Rain Prediction : या वर्षीचा पाऊस कसा असणार?

स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामानशास्त्र विभागाचा या वर्षीचा पावसाचा अंदाज जाहीर झाला आहे. दोन्हीही अंदाजात राज्यात पाऊस थोडा कमी राहील, असेच भाकित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपासून ते शासनापर्यंत सर्वांनी सावध राहायला हवे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

Weather Update : भारतीय कृषी क्षेत्रात हवामान खात्यांच्या अंदाजांचे (Weather Department Forecast) महत्त्व मागील तीन दशकांपासून वाढले आहे. हरितक्रांतीच्या (Green Revolution) आधी आपल्या शेतीवर नक्षत्रांचा प्रभाव होता. पूर्वी शेतकरी मृग, हस्त, रोहिणी यांसारख्या नक्षत्रांवर पडणारा पाऊस पिकांचे नियोजन करत असे आणि त्यात त्यांना यशसुद्धा मिळत असे.

अर्थात, यास मुख्य कारण होते ते आपली सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि त्यावर घेतली जाणारी पारंपरिक पिके! अजूनही देशाच्या दुर्गम भागात जेथे शेतकऱ्यांना हवामान खात्याच्या अंदाजाची ओळख नाही तेथे पावसाळी नक्षत्रावर आधारितच शेती केली जाते.

वैश्‍वक तापमानवाढ त्याआनुषंगिक वातावरण बदल आणि याचा शेतीवर होणारा नकारात्मक परिणाम यामधून हवामान खात्यांच्या अंदाजाचे महत्त्व आता वाढले आहे.

पूर्वी रेडिओ पुरते मर्यादित असलेले हे अंदाज नंतर दूरदर्शनवर प्रसारित होऊ लागले आणि आता तर वृत्तपत्रांसह इतर प्रसार माध्यमांतूनही शहरी आणि ग्रामीण भागापर्यंत ते पोहोचत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजाला सध्या आधुनिक स्वरूप प्राप्त झाल्यामुळे आठवड्याचा पावसाळी आणि तापमानाचा अंदाज आपल्या भ्रमणध्वनीवर सहज उपलब्ध होत आहे.

Rain Update
Weather News : मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

धान्य उत्पादन, ठिबक सिंचन, द्रवरूप खते, सौरऊर्जा या क्षेत्रात आपण पाश्‍चिमात्याची बरोबरी करत असताना हवामान शास्त्राच्या अत्याधुनिक अंदाज प्रणालीमध्ये अजूनही थोडे मागेच आहोत. वातावरण बदल आज आपणाबरोबर लपाछपीचा खेळ खेळत आहे.

अकस्मात उद्‍भवणाऱ्या ढगफुटी, गारपिटीच्या घटना शेतकऱ्यांना उध्वस्त करून जात आहेत. पूर्वी पाऊस पंचक्रोशीत पडत असे आज तो गावात पडतो मात्र गाव शिवार कोरडे असते. असे असूनही हवामानाचा अंदाज मग तो राष्ट्रीय पातळीवर असो अथवा ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून राज्यापुरता असो तो शेतकऱ्यांना नेहमीच दिशादर्शक असतो.

शासनाची जशी स्वतःची अंदाज प्रणाली आहे तशीच खासगी क्षेत्रांची सुद्धा आहे. उपग्रहांच्या माध्यमातून ही अशी खासगी केंद्रे शेतकऱ्यांना त्याचबरोबर उद्योगधंदे, टीव्ही चॅनेल्स यांना हवामानाचा अचूक अंदाज देतात. पाश्‍चिमात्य देशात ही केंद्रे खूपच सक्षमपणे काम करतात.

असेच एक खासगी क्षेत्र म्हणजे ‘स्कायमेट’. अवकाशातील उपग्रह, मागील पावसाचे अंदाज, संख्याकी शास्त्राच्या पाठबळावर स्कायमेट भारताच्या हवामान खात्याप्रमाणे एखादा अपवाद वगळता अनेक वेळा अचूक अंदाज व्यक्त करते.

या वर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज या संस्थेने नुकताच जाहीर केला आहे. हा अंदाज म्हणतो की या वर्षी भारतात पडणारा पाऊस ९४ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा चार टक्के कमी आहे. देशात जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या सर्वसाधारण ८६८.८ मिमीच्या तुलनेत या वर्षी ८१६.५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या दोन आकड्यांमधील तफावत ५२.३ मिमी आहे. शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बीचे नियोजन करताना हा तफावतीचा आकडा लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण हा प्रभाव उत्तर आणि मध्य भारतावर जास्त जाणवेल. मागील चार वर्षे सातत्याने सरासरी ९५ टक्के अथवा त्याच्याही वर पाऊस पडला आहे.

