा हात धरून. तुम्हच्यातल्या पोरीच बारूळ्या."
तसा त्या पुरुषाचा चेहरा सर्रकन उतरला. पण पुढच्या वाक्यात त्या पुरुषानं सावरत नामदेववर बाण सोडला. "नामाबाऊ आता कुठं जातीबीती पाळतेत लोकं. तुम्हचं कोतवालाच्या सुरेखाबायशी चाललेलं समद्या गावाला माहितीय. आमी कव्हा शब्द तरी काढलाय का? नाइ ना! झाकली मूठ लाखाची."
तसा नामदेव पाव्हण्यानं गपकन त्या पुरुषाचा हात धरत विषय थांबवला. आणि आजूबाजूला पाहत म्हणले, 'जीबीला जरा आवर घालीत जावा, मडपात असले इशय बोलायचे असतेत का कुठं!' तो अनोळखी पुरुषही नामदेव पाव्हण्याकडे पाहून "लहान तोंडी मोठा घास होइन. पण यातलं खोटं काही असंन त मारूतीची आण. हाय काई खोटं?" त्यावर नामदेव पाव्हणा म्हणाला,
"आम्हचं कसं जरासं येगळंय. आम्ही घरच्या अन् भायरच्या दोनी स्टेशनकड सेम लक्ष देत असतो. दोनी एकदाच खुश." "तरीई हाय का नाई? आम्हची गेली नाक हाणून, तेचं दुकचंय. पण तुम्हचं तरी कुठं नीटय?" तशी दोघांनी एकमेकांना हसत टाळी दिली.
त्या पुरुषानं मुद्द्याला थेट हात घातल्यावर नामदेव पाव्हण्यातला आत्तापर्यंत खळखळत वाहणारा मोकळेपणा आक्रसून गेला. त्यांच्या दोघांची भाषा आता कोड्याची झाली. बाकीच्यांना फार काही अंदाज येणार नाही अशा पध्दतीने बोलणं सुरूच होतं.
सुन्यानं मात्र त्यांच्या बोलण्याचा स्वतःच्या परीनं अर्थ लावून घेतला. दुसऱ्या जातीतल्या बाईशी असलेल्या विवाहबाह्य संबंधावर विषय आल्याची गोष्ट सुन्याच्या लक्षात आली. पुढच्या वाक्याला दोघांचा विषय उन्हाळ झळावर आला. सुन्या मागं बसून सगळं ऐकत होता.
विषय अचानक बदलल्यामुळं त्याच्या चवताळलेल्या उत्सुकतेवर उन्हानं पाणी फेरलं होतं. आणि त्यांचं बोलणं थांबलेलं पाहून सुन्यानं पुन्हा नजर इकडं तिकडं फिरवत मंडप न्याहाळला. डीजे बंद होऊन बराच वेळ झालेला. काहीजण लग्नाची घाई करत होते. डीजेपासून हाताला धरून ओढत घेऊन जाणाऱ्या पोरासोबत केशव नाईटी हाणून परत आलेला.
पिऊन आल्यावर मात्र सुन्यान त्याच्यापासून अंतर राखलेलं. म्हणून तो मंडपात लग्न कधी लागतं, याची वाट पाहत बसलेला होता. भूकही लागलेली. सरबत वाटप करणारी दोन तीन शहाणी पोरं स्टीलची बादली घेऊन फिरत होते.
सुन्याला वाटलं, एखादं ग्लास सरबत प्यायलो की, भुकेवर जरासा ताबा मिळवता येईल. म्हणून त्यानं हातातला अक्षता पॅन्टच्या खिशात टाकला. हात झटकत जागेवरून उठला आणि सरबत वाटणाऱ्या पोरांकडे जाऊन सरबत पिऊ लागला.
तेवढ्यात बाईनं आवाज दिला. सुन्यानं गटागटा सरबत पोटात रिचलं. आणि बाईकडे गेला. बाईनं एकदोन जणांशी त्याची ओळख करून दिलेली. बाई ओळख करून देताना औरंगाबादला असतो, असं जोर देऊन सांगत होती.
पुढं तिनं कलेक्टरच्या परिक्षेचा अभ्यास करतो असं ठोकून दिलं. ते ऐकून सुन्या संकोचला. त्याला अचानक कवटाळून गेल्यासारखं वाटलं. नात्यातल्या ओळखी करून झाल्यावर बाईनं भूक लागली का वगैरे चौकशी करत गड्याच्या पंगती आधी बसतील तेव्हा पहिल्या पंगतीत जेवण करून घ्यायला सांगितलं.
आपण पोरीकडचे असलो तरी बाई ज्या काळजीनं सांगत होती ते पाहून त्याला जरासं बरं वाटलं. आणि तो पुन्हा मंडपातल्या आधीच्याच जागेवर जाऊन बसला.
अजूनही डीजेच्या लहरी त्याच्या कानात घुमत होत्या. लग्न मंडपात डाव्या बाजूला पुरुष आणि उजव्या बाजूला स्त्रिया बसलेल्या. लाऊडस्पीकरवर कसलं तरी पिपाणीचं वाद्य वाजत होतं. या मोक्कार उन्हाळ वातावरणाला ते जराही जुळत नव्हतं.
कदाचित साउंड सिस्टमवाल्याकड याशिवाय दुसरं काही लावण्यासारखं नसावं. आता मंडपात माणसांची रेलचेल वाढली. अधूनमधून तो बायका बसलेल्या बाजूला टाइमपास म्हणून नजरेने चोरून पोरी शोधत होता. एकदोन जणी नटूनथटून आलेल्या. आपण पोरींकडे पाहतोय, याची भनक कुणाला लागू नये, याचीही तो काळजी घेत होता.
मंडपात आल्यावर सुरेशरावशी एकदोनदा नजरानजर झालेली. तेव्हा त्यानं नुसतं स्मित करत आपण आलो आहोत, याची नोंद त्याला करून दिलेली. लग्नात अशा कित्येक गोष्टी विनाकारण कराव्या लागतात.
सुरेशनं पोरीच्या लग्नात हुंडा भरपूर दिलेला. त्याचीही चर्चा मागची दोन तीन पुरुष करत होते. पण सुन्याला त्यात रस नव्हता. धुमधडाक्यात होणारी लग्नचं मुळात भिकारचोट असतात. त्यातल्या त्यात गावकी अन् भावकीची जिरवाण्याचा माज असतो. म्हणून अव्वाच्या सव्वा हुंडा देऊन पोरी पोरांना विकल्या जातात.
लग्नाच्या नावाखाली सरळसरळ पोरी पोरांना विकण्याचा धंदा केला जातो. जगातल्या कुठल्याही व्यवसायात खरेदीदार पैसे मोजतो. पण इथं मात्र खरेदीदाराचे पाय धुवून पोरीचे मायबाप त्यांनाच आदरानं जिंदगीतली कमाई सहज देऊन मोकळे होतात.
आणि त्याला वरून कन्यादान वगैरे म्हणतात. या भिकारपणाची लाज वाटण्याऐवजी उलट त्याला मिरवलं जातं. छकुलीच्या लग्नाच्या वेळी आलेल्या अनुभवावरून त्याच्या मनात या विचारांनी पाय पसरले होते. हुंडा द्यायला दीड एकर जमीन विकावी लागलेली.
बरं एवढं करूनही तिला दुसाड्या नवरा मिळाला. पहिल्या बायकोनं फारकत घेतलेली, त्याचा विषय लग्न होईपर्यंत कुणालाच माहीत नव्हता. सुरेशरावांना माहीत होतं. सुरेशनेच स्थळ आणलेलं. मुलगा बँकेत नोकरी करतो, एवढंच सांगितलेलं. त्यावरच बाई-दादा भाळले.
त्यांनी परस्पर स्थळ पसंत असल्याचं कळवलं. छकुलीला त्याचा काहीच पत्ता नव्हता. पण मायबाप आपलं भलंच करतील, या विश्वासानं तिनं त्या स्थळाला होकार दिला. पोरगं नोकरी करतो म्हणून शेतजमीन विकून सहा लाख हुंडा दिलेला. लग्नही गडबडीत उरकलं.
का तर छकुली दिसायला काळीसावळी होती. म्हणजे दिसायला दादांवर गेलेली. त्यामुळं बाईला सारखी काळजी वाटायची. छकुलीनं दहावीनंतर कसंबसं बारावीचं शिक्षण पूर्ण केलेलं. तिला मार्क्स चांगले मिळालेले. बारावीनंतर दादाला सुन्यानं लई वेळेस सांगितलेलं. तिलाही पाठवा औरंगाबादला माझ्यासोबत. पण दादा म्हणायचे, पोरीनी शिकून काय उपयोग.
शेवटी तिला दुसऱ्याच्या घरीच जावं लागणार. त्यावेळी सुन्याला काहीच बोलता आलं नाही. लग्नाच्या नंतर तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्नय कळालं तेव्हा मात्र सुन्यानं घरी बराच गोंधळ घातलेला. तेव्हापासून त्याचं आणि दादांचं फाटत गेलेलं.
बाईही म्हणलेली दुसाडा असला म्हणून काय झालं, छकुलीला जीव लावतो. सुखात ठेवीन तिला. त्यानंतर सुन्यानं लक्ष घालणं बंद केलेलं.
दादा आणि बाईला त्यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचं काहीच वाटलं नव्हतं की, ते छकुलीच्या सुखासाठी सगळं पचवत होते, त्याला काहीच कळत नव्हतं. सुरेशला मात्र दादांनी मागच्याच्या मागच्या धुळवडीला पिऊन फोन करून शिव्या घातलेल्या. तेही बाईनं त्याला सांगितलेलं.
या सगळ्यात त्याला छकुली सुखीय असं वाटायचं. म्हणून कितीही राग आला तरीही तो गिळून टाकायचा. सकाळीही बाईशी बोलतानाही त्याला रागच आलेला. पण गिळून टाकायची सवय झालेली. अनेकदा हतबलता तुम्हाला शरणागती पत्करायला भाग पाडते. सुन्याचीही अवस्था तशीच होती.
नवरी आणि नवरदेव लग्नाच्या लाकडी स्टेजकडे जायला लग्न मंडपाच्या मधोमध रिकामी जागा सोडलेली होती. बाबूमामा लग्नातल्या एका लाकडी सोफ्यावर बसून होते. येणारे जाणारे त्यांना वाकून नमस्कार करत होते. साडेगावात त्यांना मोठा मानसन्मान दिला जायचा.
म्हणून तर त्याला येणारा जाणारा नमस्कार करत. बाबू मामाचा स्वभाव शांत आणि संयमी होता. सुन्याला मात्र ते कायम एखाद्या सरंजामी थेरड्या सारखे वाटत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम मोठेपणाची भावना खेळत असायची. आधी सोसायटीचा चेअरमन मग सरपंच आणि शेवटी पंचायत समितीचा सभापती असं मागच्या वीस पंचवीस वर्षात बाबू मामानं कोळून झालेलं.
बाबू मामाकडे आणि त्यांना अदबीने नमस्कार करणाऱ्या लोकांकडे पाहण्यात सुन्या दंग होता. गडबडीत एक तिशीतला पोरगा धावत आला. आणि बाबू मामाजवळ जात काहीतरी सांगू लागला.
बाबू मामा गडबडीनं सोफ्यावरून उठून उभा राहिले. तोवर एकानं माईक घेतला आणि मोठ्या उत्साहानं बोलू लागला. "मंडळी, थोड्याच वेळात आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते सर्वांचे लाडके, शिक्षण महर्षी सहकारभूषण माननीय आमदार चकले सायबांचं आगमन होतं आहे.
आपण त्यांचं जोरदार टाळ्यानं स्वागत करूया" ते ऐकून मंडपातले लोकं टाळ्या वाजवत आपापसात चुळबूळ करायला लागले. बघता बघता आमदार साहेबांच्या गाड्याचा ताफा शाळेच्या पटांगणात आला. कार्यकर्त्यांचा गराड्यात साहेब गाडीतून खाली उतरले.
नेहमीप्रमाणे आजूबाजूला कार्यकर्ते आणि मधोमध साहेब. बाबू मामा आणि सुरेश गडबडीत साहेबांकडे गेले. बाबू मामानं साहेबाला वाकून नमस्कार केला. सुरेशनं साहेबांच्या पायाला हात लावला. साहेब मंडपात येऊन सोफ्यावर बसले.
बाबू मामा बाजूला उभे राहिलेले, साहेबांनी त्यांना सोफ्यावर बसायचा आग्रह केला. साहेबा सोबतच्या फोटोग्राफरने त्या क्षणी चार पाच फोटो टिपले. तसे बाबू मामाही मटकन सोफ्यावर बसले. बाबू मामा मंडपातल्या बऱ्याच लोकांची ओळख करून देऊन लागले.
नवीन पावहण्याची ओळख. मग घरातल्या पोरासोरांची ओळख करून दिली. साहेब ऐकून घेत राहिले. काही ओळखीचे काही केवळ तोंड ओळखीचे काही नवखे अशी सगळ्यांची ओळख करून दिली. सुन्या आधी लांबून बघत होता. साहेब आले तसे मंडपात भारावलेपण जाणवत होते.
नवरदेव आणि नवरी बराच वेळची मंडपाच्या कमानीजवळ ताटकळत उभे होते. तिथून ते दोघे सोबत स्टेजकडे जाणार होते. बघता बघता लग्नमंडपात माणसंच माणसं जमली होती. बाहरो फुल बरसावोचं इन्स्ट्रुमेंटलची धून लागली तशी नवरदेव आणि नवरी मंडपाच्या मधोमध मोकळ्या सोडलेल्या जागेवरून पावलं मोजत चालत स्टेजवर पोहचली.
दोघांना बामनानी आपापल्या जागेवर उभं केलं. माईक हातात घेऊन उभा असलेला तरूण पोरगा माईकमधे म्हणला, "आगतम स्वागतम सुस्वागतम! आज या मंगल सोहळ्याला टिपरे आणि कळमूसे परिवाराच्या वतीने आपलं स्वागत करतो.
त्यावर 'रेशीम गाठी नाती जुळती! ईश्वराच्या साक्षीनं खुलती' वाक्य हाणून झालं. मग साहेबांचा बाबू मामानं फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. साहेबांनी नेहमीप्रमाणं मनोगत व्यक्त करून वधुवराच्या भावी आयुष्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. बाबू मामाचं सच्चा कार्यकर्ता म्हणून तोंडभरून कौतुक केलं.
साहेबांचं बोलणं संपलं तसं बामनानी गडबडीत मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. कारण मुहूर्त पार टळून गेला होता. मोजून पाच मंगलाष्टक झाल्यावर "तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते...
" म्हणून झालं." तसं लोकांनी अक्षता फेकून हात झटकले. बाईनं सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या पहिल्या पुरुषांच्या पंगतीत बसून सुन्यानं पोट शांत केलं. मग बाईचं जेवण होईपर्यंत लिंबाच्या झाडाखाली बसून मोबाईल चाळला.
बाईचं जेवण आवरलं तसा सुरेशरावांचा निरोप घेतला. आणि पुन्हा गळ्यातल्या रुमाल डोक्याला बांधून सुन्यानं मोटारसायकलला किक मारली. सुसाट वेगानं मोटारसायकल पुन्हा बाभळगावच्या दिशेनं धावू लागली. घड्याळात तीन वाजले होते.
क्रमशः - गोतावळा-१०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.