Wheat Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Disease: गहू पिकावरील ‘स्मट’ रोग: कारणे, लक्षणे आणि नियंत्रण

Agriculture Disease: गव्हाच्या पिकावर होणारा ‘स्मट’ रोग (Loose Smut) हा बुरशीजन्य रोग असून, योग्य नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात ३०% पर्यंत घट होऊ शकते. हा रोग बियाण्यांद्वारे पसरत असल्याने बीजप्रक्रिया आणि शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.

Team Agrowon

राहुल वडघुले

Loose Smut Disease: राज्यात रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गहू पिकामध्ये स्मट रोग (कानी), तांबेरा, ब्लाइट, भुरी, मूळकुज, ठिपका इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. भारतामध्ये हा रोग प्रथम कर्नाल सिटी येथे १९३१ मध्ये आढळून आला. म्हणून याला ‘कर्नाल बन्त’ असे म्हणतात. गहू पिकामध्ये मुख्यत: ५  प्रकारचे ‘स्मट’ दिसून येतात. त्यात लूज स्मट, फ्लॅग स्मट, कव्हर्ड स्मट, हिल स्मट, कर्नल स्मट यांचा समावेश होतो. आज आपण गहू पिकामध्ये आढळून येणाऱ्या महत्त्वाच्या लूज स्मट या रोगाविषयी माहिती घेऊ.

लक्षणे

या रोगाची लक्षणे प्रामुख्याने ओंबीवर दिसून येतात. त्यामुळे ओंबी येईपर्यंत रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येत नाही.

रोगाची लागण झालेल्या झाडांना लवकर व लहान ओंब्या लागतात. सुरवातीला या ओंब्या राखेडी रंगाच्या दिसतात. नंतर त्यावर गर्द काळ्या रंगाची भुकटी (पावडर) असल्यासारखे दिसते. अशा ओंबीमध्ये दाणे भरत नाहीत. दाण्यांऐवजी ‘स्मट’ रोगाचे बीजाणू तयार होतात. हे बीजाणू उडून गेल्यावर फक्त ओंबीची आतील काडी शिल्लक राहते.

स्मट रोगाची लक्षणे संपूर्ण ओंबीवर दिसतात. लागण झालेली ओंबी इतर ओंब्यांपेक्षा लहान असली, तरी झाड मात्र इतर झाडांपेक्षा उंच वाढते.

बऱ्याच वेळा पानांवर पिवळ्या रेषा दिसून येतात.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : लूज स्मट (Loose smut)    

रोगाचे कारण : बुरशीच्या प्रादुर्भावामुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो.  

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव : Ustilago tritici

बुरशीचे फायलम (डिव्हिजन) : Basidiomycota  

परजीवी प्रकार : Obligate parasite      

आढळ : गहू उत्पादक भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.

नुकसान : या रोगामुळे गहू पिकाचे १० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. रोगाची तीव्रता जास्त प्रमाणात असेल, तर ३० ते ४० टक्के पर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.  

पोषक वातावरण : थंड व दमट वातावरण, १६ ते २२ अंश सेल्सिअस तापमान, तसेच पानांवर दव साठलेले वातावरण. जितके जास्त वेळ पानावर दव राहील, तितके रोगाचे प्रमाण जास्त राहते.          

रोग कसा निर्माण होतो ?

हा बियाण्यापासून पसरणारा रोग आहे. या रोगाची लागण मागील वर्षीच झालेली असते. गहू पीक जेव्हा फुलोरा अवस्थेत असते, तेव्हा बुरशीची लागण बियाण्यास होते. बुरशीचे तंतू बियाण्यांमधील गर्भामध्ये सुप्तावस्तेत राहतात.

गहू पीक उगवून आल्यानंतर पोषक वातावरण निर्मिती होताच बुरशीची वाढ सुरू होते.  पिकाच्या वाढीच्या अवस्थेत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पीक वाढते जाईल, तसे बुरशी वाढून वरपर्यंत येते.

ओंबीची वाढ सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी बुरशीची शिरकाव करते. ओंबीच्या कण्यामध्ये बुरशी वाढते व तिथे बुरशीचे बीजाणू तयार होतात. या कण्या राखेडी रंगाच्या दिसू लागतात. या वेळी रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येतात. तोपर्यंत प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येत नाही.

जेव्हा ओंबीच्या कण्या उघडतात, तेव्हा गव्हाच्या दाण्यांऐवजी बुरशीचे काळ्या रंगाचे बीजाणू बाहेर पडतात. या बिजाणूंना ‘टेलीओस्पोर’ असे म्हणतात. स्वतंत्र असल्यानंतर ते हिरव्या रंगाचे दिसतात. मात्र एकत्रित असल्यास, काळ्या रंगाचे दिसतात.

हे बीजाणू वारा, कीटक यांच्या माध्यमातून इतर चांगल्या गव्हाच्या फुलांवर जाऊन लागण होण्यास कारणीभूत ठरतात.  

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते ?

सूक्ष्मदर्शिकेखाली या रोगाचे बीजाणू पाहून रोग निश्चिती करता येते. सूक्ष्मदर्शिकेखाली या रोगाचे गर्द हिरव्या रंगाचे ‘टेलीओस्पोर्स’ म्हणजेच बुरशीचे बीजाणू अतिशय स्पष्टपणे दिसतात. हे बीजाणू गोलाकार असतात. या बीजाणूंची लांबी ०.००५ ते ०.००७५ मिलिमीटर इतकी सूक्ष्म असते.

नियंत्रणाचे उपाय

पेरणीसाठी चांगले, रोगमुक्त बियाणे वापरावे.

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी. 

लागवडीसाठी रोग प्रतिकारक्षमता जास्त असलेल्या जातींची निवड करावी.

पिकाची पाने जास्त काळ ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.  

रोगग्रस्त झाडे  त्वरित काढून टाकावीत.

नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.  

शिफारशीत बुरशीनाशके 

बीजप्रक्रियेसाठी

कार्बोक्झिन (७५ टक्के डब्ल्यूपी)

डायफेनोकोनॅझोल (३ टक्के डब्ल्यूएस)

टेब्युकोनॅझोल (२ टक्के डीएस)

फवारणीसाठी

प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ईसी)

टेब्युकोनॅझोल (३८.३९ टक्के डब्ल्यू/ डब्ल्यू एससी)

कार्बोन्डाझिम (२५ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५० टक्के डब्ल्यूएस) (संयुक्त बुरशीनाशक)

- राहुल वडघुले, ९८८११ ३५१४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सिताफळाला चांगला भाव, गवार तेजीत तर हळद-केळी दर स्थिर

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Solar Project Nashik : दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प पूर्ण करा

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Day-Time Electricity : अकोलेकाटी परिसरात दिवसा वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT