Rain Prediction Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Prediction : परतीचा पाऊस कुठे, कसा पडतो?

Rain Update : 'पूर्वा' 'उत्तरा' व 'हस्त' नक्षत्रात ३० सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस हा नैऋत्य मॉन्सूनचाच पाऊस असतो. काही शेतकरी ह्यालाच परतीचा पाऊस समजून बसतात. कालपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मॉन्सून परतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस परतीचा समजावा.

Team Agrowon

माणिकराव खुळे

Rain : 'पूर्वा' 'उत्तरा' व 'हस्त' नक्षत्रात ३० सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस हा नैऋत्य मॉन्सूनचाच पाऊस असतो. काही शेतकरी ह्यालाच परतीचा पाऊस समजून बसतात. कालपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मॉन्सून परतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस परतीचा समजावा.

देशाच्या अतिवायव्य टोकाकडील पश्चिम भागातून एक सप्टेंबरपूर्वी परतीच्या पावसाची माघारी फिरण्यास सुरुवात होत नाही तर ती एक सप्टेंबरनंतरच होते. साधारण १७ सप्टेंबरला मॉन्सून देशाच्या वायव्य भागातून माघारी सरण्यास म्हणजे परतीच्या पावसास सुरुवात होते. परतत असताना साधारण १९ दिवसांनी म्हणजे सरासरी ५ ऑक्टोबरच्या दरम्यान ईशान्य दिशेकडून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि पाच दिवसातच म्हणजे १० ऑक्टोबरला मॉन्सून राज्यातून पूर्णपणे परतून निघून जातो. ह्या पाच दिवसांतच नैऋत्येकडून येणारे बाष्पयुक्त वारे व ईशान्येकडून येणारे कोरडे वारे ह्यांच्या संयोगातून (टक्करीतून) उर्ध्वगमन होऊन सांद्रीभवनाची प्रक्रिया घडून येते आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो.

महाराष्ट्रात पाच दिवसांत पडणाऱ्या ह्या पावसाला परतीचा पाऊस म्हणू या! अर्थात ह्या सरासरी तारखा असून ह्यात मागेपुढे बदल होतो. हा पाऊस पडण्याचा कालावधी पाच दिवसांऐवजी कधी कधी कमीतकमी एक दिवसापासून जास्तीत जास्त आठ दिवसांपर्यंतचाही असू शकतो. राज्यातील शेतकऱ्यांची समजण्यास येथेच थोडी गफलत होते. ‘अजून मॉन्सून तर परतायचा आहे’. मग शेतकऱ्यांना त्यातून अशीही शक्यता वाटू लागते की अजून परतीचा पाऊस पडायचा आहे.’ खरं तर वर स्पष्ट केलेल्या अंदाजे ह्या पाच दिवसांत पडलेला पाऊसच परतीचा पाऊस असतो. प्रत्येक राज्यासाठी ह्या तारखा वेगवेगळ्या असतात. अर्थात ह्या दिलेल्या तारखा म्हणजे परतीच्या पावसाचे ‘फिक्स्ड टाइम टेबल’ समजू नये. त्यातही पाच-दहा दिवस इकडे तिकडे फरक होतो.

महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरला नैऋत्य मॉन्सून बाहेर पडून १५ ऑक्टोबरच्या दरम्यान दक्षिणेच्या चार राज्यांच्या उत्तर सीमेपर्यंत येऊन थबकतो. हे बघितल्यानंतरच परतीच्या पावसाचे देशातून उच्चाटन झाले, असे घोषित केले जाते. उबदार पावसाळी हंगामाचे संक्रमण होऊन थंड हिवाळी पावसाळी हंगामाची सुरुवात होते. त्याचबरोबर तामिळनाडू राज्यात ईशान्य मॉन्सून किंवा हिवाळी पावसास सुरुवात झाली असे समजले जाते. परतीच्या पावसाचे वैशिष्ट म्हणजे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात हवेच्या कमी दाबाचा मॉन्सून आस कमजोर होऊन म्हणजे समुद्रसपाटीला हवेच्या कमी दाबाची घळ नामशेष होऊन त्या जागी हवेच्या उच्च दाबाची पोळ तयार होते. देशातून परतीचा पाऊस पूर्णपणे निघून जाणे म्हणजे नैऋत्य मॉन्सूनचे सरासरी एक ऑक्टोबरनंतरच देशातून परतीचा प्रवास करून पूर्णपणे निघून जाणे होय.


परतीचा मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सून
परतीचा मॉन्सूनचे वारे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात देशाच्या भूभागावर ईशान्य कडून नैऋत्येकडे वाहतात तर ईशान्य मॉन्सूनचे वारेही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांत बंगालच्या उपसागरावरून समुद्री वारे पूर्व किनारपट्टीवरून दक्षिण भारतातील चार राज्यांच्या भू भागावर ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. परतीच्या पावसात ईशान्येकडील कोरडे वारे व नैऋत्य दिशेकडून अरबी व बंगालच्या समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे ह्यांच्यात मिलाफ होऊन त्यांच्या संयोगातून संवहनीद्वारे सांद्रीभवन होऊन परतीचा पाऊस होतो. तर ईशान्य
मॉन्सूनच्या पावसात केवळ बंगालच्या उपसागराहून बाष्पवहनातून सांद्रीभवन घडून येते व ईशान्य मॉन्सूनचा पाऊस पडतो.