मात्र २०२३ चा पावसाळा थोडा काळजीचा राहणार आहे. हा अंदाज पुढे म्हणतो, की गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै, ऑगस्टमध्ये पडणारा पाऊस अपुरा असणार आहे, तर पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर हा पावसास हुलकावणी देणारा काळ आहे.

मात्र या चार राज्यामधील कृषी सिंचन व्यवस्था चांगली असल्यामुळे तेथील धान्य उत्पादनावर फारसा नकारात्मक परिणाम दिसणार नाही. २०१७-१८ मध्ये असाच कमी पावसाचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला असतानाही या भागात धान्य उत्पादन जवळपास २८५ दशलक्ष टन झाले होते, जे उत्तम पावसाचा अंदाज असलेल्या २०१६-१७ मध्ये २७५ दशलक्ष होते. दुष्काळ प्रतिबंधक वाणे आणि त्यांचे लहान जीवनचक्र यामुळेच हे गणित साध्य झाले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानंतर लगेच भारतीय हवामान खात्याचा शेती आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय सकारात्मक असा अंदाज जाहीर झाला आहे. हा अंदाज म्हणतो, की भारतात या वर्षी सरासरी मॉन्सून ९६ टक्के असणार आहे. मात्र तो ५ टक्के कमी-अधिक होऊ शकतो.

स्कायमेटच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खात्याचा हा ताजा अंदाज शेतकऱ्यांचा हुरूप निश्‍चितच वाढवणारा आहे. विशेषतः दक्षिण भारतासाठी तर हा फारच शुभ म्हणावा लागेल. दोन्हीही अंदाजांत एल निनो आणि द्विध्रुव (IOD) या मॉन्सूनवर प्रभाव टाकणाऱ्या घटनांवर भाष्य केलेले आहे.

स्कायमेटने एल निनो बद्दल जास्त काळजी व्यक्त केली आहे तर भारतीय हवामान खात्याने यापूर्वीची उदाहरणे देऊन याबद्दल घाबरण्याचे कारण नाही, हे स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान खाते जगमान्य आणि १९३ राष्ट्रांच्या हवामान अंदाज संघटनेशी जोडलेले आहे. म्हणूनच ते जास्त विश्‍वासास पात्र आहे.

Rain Update
Weather Update : तापमान वाढीसह पावसाची शक्यता

आज आपल्या समोर हवामानाचे हे दोन्हीही अंदाज आहेत. कोणता जास्त गंभीरपणे घ्यावयाचा हे सर्वस्वी आपणावर अवलंबून आहे. पण एक मात्र खरे की शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस या वर्षी कमी आहे. म्हणून येत्या दोन महिन्यांत शेतकऱ्यांनी जास्त सावध राहून पडणाऱ्या वर्षाजलाची जास्तीत जास्त बचत करावयास हवी.

आगाताचा पाऊस झाला, रान ओले झाले की महागड्या संकरित बियाण्यांच्या पिशव्या वावरात रिकाम्या करू नये. पडणाऱ्या शाश्‍वत मृगाची वाट पाहावी. पडणारा पाऊस जमिनीत मुरावा, तिच्यात ओलावा राहावा म्हणून शेतांमध्ये सेंद्रिय घटक आतापासूनच वाढविण्याचा प्रयत्न करावा.

पहिल्या पावसात बी पेरून रोपे वर येण्याची वाट पाहण्यापेक्षा बंदिस्त जागेत मोठमोठ्या ‘ट्रे’मध्ये रोपनिर्मिती करून (अर्थात, शक्य असलेल्या पिकांबाबत) ती शेतात लावण्याचा प्रयोग करावा. यामुळे शेतात उभ्या पिकाचा कालावधी जवळपास महिन्याने कमी होतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही कमी खर्चाची चांगली पद्धत आहे.

पहिल्या पावसाचे जेवढे पाणी वावरात पडेल तेवढे शेतकऱ्याने धरून ठेवावयास हवे. यामागचा उद्देश एकच तो म्हणजे पावसाने ताण दिला तरी मातीमधील ओल कायम राहते. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मल्चिंगचा वापर करणे गरजेचे आहे.

पावसाने धोका दिल्यामुळे दोन पिशव्या वाया गेल्या म्हणून पुन्हा कर्ज काढून चार नवीन पिशव्या खरेदी करून पावसासोबत पाठशिवणीचा खेळ खेळू नये. निसर्ग हा नेहमीच जिंकणारा प्रतिस्पर्धी आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई तर करू नयेच पण त्यापेक्षाही पेरणीच्या वेळी रासायनिक खतांचा अतिशय जपून वापर करावा.

जो निसर्ग नियमांचे पालन करतो, योग्य आहार, पाणी घेतो आणि चतकोर भाकरीची भूक पोटात ठेवतो त्याला वैद्याकडे जाण्याची फारशी गरज पडत नाही. आपले शेत हे आपले शरिरच आहे असे समजा आणि पहा निसर्ग तुम्हास कशी छान साथ देतो ते!

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com