Dharashiv News: केंद्र शासनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाची एफआरपी १५० रुपये प्रति टनाने वाढवून आता ३५५० रुपये प्रति क्विंटल केली असून ही स्वागतार्ह बाब आहे. ‘विस्मा’ त्याचे स्वागतच करतो. मात्र त्याचबरोबर केंद्र सरकारने साखरेची एमएसपी सुद्धा वाढवणे आवश्यक आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने प्रत्येक वर्षीच्या आपल्या अहवालामध्ये साखरेची एमएसपी वाढ आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहे. मात्र केंद्र सरकार एमएसपीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहे, असे मत विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले.
एफआरपीची किंमत गेल्या सहा वर्षांत दरवर्षी वाढवली गेली, मात्र गेल्या सहा वर्षांत साखरेची एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत एकदाही वाढवली नाही. ज्या वेळेस उसाची एफआरपी २७५० रुपये प्रति टन होती त्या वेळेस साखरेची किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी २९०० रुपये होती. त्यानंतर फक्त एक वेळेस एमएसपीमध्ये वाढ करून ३१०० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली.
त्यानंतर २०१९ पासून एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही. आज ही साखरेची एमएसपी ३१०० आहे व उसाची एफआरपी मात्र आता ३५५० रुपये झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या एफआरपी प्रमाणे उसाची किंमत अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते व एफआरपी अदा करणे अपरिहार्य राहते. त्यामुळे आज साखर कारखान्यांच्या कडील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे व संचित तोट्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
त्यासाठी ‘विस्मा’च्या वतीने केंद्र सरकारला आमची एकच विनंती आहे कृषी मूल्य आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे एफआरपी ज्या प्रमाणात वाढवली जाते त्या प्रमाणात एमएसपी वाढ जाहीर करण्यात यावी. गेल्या सहा वर्षांतील एमएसपी वाढीतील फरक व आज प्रति क्विंटलचा उत्पादन खर्च लक्षात घेता आज साखरेची एमएसपी किमान ४२०० रुपये प्रति क्विंटल होणे अपेक्षित आहे.
तसेच सध्या थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीमुळे साधारण प्रत्येक साखर कारखान्यात उसाचा वापर २५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल निर्मितीकडे वळलेला आहे. त्यामुळे इथेनॉलची सुद्धा किंमत ही एफआरपी किमतीच्या वाढीशी निगडित करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आज ६० रुपये प्रति लिटर असणारी बी मॉलेसिस पासूनच्या इथेनॉलची किंमत किमान ७० रुपये प्रति लिटर होणे आवश्यक आहे. तरच साखर कारखान्याच्या प्रति लिटर इथेनॉलचा उत्पादन खर्च निघेल, असेही श्री. ठोंबरे म्हणाले.
उत्पादक अडचणीत येतील
‘विस्मा’च्या वतीने आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की तातडीने साखरेची एमएसपी ४२०० रुपये प्रतिक्विंटल व इथेनालची किंमत ७० रुपये प्रति लिटर करून वाढीव एफआरपी बरोबर या दोन्ही निर्णयाची घोषणा तातडीने करावी. तरच देशातील साखर उद्योग जिवंत राहील, अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी सशक्त करण्याच्या प्रयत्नात त्याचा मुख्य गाभा असणारा साखर कारखाना मात्र नेस्तनाभूत होईल व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा प्रचंड अडचणीमध्ये येईल याचे भान केंद्र सरकारने ठेवणे आवश्यक आहे, असे मत ‘विस्मा’चे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.