चक्रीवादळे आणि ईशान्य मॉन्सून
चक्रीवादळाचा ऑक्टोबर ते डिसेंबर तीन महिन्यांचा कालावधी असला तरी त्यातही तीव्र चक्रीवादळाचा सरासरी काळ हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत अशा ४५ ते ५० दिवसांचा असतो. परंतु यानंतरही डिसेंबर अखेरपर्यंत एखादी दोन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात घडून येतातच. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील भारतीय उत्तर समुद्रात पंधरा डिग्री उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळे ह्या कालावधीत तयार होऊन विषुववृत्ताच्या समांतर समुद्र सपाटीदरम्यान पूर्वेकडून पश्चिमेकडे कवाली व ओंगोल ह्या दोन शहराच्या दरम्यान ते तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर आदळतात. त्या ठिकाणी तीन महिने भरपूर पाऊस देतात. कधी तर चक्रीवादळे तामिळनाडू पास करून दक्षिण द्वीपकल्प ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करतात. उत्तरेकडे मार्गस्थ होऊन कोकण व मध्य महाराष्ट्रात वादळे घुसतात व तेथे पाऊस देऊन जातात. एकदा जर महाराष्ट्रातून परतीचा पाऊस निघून गेल्यावर कोजागिरी पौर्णिमेनंतर हळूहळू थंडी वाढत जावी हीच अपेक्षा असते. परंतु आपण दिवाळी, कार्तिक एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा, चंपाषष्ठी, दत्त जयंती तर कधी-कधी नाताळपर्यंतही पाऊस झाल्याचे आपण अनुभवले आहे. ह्या पावसाला आपण बे-मोसमी, अवकाळी, हिवाळी पाऊस म्हणतो.

कधी कधी असेही घडते की, निसर्गचक्र बिघडले म्हणजे परतीचा मॉन्सून उशिरा गेला तर कदाचित काही वेळेस हेच कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात अधिक उत्तरेकडे म्हणजे साधारण पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र किनारपट्टी दरम्यान तयार होऊ लागतात. त्यामुळे ईशान्य मॉन्सून म्हणजेच हिवाळी पाऊस तामिळनाडू राज्यात कमी होतो आणि आपल्याकडे मात्र त्याच वेळेस नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हीच चक्रीवादळे बंगालच्या उपसागराकडून वायव्येच्या दिशेने आगेकूच करून दक्षिण छत्तीसगड, विदर्भातून मध्य प्रदेशकडे झेपावतात. महाराष्ट्राला अवकाळी पाऊस देऊन जातात. आपल्याकडे त्याचवेळेस कांदा, गहू, हरभरा, भाजीपाल्याची पिके असतात. काही वेळेस पिकांना फायदा तर काही पिकांना हा पाऊस नुकसानकारक ठरतो. पाऊस झाला तर ठीक नाही तर संपूर्ण डिसेंबर महिन्यात आकाश नेहमी ढगांनी आच्छादित राहून अपेक्षित असलेली थंडी पळवून लावली जाते, व रब्बी पिकांना मार बसतो.

सद्यःस्थिती व पुढील पावसाची अवस्था
१६ ते १९ सप्टेंबर या चार दिवसांतील पहिल्या आवर्तनात पाऊस झाला नसला तरी अजून २४ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस हा पहिल्या आवर्तनातील पाऊस समजावा. २५ ते ३० सप्टेंबर ह्या दुसऱ्या व ९ ते १३ ऑक्टोबरच्या तिसऱ्या अशा उर्वरित दोन आवर्तनातून पाऊस होण्याची शक्यता जाणवते. त्या आवर्तनानंतर पावसाची शक्यता मात्र मावळू शकते. संपूर्ण जून ते सप्टेंबर चार महिन्यांत 'एल-निनो'च्या घटनेने आपले वर्चस्व दाखवून दिले. सध्या आवर्ती वारे खालच्या पातळीत वाहत आहेत. शुष्क वातावरण असून मॉन्सून परत फिरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे २५ सप्टेंबरपासून मॉन्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाली. मॉन्सून आस दक्षिणेकडे आहे. सिक्कीम ते तेलंगणा दीड ते साडेचार किमी दरम्यान कमी दाबाचा आस आहे. ईशान्य अरबी समुद्र ते कच्छ भागात दीड ते साडेचार किमी दरम्यान कमी दाबाचा आस आहे. इतरही स्थिती राज्यात पावसास अनुकूल आहे. त्यामुळे १० ते १२ पावसाची शक्यता आहे. हा पाऊस अधून मधून ५ ऑक्टोबरपर्यंत पडू शकतो. कोकणात मात्र ह्याचे प्रमाण अधिक असून तिथे जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

माणिकराव खुळे, ९४२२०५९०६२

(लेखक भारतीय हवामान खात्यातील निवृत्त हवामान तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT